Skip to main content
x

दीक्षित, मधुकर श्रीधर

धुकर श्रीधर दीक्षित यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला. इंटर आर्ट्सपर्यंत नागपूर येथे शिक्षण झाले. प्रथम खेड कोर्टात सात महिने नोकरी केली. नंतर पुणे येथे मिलिटरी अकाउन्टस खात्यात नोकरी केली. त्यानंतर  महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यालय अधीक्षक या पदावर २४ वर्षे कार्यरत होते. तेथेच कार्यवाह, कोषाध्यक्ष, कार्यकारी विश्वस्त या पदांवरही कार्य केले.

वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांमधून प्रासंगिक, ऐतिहासिक आणि चरित्रात्मक लेखन केले. शंभरावर पुस्तकांची परीक्षणे लिहिली. व्यक्तिचित्रात्मक अशी ३० लहानमोठी पुस्तके लिहिली. त्यांतील प्रमुख अशी ‘जिजामाता’, ‘अहल्याबाई होळकर’, ‘सत्तावन्नचे सप्तर्षी’, ‘तात्या टोपे’, ‘प्रतापी बाजीराव’, ‘नेपोलियन’, ‘व्यक्तिविशेष’, ‘बाळाजी विश्वनाथ’, ‘साहित्यिक सांगाती’, ‘आम्ही चित्पावन’ ही होत. जुन्या पुण्याचे दर्शन घडविणारे ‘असे होते पुणे’ हे पुस्तक वाचकप्रिय झाले. ‘मी म. श्री.’ हे आत्मचरित्र समकालीन जीवनाचे रेखाटन करते.‘इतिहासातील भ्रमंती’ हे सार्‍यांनाच आवडणारे त्यांचे पुस्तक होय.

समाजकार्याची आवड असल्याने वसंत व्याख्यानमालेचे ते कार्यवाह होते. पुणे नगर वाचन मंदिराचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. पुणे सार्वजनिक सभा, थोरले बाजीराव पुतळा समिती, पुणे ऐतिहासिक वास्तुस्मृती, श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, भारत इतिहास संशोधन मंडळ, महाराष्ट्र चित्तपावन संस्था, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, श्रीसमर्थ रामदास अध्यासन या संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले.

साहित्य आणि समाजकार्य यांमुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. शासकीय साहित्य पुरस्कार तीन वेळा मिळाला. ‘भीमराव कुलकर्णी साहित्य कार्यकर्ता’ पुरस्काराचे ते मानकरी आहेत. पुण्याचा चालता-बोलता इतिहास म्हणजे म. श्री. दीक्षित.

- श्याम भुर्के

दीक्षित, मधुकर श्रीधर