Skip to main content
x

दफ्तरदार, श्रीपाद यशवंत

           महाराष्ट्रातीलच नव्हे; तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक मागासलेला व वंचित आदिवासी समाजशास्त्रीय कृषितंत्र वापरून भरीव प्रगती करू शकतो, हे डॉ. श्रीपाद दफ्तरदार यांनी सतत २० वर्षे आदिवासींमध्ये कार्य करून दाखवून दिले. सांगली जिल्ह्यातील पेठ येथे जन्मलेले  दफ्तरदार सरकारी (छ. प्रतापसिंह) हायस्कूल, सातारा येथून शेती विषय घेऊन १९४८मध्ये शालान्त परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून १९५२मध्ये बी.एस्सी. (कृषी) ऑनर्ससह व १९६० साली एम.एस्सी. (कृषी) कृषि-रसायनशास्त्र विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. दिल्लीच्या भा.कृ.सं.सं.तून मृदाशास्त्र व कृषि-रसायनशास्त्र विषयात १९७४मध्ये त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. पुणे, धुळे, अकोला व कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयांत त्यांनी १५ वर्षे पदवीपूर्व अध्यापन केले. त्यांनी सोलापूर येथील कोरडवाहू संशोधन केंद्रावर प्रमुख शास्त्रज्ञ व मृदा-विशेषज्ञ म्हणून २ वर्षे काम केले. त्यांनी म.फु.कृ.वि., राहुरी येथे प्राध्यापक व नंतर मृदाशास्त्र विभागप्रमुख म्हणून १२ वर्षे पदव्युत्तर अध्यापन व संशोधन मार्गदर्शन केले व ते १९९१मध्ये सेवानिवृत्त झाले.

           पिकांचे पोषण व खतांची कार्यक्षमता वृद्धी हे दफ्तरदार यांच्या संशोधनाचे मुख्य विषय होते. पाण्याने संपृक्त भातजमिनीत दिलेले नायट्रेट पिकास निरुपयोगी ठरते, तर अमोनियमचा कमाल उपयोग होतो. युरिआ अमोनियमसारखा, पण किंचित कमी उपयोगी असतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात ‘धूळवाफ’ पद्धतीने पावसाच्या पाण्यावर घेेतलेल्या भातपिकास जमिनीतून दिलेला ५०%पेक्षा जास्त युरिआ पिकाला मिळत नाही (ऱ्हास पावतो) व २५%पर्यंत पिकाला मिळतो. टोमॅटोला दिलेले नत्रखत ठिबक सिंचनाखाली जास्तीत जास्त, त्याखालोखाल नीम पेंड मिसळल्यामुळे व त्याखालोखाल दोन वेळा विभागून दिल्यामुळे पिकाकडून शोषले जाते. वरील सर्व निष्कर्ष एन-१५ समस्थानिक (आयसोटोप) वापरल्यामुळे निर्विवाद आहेत. नीम व करंज तेलाचे ऑक्सिडेशन रोखणारे घटक व गुणधर्म, त्यामुळे नत्रखताचा टळणारा ऱ्हास व पिकाला होणारा वाढीव उपयोग तपशीलवार संशोधनाने सिद्ध केला. त्यांनी महाराष्ट्राच्या भारी काळ्या जमिनीतील स्फुरदाचा सखोल अभ्यास केला. कडधान्यांचे स्फुरद पोषण हे त्यांच्या मुळ्यांतून आम्ल स्रवून, मातीतील विशिष्ट अंश विरघळण्यावर अवलंबून असते. उंच व बुटक्या भात जातीमधील जमिनीतून लोह शोषणाच्या क्षमतेतील फरक व त्यावरील उपाय यांचा अभ्यास, भुईमुगासाठी बोरॉन, गव्हासाठी जस्त यांची उपयुक्तता इत्यादी यांचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी १५ विद्यार्थ्यांना एम.एस्सी. (कृषी)साठी व पीएच.डी.साठी ७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे ५० पेक्षा जास्त संशोधनपर व सामान्य शेतकऱ्यांसाठी ७५ मराठी लेख प्रसिद्ध झाले आहेत.

           त्यांनी १९९१मध्ये म.फु.कृ.वि.मधून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग सह्याद्री पर्वतराजीत राहणाऱ्या आदिवासींसाठी केला. त्यांच्या तुटपुंज्या शेतीतून भात, भुईमूग, गहू, कडधान्ये इ. पिकांची उत्पादनवाढ करून त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी त्यासाठी समविचारी निवृत्त प्राध्यापक व काही वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत ‘जनसेवा फाऊंडेशन, सेल्वास’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्रातील ७ व गुजरातमधील ४ जिल्ह्यांतील व दादरा-नगर हवेलीमधील आदिवासीबहुल क्षेत्रांत कृषी, वनकृषी, उद्यानविद्या, महिला बचतगट व सबलीकरण या विषयांत त्यांनी सुधारणेचे प्रयत्न केले.

           ‘चारसूत्री भातशेती’ या शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतात उतरून लावणी करणे, ब्रिकेट (खतगोळी) खोचणे इ. प्रत्यक्ष करून दाखवणे व उत्पादनातील वाढ व खर्चातील बचतीची त्यांना प्रचीती आणून देणे, अशी कार्यपद्धती होती. अशा निदान २००० चाचण्या करण्यात आल्या. चारसूत्री पद्धतीमुळे दीडपट ते दुप्पट (हेक्टरी किमान १ टन वाढ) भात मिळते. खर्चलेल्या प्रत्येक रुपयास ५ ते १० रुपये परतावा मिळतो. महाराष्ट्र शासनाने २००० मध्ये चारसूत्री पद्धत प्रसारासाठी स्वीकारली. २००५ पासून गुजरातमध्ये ५ वर्षे शेतकऱ्यांच्या शेतात केलेल्या १८०० चाचण्या व तेथील कृषी विद्यापीठांच्या संशोधन प्रक्षेत्रावरील सतत ३ वर्षे केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष या आधारे २०१०मध्ये गुजरात शासनाने ‘चारसूत्री भातशेती’ प्रसारासाठी स्वीकारली. उन्हाळी भुुईमूग (इक्रिसॅट पद्धत), कडधान्ये, गहू इत्यादी पिकांच्या उत्पादनवाढीमुळे आर्थिक सुधारणेचा कृषी आधारित मार्ग आदिवासींना दाखवण्यात आला. डॉ. दफ्तरदार यांना ‘उषःप्रभा अधिष्ठान’ मुंबईचा १९९८चा ‘प्रभात’ पुरस्कार व जनसेवा फाऊंडेशनचा महाराष्ट्र जनकल्याण समितीचा २००६चा ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

           - डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

दफ्तरदार, श्रीपाद यशवंत