Skip to main content
x

धोंडे-पाटील, भागवत कुंडलिक

             भागवत कुंडलिक धोंडे (पाटील) यांचा जन्म अहमदनगरमधील सडे या गावात  झाला. बालवयात त्यांच्यावर शेतीचे संस्कार झाले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सडे, खडांबे, राहुरी, वांबोरी येथे झाले, तर मॅट्रिक अहमदनगर येथे झाले. त्यांनी १९५६ साली पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे बी.एस्सी. (कृषी) पूर्ण करून त्यांनी तेथेच नोकरी मिळवली व निरनिराळ्या पदांवर काम केले. हे करत असतानाच त्यांनी एम.एस्सी. (कृषी अभियांत्रिकी) पूर्ण केले.

             परंतु उद्योजक बनण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी १९६४ साली नोकरीचा राजीनामा दिला आणि कारले गुरुजींच्या सहकार्याने भोसरी येथे ‘अजंठा फार्म मशिनरी’ नावाने कारखाना काढला व अनेक यंत्रांची निर्मिती केली, जी योग्य किमतीत शेतकऱ्यांना मिळू लागली. सपाट वाफे लांबट करून त्यांच्या बांधांची उंची कमी करण्याचे काम मजूर करत. त्यासाठी धोंडे यांनी सारायंत्राचा शोध लावला. या सारायंत्रांना खूप प्रसिद्धी मिळाली. धोंडे यांनी ‘फ्लोटिंग सायफन’चाही शोध लावला.

             धोंडे यांनी ‘कंटूर मार्कर’चा अत्यंत उपयुक्त शोध लावला. त्यासाठी डोंगर उतारावर जमिनीला समपातळीत चर खोदावे लागतात. त्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि पाणीही वाहून जात नाही. यासाठी त्यांनी स्वस्तातले ‘कंटूर मार्कर’ तयार केले. या यंत्राचा अशिक्षित शेतकरीही सहज उपयोग करू लागले आणि टेकड्या व माळरानावर शेती फुलू लागली. विशेष म्हणजे वन अधिकारी वसंतराव टाकळकर यांनी धोंडे यांनी शोध लावलेल्या ‘कंटूर मार्कर’चा उपयोग करून हजारो एकर डोंगर उतारावर हिरवाई निर्माण करण्यासाठी केला. पेरणी करताना शेतकरी पाभरीत बी टाकत जातात. या क्रियेत पुष्कळ बी वाया जाते. त्यांनी पट्यावर बी चिकटवून पेरण्याची पद्धती विकसित केली. धोंडे यांनी लावलेल्या शोधांचा लोकांना खूप फायदा झाला. त्याची त्यांना एकस्वे व पारितोषिके मिळाली. आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी पाणी पंचायतीच्या विलासराव साळुंखे यांनी भागवतांना नायजेरियातील फार्मवर नोकरी मिळवून दिली. त्यांनी ओसाड माळरानावर हजारो टन टोमॅटोचे पीक घेतले. स्थानिक लोकांशी सुसंवाद साधण्यासाठी त्यांची ‘हौसा’ भाषा शिकून घेतली. नव्या तंत्राचा व उत्पादनाचा अभाव असलेल्या या देशात ‘मनुष्यबळ’ हे स्वस्त व विश्‍वासार्ह आहे हे त्यांनी दाखवून दिले. एका भारतीय कृषिशास्त्रज्ञाचे प्रतिकूल परिस्थितीतील हे उल्लेखनीय काम पाहून आफ्रिकन लोक आश्‍चर्यचकित झाले.

             धोंडे-पाटील यांनी मायदेशी परत आल्यानंतर १९९२ पासून ‘पाणी जिरवा आणि माती अडवा’ या तंत्राबाबत महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो माणसांना प्रशिक्षण दिले. त्यांनी वृत्तपत्रे व मासिकांतून सातत्याने शेतीविषयक लेखन केले. ‘लिफ्ट इरिगेशन’ व ‘नायजेरियातील कंपनी शेती’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली. धोंडे-पाटील यांना १९७१ मध्ये सारायंत्रासाठी केंद्र सरकारचे प्रेसिडेंशियल पारितोषिक, १९६८, १९७० व १९७२ मध्ये मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांचे कै. गो.स. पारखे पारितोषिके, १९९० आर्च ऑफ युरोप गोल्ड स्टार अ‍ॅवॉर्ड, २००३ मध्ये मुक्तांगण मित्र पुणे संस्थेतर्फे देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट ‘स्मृतिसंघर्ष’ सन्मान इत्यादी पुरस्कार मिळाले. धोंडे-पाटील यांना १९६६ मध्ये सारायंत्र - पेटंट नं. १०८५२९, १९६९ मध्ये कंटूर मार्कर पेटंट नं. १२२९२८ तर १९८१ मध्ये फ्लोटिंग सायफन पेटंट नं १५५५२२ ही तीन एकस्वे मिळाली. धोंडे-पाटील यांचे मेंदूतील रक्तस्रावाने निधन झाले.

- प्रा. राजकुँवर गंगाधर सोनवणे

धोंडे-पाटील, भागवत कुंडलिक