Skip to main content
x

गोखले, बी. एन.

     मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश,  न्यायमूर्ती बी. एन. गोखले यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. १९१८मध्ये ते एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. कॉलेजात ते अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. मुंबई विद्यापीठाची बी.ए.(ऑनर्स) पदवी त्यांनी प्रथम वर्गात संपादन केली. तर १९२५मध्ये त्यांनी एलएल.बी.ची पदवी प्राप्त केली. १९२५-२६मध्ये त्यांनी ‘स्टेट अ‍ॅण्ड म्युनिसिपल एंटरप्राइझेस् इन इंडिया’ या विषयावर प्रबंध लिहून तो मुंबई विद्यापीठास सादर केला. त्यामध्ये त्यांनी समाजवादी अर्थव्यवस्था, महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण, सहकारी तत्त्वावरील शेती आणि कापडगिरण्यांचे नियंत्रण महानगरपालिकेकडे देण्याचा पुरस्कार केला. १९२६मध्ये ते इतिहास आणि अर्थशास्त्र हेच विषय घेऊन एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२६मध्ये गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. त्याचवेळी ते राजकीय आणि सामाजिक कार्यातही सक्रीय भाग घेऊ लागले. ‘इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन’चे ते बरीच वर्षे मानद सचिव होते, त्याचप्रमाणे ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन’चे एक संयुक्त सचिवही होते. ‘गुजराती’ या पत्राच्या इंग्रजी विभागाचे ते काही काळ संपादक होते. १९३६मध्ये ते मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांमधून विद्यापीठाचे फेलो म्हणून निवडून आले. त्यानंतर ते विद्यापीठाच्या कायदा विभागाच्या अभ्यासमंडळाचे आणि १९४४मध्ये विद्यापीठाच्या सिंडिकेटचे सदस्य झाले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचेही ते फेलो, सिंडिकेट-सदस्य आणि शैक्षणिक समितीचे सदस्य होते. याशिवाय ते मुंबई मराठी साहित्य संघ, बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग आणि स्वस्तिक लीग यांचे उपाध्यक्ष, मुंबई राज्य सामाजिक सुधारणा संघटनेचे (बॉम्बे स्टेट सोशल रिफॉर्म असोसिएशन) अध्यक्ष आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सल्लागार मंडळाचे सदस्य होते. याव्यतिरिक्त ‘अ‍ॅडव्होकेटस् असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’चेही ते सुमारे तीन वर्षे अध्यक्ष होते. या सर्व उपक्रमांबरोबरच त्यांचा वकिलीचा व्यवसायही यशस्वीरीत्या चालू होता. अठ्ठावीस वर्षांहून अधिक काळ ते अपील शाखेतील अग्रगण्य वकील होते.

     २१ जानेवारी १९५५ रोजी गोखले यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

     १५ जुलै १९६१ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. उच्च न्यायालयातील आपल्या कारकिर्दीत न्या.गोखले यांच्यासमोर अनेक महत्त्वाचे खटले आले आणि त्यांत त्यांनी महत्त्वाचे निर्णय झाले. इ.जी.बरसे खटला, शास्त्री यज्ञपुरुषदासजी खटला, सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी विरुद्ध धर्मादाय आयुक्त हा खटला, इत्यादी खटले त्यांपैकी विशेष उल्लेखनीय म्हणता येतील.

      तथापि, न्या.गोखले यांचा सहभाग असलेला सर्वात महत्त्वाचा खटला म्हणजे नानावटी प्रकरणातील मूळच्या फौजदारी खटल्यानंतर उद्भवलेला घटनात्मक प्रश्न होय. या प्रश्नाच्या निर्णयासाठी तो न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या विशेष पूर्णपीठासमोर आला, त्याचे न्या. गोखले एक सदस्य होते. या पीठाचा एकमताचा निकाल हा मुंबई उच्च न्यायालयाच्या  इतिहासातील एक महत्त्वाचा निकाल मानला जातो.

      एकोणिसाव्या शतकातील उच्च न्यायालयाचे थोर न्यायाधीश आणि आधुनिक महाराष्ट्राचे अध्वर्यू न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या उच्च न्यायालयातील कारकिर्दीचा आणि त्यांच्या निकालपत्रांचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारे एक भाषण न्या.गोखले यांनी न्या.रानडे यांच्या एका स्मृतिदिनीं केले होते.

      - शरच्चंद्र पानसे

गोखले, बी. एन.