Skip to main content
x

गोखले, कृष्णाजी केशव

     जत संस्थानात न्यायाधीश व काही काळ कारभारी म्हणून कृष्णाजी केशव गोखले यांनी काम केले होते. मराठी कथा व कादंबरी यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखन दृष्टीने वेगळेपण प्रदान करणार्‍या हरी नारायण आपटे यांचा व गोखले यांचा खूप स्नेह होता. आपटे यांच्या सुधारणावादी दृष्टीकोनाची छापही त्यांच्यावर पडलेली होती. आपटे यांच्या स्नेहपरिवारात त्यांचा राबता असल्यामुळे वाचन/लेखनाची आवड त्यांच्यात निर्माण झाली व त्यातून त्यांनी गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला. त्यांच्या अनेक गोष्टी ‘मनोरंजन’ व ‘करमणूक’ या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. १९११साली त्यांनी ‘काय केलीत सूनबाई’ या नावाचा एक कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्याला प्रस्तावना लिहिताना ‘फुरसतीच्या वेळी आपल्या मनाची करमणूक व्हावी व त्यातल्या त्यात मराठी भाषेची सेवा घडावी, अशा दुहेरी हेतूंनी ह्या प्रथम लिहिल्या,’ असा आपल्या कथालेखनाचा हेतू त्यांनी स्पष्ट केलेला आहे आणि सार्थही करून दाखविला आहे.

     त्यांनी आपल्या कथालेखनाचे एक तंत्रच सिद्ध केले होते. स्ट्रॅन्ड, लंडन, पिअर्सन्स मंथली या नियतकालिकांमध्ये आलेल्या पाश्चिमात्य साहित्यिकांच्या कथा तत्कालीन सुशिक्षित मंडळी मोठ्या आवडीने वाचत असत. ही तत्कालीन सुशिक्षितांची अभिरुची लक्षात घेऊन अशा नियतकालिकांमध्ये आलेली व त्यांना आवडलेली कथा मनोरंजनाचा हेतू समोर ठेवून ते रूपांतरित करीत. असे रूपांतरण घडवून आणताना इंग्रजी कथेतील मध्यवर्ती कल्पना तशीच ठेवून तिला मराठी पेहराव अशा पद्धतीने देत की, एकीकडे इंग्रजी कथेतील मध्यवर्ती कल्पना स्वीकारल्यामुळे तत्कालीन सुशिक्षितांना ती अभिरुचीपूर्ण वाटे व दुसरीकडे तिच्या बेमालूम रूपांतरणामुळे मराठमोळीही वाटत असे. ‘बालक’, ‘दो दिवसांची बायको’, ‘मैनाबाईचा राघू’, ‘मंतरलेले पाणी’, ‘थोडासा मेंदूचा विकार’ या कथांकडून त्यांचे लेखन-कौशल्य विशेषत्वाने प्रकट झालेले आहे.

     लहानशा प्रसंगाभोवती कथासूत्र गुंफणे, त्यात मधून-मधून नर्म विनोदाची पेरणी करतो, रहस्याची गुंफण करून वाचकाची उत्कंठा वाढवीत नेणे आणि शेवटी त्याची परिणामकारक पद्धतीने सोडवणूक करून वाचकाला आनंद होईल अशी योजना करणे, कधी कथेतील पात्राच्या भोळ्या-भाबड्या स्वभावाने मर्म गमतीदारपणे मांडून वाचकाला त्यातील मजा अनुभवता येईल अशा पद्धतीने कथेची रचना करणे आणि या सगळ्या वैशिष्ट्यांना पेलून धरणारी सहजसुंदर, ओघवती भाषाशैली हे विशेष त्यांच्या कथांमध्ये आढळतात. त्यांच्या कथा-लेखनातील हे विशेष कथा-लेखक म्हणून त्यांचे वेगळेपण स्पष्ट करणारे आहेत. म्हणूनच ‘मनोरंजन’ काळातील प्रमुख लेखक म्हणून अभ्यासकांनी त्यांचा गौरव केला आहे.

     ‘काय केलीत सूनबाई’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी आपली दृष्टी कादंबरी लेखनाकडे वळविली. त्यातूनच ‘आजपासून पन्नास वर्षांनी’ हे जेन ऑस्टीन हिच्या ‘प्राइड अ‍ॅन्ड प्रेज्युडिस’चे रूपांतर (१९१३), ‘स्वर्गीय प्रेम’ मेरी कॉरेली हिच्या ‘ट्रेझर ऑफ हेवन’चे स्वैर रूपांतर (१९१५), ‘मूर्तिमंत गुलामगिरी’ या नावाने ‘अंकल टॉम्स कॅबीन’ ह्या विश्वविख्यात कादंबरीचा अनुवाद (१९२०) इत्यादी लेखन त्यांनी केले. तसेच सामाजिक प्रबोधन घडावे हा हेतू समोर ठेवून ‘तिलोत्तमा’ व ‘एकत्र की विभक्त’ या दोन स्वतंत्र कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या. त्यातून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी तळमळणार्‍या एका सुधारकाच्या मनाचा प्रत्यय आपल्याला येतो.

     कथा, कादंबरी लेखनाबरोबर मराठी भाषेचा विचारही त्यांनी तात्त्विक दृष्टीने आपल्या काही लेखांमधून मांडलेला आहे. ‘भाषांतर, रूपांतर की स्वतंत्र?’, ‘मराठी भाषेतील काही दोष व त्यांची मीमांसा’ हे ‘विविधज्ञानविस्तार’ या मासिकामधील लेख त्यांच्या मराठी भाषेविषयी असणार्‍या सच्च्या प्रेमाचे प्रतीक आहेत.

     ते न्यायाधीश पदावर होते. त्यामुळे सारासार दृष्टीने व स्वतंत्र विचारसरणीने एखाद्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी त्यांना लाभलेली होती. त्यातूनच हिंदू कायद्यामध्ये वारसा हक्काच्या संदर्भात स्त्रियांवर कसा अन्याय झालेला आहे, हे त्यांना जाणवले व मोठ्या पोटतिडकीने त्यांनी या प्रश्नावर जागृती व्हावी म्हणून ‘मनोरंजन’ मासिकामधून ‘हिंदू स्त्रियांची दुर्दशा’ ही लेखमाला लिहिली. ‘स्त्रियांचे शिक्षण’, ‘त्यांचे कायदेशीर हक्क’ व ‘स्त्री-स्वातंत्र्य’ या विषयांवरही त्यांनी समाजाचे लक्ष वेधले.

     मराठी कथा वाचकप्रिय करणारे कथाकार, इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठीत शैलीदारपणे रूपांतर करणारे कादंबरीकार, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे विचारवंत आणि मराठी भाषेचा विचार तात्त्विक बाजूने करणारे मराठी भाषाप्रेमी म्हणून कृ.के.गोखले कायम स्मरणात राहतील.

- डॉ. संजय देशमुख

गोखले, कृष्णाजी केशव