घाणेकर, गोविंद ब
गोविंद ब. घाणेकर हे मूळचे साताऱ्याचे. ते मॅट्रिक झाल्यावर अनेक लहानमोठे उद्योग करत असतानाच त्यांची बी.पी.सामंत यांच्याशी गाठ पडली. त्यांच्याकडे ते सुमारे आठ वर्षे म्हणजे १९३३ ते १९४० पर्यंत होते. या काळात त्यांनी मुंबईच्या ‘नवाकाळ’ वर्तमानपत्रातही लेखन केले. घाणेकर १९४० मध्ये ‘प्रभात फिल्म कंपनी’त निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले. ‘प्रभात’च्या परंपरेतले सर्व गुण गोविंदरावांच्या अंगी उपजतच होते. विशेषत: व्यावसायिक शिस्त व कामातील सफाई व कौशल्य या गुणांचा त्यांनी नंतर स्वत: काढलेल्या चित्रसंस्थेत फार उपयोग झाला.
प्रभातच्या ‘संत जनाबाई’ या १९४९ सालच्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. ते १९५१ ते १९५५ पर्यंत ‘फेमस पिक्चर्स’ व १९५५ ते १९६१ पर्यंत ‘इंडियन नॅशनल पिक्चर्स’चे महाव्यवस्थापक होते. या दोन्ही संस्थांसाठी त्यांनी अनेक जाहिरातपट तयार केले. त्यांनी सुधीर फडके यांच्या ‘वंशाचा दिवा’ (१९५०), माणिक चित्रचा हिंदी-मराठी ‘शिवलीला’ व पांडुरंग कोटणीस यांचा ‘भल्याची दुनिया’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.
गोविंदरावांनी जाहिरातक्षेत्रात वेगळं विश्व निर्माण केलं. नंतर १९६१ साली गोविंदरावांनी ‘ट्रायोफिल्म’ नावाची जाहिरातपट काढणारी स्वत:ची चित्रसंस्था सुरू केली. त्यानंतर ‘सह्याद्री फिल्म्स’ ही संस्था काढली.
श्याम बेनेगल यांनी गोविंदरावांच्या संस्थेतच आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली. गोविंदरावांच्या मार्गदर्शनाखाली जाहिरातपट तयार करतानाच श्याम बेनेगल यांच्या प्रतिभेला अंकुर फुटला. त्यामुळे समांतर चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावंत दिग्दर्शक मिळाला.
गोविंदराव हे अतिशय परोपकारी वृत्तीचे ‘भला माणूस’ होते. दादरच्या ‘पाम व्ह्यू’मधील त्यांच्या घरी त्यांचे मित्र ग.दि. माडगूळकर व त्यांचा गोतावळा यांचा कायम राबता असे. आध्यात्मिक वृत्तीचे गोविंदराव हे गुरुदेव रानडे यांचे शिष्य होते.
गोविंदरावांच्या ‘इंडियन नॅशनल पिक्चर्स’ने जाहिरातपटाऐवजी एक मराठी चित्रपट काढायचं ठरवलं. गोविंदराव चित्रपटकलेला फार महत्त्व देत. त्यांनी शहराप्रमाणे ग्रामीण भागातही चालेल अशा कौटुंबिक विषयावर - कुटुंबनियोजनासारख्या राष्ट्रीय समस्येच्या विषयावर चित्रपट काढला. कथा- पटकथा-संवाद-गीते गदिमांनी लिहिली, तर बाबा पाठकांनी दिग्दर्शन केलं. चित्रपट होता ‘प्रपंच’. या चित्रपटाला राज्य सरकारचे सात पुरस्कार तर दिल्लीत सर्व भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. पुढे युनेस्कोने हा चित्रपट विकत घेऊन तो जगातील बेचाळीस भाषांमध्ये डब केला. गोविंद घाणेकर यांचं मुंबई इथे निधन झालं.