जावडेकर, शंकर दत्तात्रेय
शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्म २७ सप्टेंबर १८९४ रोजी मलकापूर संस्थानातील मलकापूर येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रेय जावडेकर हे विशाळगड संस्थानिकांचे खासगी कारभारी होते. वयाच्या दुसर्या वर्षी आचार्यांच्या आईचे निधन झाले. कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलमधून इंग्रजी सहावी झाल्यावर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक आणि १९१८मध्ये तत्त्वज्ञान हा विषय घेऊन मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून ते बी.ए. झाले. एम्.ए.चा अभ्यास चालू असतानाच १९२० साली त्यांनी गांधीजींच्या असहकाराच्या आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे त्यांना पदवी संपादन करता आली नाही. संवेदनक्षम वयात गांधीवादाचा आणि मार्क्सवादाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना १९३०मध्ये, १९३२-३३मध्ये व १९४२मध्ये तुरुंगात जावे लागले. १९३० मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात पुण्याहून गेलेल्या सत्याग्रहींमध्ये ते सहभागी झाले होते.
१९३८पासूनच त्यांना सतत आजारपणाचा सामना करावा लागला. या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपला व्यासंग कायम ठेवला. कार्ल मार्क्स यांच्या ‘कॅपिटल’चा व हॅरॉल्ड लास्कीच्या ‘अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स’चा अभ्यास करून त्यांनी १९२६मध्ये ‘राजनीतिशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. पुण्याच्या टिळक महाविद्यालयात इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकवण्यासाठी त्यांची नियुक्ती केली गेली. त्या वेळी त्यांना ‘आचार्य’ ही उपाझी प्राप्त झाली. १९२० ते १९५५ या कालखंडात महाराष्ट्रातील तरुण पिढीला सत्याग्रही समाजवादाची शिकवण देऊन तिच्यावर बुद्धिवादाचे आणि नैतिकतेचे संस्कार करण्यासाठी आचार्य जावडेकरांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून रचनात्मक कार्य करण्याकडे त्यांच्या मनाचा कल होता.
‘स्वराज्य’, ‘नवशक्ती’ आणि ‘लोकशक्ती’ या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले. भारतीय राजनीती आणि पाश्चात्त्य राज्यशास्त्र यांच्या आधाराने राष्ट्रीय चळवळीला बळ देण्यात जावडेकरांच्या तेजस्वी लेखणीचे विशेष योगदान आहे. विशेषत: ‘लोकशक्ती’च्या माध्यमातून ध्येयनिष्ठ पत्रकारितेची परंपरा आचार्य जावडेकरांनी चालू ठेवली. १९५० ते १९५५पर्यंत रावसाहेब पटवर्धनांबरोबर आचार्य जावडेकर यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची धुरा वाहिली. ‘लोकशिक्षण’ ‘नवभारत’ आणि ‘अखंड भारत’ या पत्रांमधून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले. ते ‘नवभारत’च्या संपादक मंडळांत होते. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील प्रचंड लेखनाने ज्येष्ठ विचारवंत असा लौकिक मिळालेले आचार्य प्रज्ञावंत, तत्त्वचिंतक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते.
राजकीय व सामाजिक विषयांवर मूलगामी विवेचन करणारे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांच्या प्रतिपादनशैलीला बुद्धिवादाची ठाम बैठक लाभलेली आहे. ‘महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांची उत्क्रान्ती’ (१९२१), ‘हिंदी राजकारणाचे स्वरूप’ (१९२४), ‘विश्वकुटुंबवाद’ (१९२९), ‘राज्यशास्त्रमीमांसा’ (१९३४), ‘गांधीवाद’ (१९४५), ‘काँग्रेस आणि महायुद्ध’ (१९४५), ‘लोकमान्य टिळक व गांधी’ (१९४६) आणि ‘गांधी जीवनरहस्य’ (१९४६) इ. ग्रंथ त्यांनी लिहिले.
‘आधुनिक भारत’ हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ होय. पेशवाईच्या अस्तापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या वैचारिक चळवळींचे समालोचन त्यांनी यात केलेले आहे. शंकर जावडेकर यांनी १९४९मध्ये पुण्याला भरलेल्या ३२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणामधून त्यांनी क्रांतिरसाची संकल्पना मांडली. सत्याग्रहाने जनतेचे जडत्व नष्ट केले आणि सत्याच्या आग्रहाची नवी निष्ठा निर्माण केली, असे त्यांनी प्रतिपादन केले. दम्याच्या त्रासामुळेच कोरड्या हवेच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथेच त्यांचे बहुतांश काळ वास्तव्य होते. दम्याच्या विकारानेच आचार्य जावडेकरांचे निधन झाले.
— संपादित