Skip to main content
x

जोशी, पंकज शिवराम

      पंकज शिवराम जोशी भूसेनेच्या अठराव्या गोरखा रायफल्सच्या पलटणीमध्ये कॅप्टन पदावर कार्यरत होते. ही पलटण सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील आघाडीच्या १३ हजार ५२५ फुटांवरील ठाण्यामध्ये तैनात होती. १९६५च्या भारत-पाक युद्धात या पलटणीने खेमकरण विभागात कमालीची मर्दुमकी गाजवली होती.

      १ऑगस्ट१९६७ची ढगाळ आणि पावसाळी पहाट. भारत-चीन सीमेवर पंकज जोशी यांनी नुकताच मोर्चाचा ताबा घेतला होता. त्यांच्या कंपनीला त्यांच्या भोवतालच्या भागात पेरलेले सुरुंग निकामी करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार काम चालू झाले. त्या दिवशी सकाळी जोशी यांनी भूसुरुंगाच्या क्षेत्रात नुकताच प्रवेश केला होता.

     अचानक त्यांच्या पायाखाली मोठा स्फोट झाला. एका सुरुंगावरच त्यांचा पाय पडला होता. ते हवेत उडून जमिनीवर कोसळले. त्यांचा एक पाय गुडघ्याखाली तुटला होता तर दुसर्‍या पायाचा, नडगीखाली चेंदामेंदा झाला होता. पुढील पंधरा दिवसांतच एकामागून एक केलेल्या शस्त्रक्रियांत त्यांचा दुसरा पायही कापावा लागला.

     या अपघातानेही ते डगमगले नाहीत. पुण्याच्या आर्टिफिशिअल लिंब सेंटरमध्ये त्यांनी दोन्ही पाय बसवून घेतले. हळूहळू सायकल चालवणे, पोहणे, अगदी गोल्फ खेळणेही त्यांनी सुरू केले. नंतर १९७१मध्ये त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून स्पॅनिश भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

     त्याच कालावधीत कुणीतरी त्यांना स्टाफ कॉलेज कोर्स करण्यासाठी सुचवले. सैन्यातील सेवेसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा मानला जातो. या कोर्सनंतर अर्थातच त्यांना सैन्याच्या मुख्य प्रवाहात परत येता आले. नंतर मध्य प्रदेशातील महू येथील ‘कॉलेज ऑफ कॉम्बॅट’ या शिक्षण संस्थेत प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. याच काळात त्यांना भरपूर वाचन करण्याची संधी मिळाली.

     नेमका अभ्यास आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांमुळे ते चांगले प्रशिक्षक म्हणून गणले जाऊ लागले. रशियन भाषेतून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. मद्रास (चेन्नई) विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. पदवी घेतली, तसेच नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन डी.सी, येथून त्यांनी ‘नॅशनल सिक्युरिटी मॅनेजमेंट’ या विषयात पदविकाही घेतली. स्वयंचलित चिलखती वाहने त्यांना मिळाली होती. त्यामुळे जलदगतीने शत्रूला नामोहरम करण्याची क्षमता प्राप्त झाली होती. एकदा चिलखती वाहनात बसले की कोणत्याही लढाईत भाग घेणे शक्य आहे याची जोशी यांना खात्री वाटत होती. आता पुन्हा एकदा सैन्याच्या मुख्य प्रवाहात येण्याची ते वाट पाहू लागले.

     जोशी यांना ही संधीही लवकरच चालून आली. एके दिवशी गोल्फ खेळताना त्यांना एका वैद्यकीय तज्ज्ञाने पाहिले आणि पायदळातील सेवेसाठी त्यांची शिफारस केली. सुदैवाने भूसेनाप्रमुख सुंदरजी यांचा त्याला दुजोरा मिळाला. ते पुन्हा पलटणीत दाखल झाले. पुढे कर्नल, ब्रिगेडिअर, मेजर जनरल ही पदेही त्यांनी मिळवली. एका आर्म्ड डिव्हिजनचे त्यांनी नेतृत्व केले. सरते शेवटी ‘चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ हा तिन्ही दलांशी संलग्न असलेला लेफ्टनंट जनरल हा सर्वोच्च हुद्दाही त्यांनी सांभाळला. २००३मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले.

    - वर्षा जोशी-आठवले

जोशी, पंकज शिवराम