Skip to main content
x

काळे, मोरेश्वर रामचंद्र

     संस्कृत कवींच्या पावलावर पाऊल टाकीत, व्यक्तीपेक्षा कार्य श्रेष्ठ हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, संस्कृत साहित्यातील एकंदर वीस कलाकृतींचा इंग्रजी अनुवाद करून संस्कृत जगतावर आपली मोहर उमटणवाऱ्या मोरेश्वर रामचंद्र म्हणजेच मो.रा. काळे यांनी एवढी सर्व पुस्तके लिहूनही; कोणतीही वैयक्तिक माहिती दिलेली नाही. वास्तविक, त्यांच्या समकालीन असणाऱ्या  त्यांच्याप्रमाणेच संस्कृत विश्वासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या गजेंद्रगडकर किंवा इतर विद्वानांनी निदान काही माहिती तरी प्रस्तावनेमध्ये अथवा इतरत्र लिहून ठेवलेली आढळते; परंतु मो.रा. काळे यांनी स्वत:बद्दल अगर इतरांनी त्यांच्याबद्दल कोठे माहिती लिहिली आहेे असे आढळत नाही. अगदी ‘भारतीय संस्कृती कोश’, ‘मराठी विश्वकोश’, ‘अर्वाचीन चरित्रकोश’ यांनीही मो.रां.च्या कामाची दखल घेतलेली नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल.

    परंतु, एवढ्यातच प्रसिद्ध झालेल्या काळे कुलवृत्तान्तामध्ये मात्र त्यांची जी कौटुंबिक माहिती सापडते ती अशी : मो.रा. काळे यांचे दत्तकविधान झाले होते. दत्तकविधानापूर्वीचे त्यांचे नाव दामोदर बाळकृष्ण काळे असे होते. त्यांना दोन भार्या होत्या - पहिली अन्नपूर्णा व दुसरी जानकी व तीन मुली होत्या. काहींच्या मते, त्यांना केवळ एकच पुत्र - व्ही.एम काळे (ज्याचे नाव मेघदूताच्या सहाव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये दिसते, संपूर्ण नाव मात्र सापडत नाही) असून तोदेखील संस्कृत विद्वान होता. मो.रा. काळे यांनी संस्कृत विषय घेऊन आपले बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. ते मुंबईतील विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक होते.

    संस्कृत व इंग्रजी या दोनही भाषांवर सारखेच प्रभुत्व असणार्‍या विद्वानांपैकी ते एक होत. त्यांनी हायर संस्कृत ग्रामर व अनेक संस्कृत नाटकांवर टिप्पणी इ. अनेक पुस्तके लिहिली. काळे कुलवृत्तान्ताप्रमाणे त्यांनी सुमारे ३० पुस्तके प्रसिद्ध केली; परंतु सध्या केवळ वीसच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांची नावे याप्रमाणे :

१. ‘अभिज्ञान शाकुन्तल’, २. ‘मालविकाग्निमित्र’ ही कालिदासाची नाटके; ३. ‘प्रतिमा’, ४. ‘स्वप्नवासवदत्त’ ही भासाची नाटके; ५. ‘उत्तररामचरित’, ६. ‘मालतीमाधव’ ही भवभूतीची नाटके; ७. ‘प्रियदर्शिका’, ८. ‘रत्नावली’, ही श्रीहर्षाची नाटके; ९. ‘मृच्छकटिक   हे  शूद्रकाचे’नाटक व १०. ‘वेणीसंहार’ हे भट्टनारायणाचे नाटक; ११. ‘रघुवंश’, १२. ‘कुमारसंभव’ (सर्ग १ ते ७) ही कालिदासाची महाकाव्ये व १३. ‘किरातार्जुनीयम्’ (सर्ग १ ते ३) हे भारविचे महाकाव्य; १४. ‘मेघदूत’ हे कालिदासाचे खण्डकाव्य; १५. ‘नीतिशतक’ व ‘वैराग्यशतक’ ही भर्तृहरीची शतककाव्ये; १६. ‘पञ्चतन्त्र’, १७. ‘हितोपदेश’ हे कथासंग्रह; १८. बाणभट्टाच्या कादंबरीचा पूर्वभाग, १९. ‘साहित्यसारसंग्रह - काव्य व काव्यप्रकार’ हा साहित्यशास्त्रावर आधारित ग्रंथ आणि २०. Higher Sanskrit Grammar’ हे संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक.

     या सर्व पुस्तकांचे वैशिष्ट्य असे सांगता येईल, की सर्व पुस्तके ही मो.रा. यांनी संस्कृतचा विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लिहिली. बऱ्याच पुस्तकांच्या प्रस्तावनांमध्ये त्यांनी तसे म्हटले देखील आहे. त्यामुळे त्या-त्या साहित्यकृतीच्या लेखकाचा काळ, त्याच्या लिखाणाची वैशिष्ट्ये, त्या साहित्यकृतीची भाषा व भाषेची वैशिष्ट्ये, त्या कृतीची वैशिष्ट्ये, त्या कृतीचे साहित्यातील स्थान, त्या कृतीचा थोडक्यात आढावा, त्यातील पात्रांची व्यक्तिरेखा, तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक चित्र इत्यादी गोष्टीचा सविस्तर विचार त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीस केलेला दिसतो. त्याचप्रमाणे, त्या साहित्यकृतीच्या भाषांतरानंतर आवश्यक त्या शब्दांसाठी, श्लोकांसाठी विश्लेषणात्मक टीपाही जोडलेल्या दिसतात. काळे यांच्या लिखाणाचे अजूनही एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे, पुस्तकाची Critical Edition न काढता ते प्रचलित आवृत्तीच निवडतात. इतर पाठभेदही त्या-त्या ठिकाणी नमूद करतात. तसेच, साहित्य कलाकृतीच्या बरोबरीने त्यावरील संपूर्ण उपलब्ध असणारी टीका निवडून ती देखील प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा कल दिसतो, आणि त्यातही बऱ्याचदा संस्कृत भाषेतील सुप्रसिद्ध टीकाकार मल्लिनाथ याची टीका ते आधिक्याने स्वीकारतात.

      एकूणच मो.रा.काळे यांचे लिखाण पाहता त्यांच्या संस्कृत भाषेवरील अधिकाराचा व विद्यार्थ्यांविषयीच्या कळवळ्याचा प्रत्यय येतो आणि बहुतेक म्हणूनच एका शालेय शिक्षकाने विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी केलेले काम केवळ विद्यापीठीय विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संस्कृत भाषेच्या प्रत्येक अभ्यासकाला आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.

संपादित

काळे, मोरेश्वर रामचंद्र