Skip to main content
x

केसरकर,विजय सदाशिव

     महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आदर्शवत सहकारी ग्राहक चळवळ उभारण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विजय सदाशिव केसरकर हे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर जवळील पेरीड हे होय. विजय यांचे वडील सदाशिव हरी केसरकर नोकरीसाठी कोल्हापूरमध्ये आले. तेथेच विजय यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुंदराबाई होते. वडील गिरणीत कामाला असल्यामुळे त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथील गजानन विद्यालयात झाले. पुढे वडील आजारी पडल्यामुळे त्यांना आपले माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील रात्रशाळेत घ्यावे लागले. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्यावर आजरी वडील, गृहिणी आई तीन बहिणी व भाऊ यांची जबाबदारी पडली. तेव्हा त्यांनी जनावरांचे शेण गोळा करणे, गुळाचे रवे उचलणे, वर्तमानपत्रांचे घरोघरी वाटप करणे यांसारखी कामे केली. रात्रशाळेतून दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर 1950 मध्ये ते शेतकरी सहकारी संघात कामावर रुजू झाले. तेथे त्यांनी सलग 30 वर्षे काम केले. तेव्हाच त्यांचा सहकार चळवळींशी संबंध आला. शेतकरी संघामध्ये कार्यरत असताना त्यांनी गोवा सहकारी बाजार समितीचे 3 वर्षे काम केले.

     केसरकर शेतकरी संघात काम करत असताना त्यांची कार्यपद्धती पाहून तात्यासाहेब कोरे यांनी वारणा बझारची उभारणी करण्याच्या प्राथमिक कामासाठी केसरकर यांना बोलावले. केसरकर यांनी शेतकरी संघात कार्यरत असतानाही 1978 ते 1979 या काळात त्यांनी वारणा बझारच्या उभारणीचे काम मेहनतीने केले व 1980 मध्ये ते पूर्णवेळ वारणा बझारच्या महाव्यवस्थापकपदी कार्यरत झाले.

     भारतात ग्रामीण भागातील पहिले सहकारी ग्राहक भंडार ‘वारणा बझार’च्या रूपाने सुरू झाले. त्यावेळी ग्रामीण भागातील या बझारात विजय केसरकर यांनी ‘सेल्फ सर्व्हिस’ची संकल्पना रुजवली. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीबरोबरीनेच वारणा बझारच्या विकासासही चालना मिळाली. 1000 चौ.मी. जागेत त्यांनी 16 विभाग कार्यान्वित करून ग्राहकांची सोय केली. आडवळणार्‍या ग्रामीण भागात सहकार भांडाराचा प्रयोग केसरकर यांनी आपल्या कामाने यशस्वी करून दाखवला. हा प्रयोग केवळ यशस्वीच झाला नाही तर या सहकारी ग्राहक भांडाराने सहकारी ग्राहक चळवळीला नवी दिशा देण्याचे काम केले.

     केसरकर यांनी 1978 ते 1994 या काळात वारणा बझारच्या सरव्यवस्थापक पदाची धुरा सांभाळली. सध्या ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. अल्पशिक्षित असूनही केसरकर यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर 1978 मध्ये थायलंड व जपान येथील शैक्षणिक अभ्यासदौरे केले. वारणा बझारच्या सेवेतून केसरकर वयाच्या बासष्ठाव्या वर्षी निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ घेण्यासाठी वारणा बझारच्या सल्लागारपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली. वारणा बझारची दोन ग्राहक भांडारे, 55 शाखा व 3 फे्ंरचाईज असा मोठा विस्तार झालेला आहे. 132 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणार हे एकमेव ग्राहक भांडार भारतात आहे.

     वारणेप्रमाणेच महाराष्ट्र आणि गोव्यातील 25 विभाग भांडाराचे सल्लागार म्हणून केसरकर कार्यरत आहेत. शिवाय नाबार्ड अनुदानित व शिवाजी विद्यापीठाच्या मान्यतेचे वारणा बझारच्या वतीने चालविल्या जाणार्‍या विक्रेता प्रशिक्षण अभ्यासक्रमात ते सातत्याने 17 वर्षे मार्गदर्शन करत आहेत. तसेच वारणा बझार सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे.

वयाच्या 81 व्या वर्षी सहकारी ग्राहक चळवळ टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. यासाठी विजय केसरकर यांची धडपड अविरतपणे सुरू आहे.

     - संदीप शिवाजी जंगम

केसरकर,विजय सदाशिव