Skip to main content
x

करंदीकर, गोविंद विनायक

विंदा करंदीकर

वितालेखन विंदा करंदीकर व गद्यलेखन गो.वि.करंदीकर या नावाने.इंग्रजी व मराठी समीक्षक, अनुवादक अशा अनेक क्षेत्रांत व वाङ्मयप्रकारांत लक्षणीय योगदान.त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील  देवगड तालुक्यातील धालवल येथे झाला. प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर मॅट्रिक व महाविद्यालयीन शिक्षण वार लावून कोल्हापूर येथे झाले. तेथील राजाराम महाविद्यालयातील नामवंत प्राध्यापक ना.सी.फडके व माधव जूलियन यांचा विंदा करंदीकर ह्यांच्यावर बराच प्रभाव पडला. त्याच वेळी हैद्राबाद येथील सत्याग्रहात सहभाग व कैदेची शिक्षा. पुढे इंग्रजी विषय घेऊन इ.स.१९९४मध्ये एम.ए.नंतर बागलकोट (कर्नाटक), कागल, रत्नागिरी येथे सुरुवातीला अध्यापन केल्यानंतर  मुंबईला प्रथम रुइया व नंतर स्वेच्छानिवृत्ती घेईपर्यंत एस.आय.ई.एस.महाविद्यालयातअध्यापन केले. १९७६मध्ये ते निवृत्त झाले. ‘स्वेदगंगा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९४९मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यांची कविता प्रामुख्याने ‘मृद्गंध’ (१९५४), ‘धृपद’ (१९५९), ‘जातक’ (१९६८), ‘विरूपिका’ (१९८१) व ‘अष्टदर्शने’ (२००३) या संग्रहांतून प्रकाशित झाली आहे. १९८०मध्ये त्यांनी आपले काव्यलेखन थांबवले. त्याचे कारण सर्जनशक्ती संपली असे नव्हे, तर अत्मोल्लंघनाची कुवत संपली व पूर्वीच्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची बिलकूल इच्छा नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.

बहुपेडी विंदा

करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वावर व कवितेवर आरंभीच्या काळात माधव जूलियनांचा काहीसा प्रभाव असला, तरी ‘स्वेदगंगा’नंतरच्या कवितेने स्वतंत्र वळण घेतले. त्यांचे विविध प्रयोग व आकृतिबंध दिसतात. तालचित्रे, गझल, मुक्त सुनिते, विरूपिका, आततायी अभंग इत्यादी प्रयोगांनी ती समृद्ध झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच सामाजिक जाणीव, सामान्य माणसावर होणारा अन्याय व त्याच्यातील सामर्थ्य व सुप्तशक्तीच्या यांवर दृढ विश्वास, स्त्री-शक्तीच्या सामर्थ्याचा व तिच्यातील आदिमायेचा व आदिशक्तीचा साक्षात्कार व त्याबरोबरच करुणा, यंत्रयुगाचे स्वागत व साम्यवादी विचारसरणीवर श्रद्धा व दृढ विश्वास यांतून जीवनाच्या समग्रतेचा, प्रेमकवीतेतील शारीरिक प्रेमाचा, तृप्तीचा, सफल-विफलतेचा उत्कट आविष्कार ही करंदीकरांच्या कवितेतील काही आशयसूत्रे यांच्या ‘स्वेदगंगा’, ‘यंत्रावतार’, ‘माझ्या मना बन दगड’, ‘ईव्ह’, ‘सरोज नवानगरवाली’, ‘रक्तसमाधी’, ‘दातापासून दाताकडे’, ‘ती जनता अमर आहे’, इत्यादी कवितांतून प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतात.

तत्त्वचिंतनाला काव्याच्या पातळीवरून व्यक्त करण्याचे असाधारण सामर्थ्य, हा ते व केशवसुत-मर्ढेकर ह्यांच्यामधील एक प्रमुख दुवा. उपरोध, फटकळपणा, उपहास आणि अधुनिक तसेच कोकणातील प्रादेशिक लोकजीवन, श्रद्धा, अंधश्रद्धा, रहस्ये यांतून आलेली विलक्षण खोल व समृद्ध प्रतिमासृष्टी ही त्यांची वैशिष्ट्ये जाणवतात. ‘ईव्ह’ हे त्यांना सैतानी बळ न जुमानणार्‍या स्त्री-शक्तीचे प्रतीक वाटते. तसेच ‘मीरा’ हेही विरूपिकेच्या अंगाने उभे केलेले मुक्त स्त्रीचे रूप आहे. ‘संहिता’ या मुक्तसुनीतांमधून ते प्रभावीपणाने व्यक्त होताना दिसते. त्यांची यंत्रनिष्ठा ही त्यांच्या विज्ञाननिष्ठेतून आली आहे. यंत्र हा परमेश्वराचाच एक अवतार वाटतो व त्यामुळे दुःख आणि दारिद्य्र नष्ट होईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यांची विज्ञाननिष्ठा ‘हे आइन्स्टीनपासून ‘आततायी अभंगा’ंपर्यंत विविध वळणांनी व्यक्त होते.

‘गोंधळ’ या दीर्घकवितेतून जुना पारंपरिक गोंधळ या लोकप्रकाराला त्यांनी नवे रूप देऊन हिटलर, मार्क्स, नू यांपासून गांधींपर्यंत सर्वांनाच आमंत्रण देऊन आधुनिक काळातील गोंधळाचे व्यापक रूपक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. करंदीकरांचे कवितेतील व्यक्तिमत्त्व हे दुपेडी नसून बहुपेडी आहे. करंदीकरांच्या कवितेत व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे यांचाही वेगळेपणा आहे. धोंड्या न्हावी, कीर्तन बकी, सरोज नगरवाली, कावेरी, डोंगर, नेहरू, आईन्स्टीन, मर्ढेकर, टिळक वगैरे व्यक्तिचित्रे वेगवेगळे आकृतिबंध घेऊन व्यक्त होतात. क्वचित काही वेळा त्यांच्या कवितेत काहीशी दुर्बोधताही जाणवते. करंदीकरांनी वसंत बापट व मंगेश पाडगावकर यांच्याबरोबर ‘ज्ञानेश्वर ते मर्ढेकर’ हा काव्यवाचन कार्यक्रम करून कविता घरोघरी नेली.

करंदीकरांनी काही अनुवादही केले. त्यात स्वतःच्या कवितेचे ‘पोएम्स् ऑफ विंदा’(१९७५), ‘त्रिमूर्ती’, ‘थ्री मेजर पोएम्स’ (१९७९), ‘सम मोअर पोएम्स ऑफ विंदा’(१९८३) व ‘ओंकार’ (१९९६) हे अनुवाद आहेत. तसेच त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीनीकरण (१९८१) केले आहे. ‘अष्टदर्शने’ (२००३) हा सात पाश्‍चात्त्यदर्शने व एक भारतीय दर्शन यांचा अभंगरूपाने परिचय करून देणारा भाष्य ग्रंथ, हा अभिनव उपक्रम आहे.

लघुनवलनिबंध

कवितेप्रमाणे करंदीकरांनी लघुनिबंध या वाङ्मयप्रकाराला दिलेले नवे वळण लक्षणीय आहे. फडके, खांडेकर, काणेकर  ते ना.मा.संत यांच्या जुन्या लघुनिबंधांपेक्षा नवकाव्य व नवकथा याप्रमाणेच लघुनिबंधानेही कात टाकली व नवा ललित निबंध इरावती कर्वे, दुर्गा भागवत, कुसुमावती देशपांडे यांनी आकारास आणला. करंदीकरांच्या लघुनिबंधावर चेस्टरटन व विशेषतः चार्लस लँम्बचा प्रभाव असला, तरी तो अस्सल भारतीय असून तो रोजनिशी, कथा, कहाणी, पत्र, प्रवास, शब्दचित्र इत्यादी विविध रूपे कशी घेतो, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या ‘स्पर्शाची पालवी’ (१९५८) व ‘आकाशाचा अर्थ’ (१९६५) या दोन संग्रहांतून अधिक लवचीक व प्रवाही केला. त्याला कवितेचा स्पर्श आहे, तसाच तो चिंतनपरही आहे. इरावती कर्वे, दुर्गा भागवत यांचे निबंध सखोल व संशोधनपर आहेत. त्यामुळे त्याला ललित हे विशेष जोडणे त्यांना आवश्यक वाटले असावे. करंदीकर मात्र आपल्या लेखनाला लघुनिबंध किंवा लघुनवलनिबंध असे म्हणतात. अद्भुत, भयानक, वैचारिक व ललित या सर्वांचे त्यांत मिश्रण आहे. त्याला प्रादेशिक स्पर्शही आहे.

लघुनिबंधाप्रमाणेच त्यांच्या बालकविताही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. १९६१ मध्ये त्यांच्या ‘राणीचा बाग’ या संग्रहानंतर त्यांचे एकूण आठ संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. “मुलांच्या आंतरिक जीवनाशी बालकवितेला संवाद साधता आला पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या परीने प्रौढ रसिकतेचे सावधान करण्याचे अंतिम ध्येयही तिला गाठता येईल.” ही करंदीकरांनी व्यक्त केलेली आशा त्यांच्या बालकवितांतून पूर्ण होते. विलक्षण कल्पना, लयबद्धता, अद्भुतता व भयानकता व कोकणातील निसर्गाची रूपे ही त्यांच्या बालकवितेची वैशिष्ट्ये आहेत.

काव्य - अ व्हायटल आर्ट

करंदीकरांनी इंग्रजीत व मराठीतही साहित्य समीक्षा लिहिली तसेच भाष्य व अनुवादही केले. अनुवादात ‘ऑरिस्टॉटलचे काव्यशास्त्र’ (१९५७), ‘फाउस्ट भाग १’ (१९६५) व ‘राजा लियर’ (१९७४) हे अनुवाद व ‘लिटरेचर अ‍ॅज ए व्हायटल आर्ट’ (१९९१) व ‘अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूस’ (१९९७) हे आहेत. करंदीकरांच्या या शेवटच्या पुस्तकाचा अनुवाद ‘साहित्य मूल्यांची समीक्षा’ या नावाने प्रा.आ.ना.पेडणेकर यांनी २००६ मध्ये केला आहे. त्यांच्या इंग्रजी व मराठी समीक्षा-लेखनांतून त्यांचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो. कला हा माणसातील सर्जनशक्तीचा आविष्कार आहे, असे ते मानतात व काव्याला ते एक जीवनवेधी कला ‘अ व्हायटल आर्ट’ मानतात. ‘परंपरा व नवता’ (१९६७) या ग्रंथामधील समीक्षा-लेखांतूनही कोणत्याही विशिष्ट सिद्धान्ताचा आग्रह न धरता ते कलाविषयक खुला दृष्टिकोन मांडताना दिसतात. निरनिराळ्या विचारप्रणाली ह्या जीवनावर व कलेवर टाकणारे प्रकाशझोत आहेत, असे ते समजतात. आपली जीवनविषयक व कलाविषयक जाणीव अधिक सखोल व डोळस करण्यासाठी त्यांचा त्यांना जरूर उपयोग झालेला आहे. मात्र कुणाही कलावंताने किंवा कवीने एखाद्या विशिष्ट विचारप्रणालीच्या आहारी जाऊन आपल्या प्रतिभेचा संकोच करू नये. आपला दृष्टिकोन खुला ठेवावा, असे आपण मानत असल्याचे त्यांनी डॉ. विजया राजाध्यक्षकृत ‘दुपेडी विंदा- खंड २’च्या ‘नवा दृष्टिकोन’मध्ये व्यक्त केले आहे.

आयुष्यात त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. त्यांची यादी मोठी आहे. त्यांमध्ये २००३चा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार (२००६)याचा समावेश आहे. त्याशिवाय एन.सी.आर.टी. (४ पुरस्कार), महाराष्ट्र शासन (१०पुरस्कार), सीनिअर फुलब्राइट पुरस्कार, जनस्थान, सेव्हिएत लॅन्ड, जनपथ, कबीर, साहित्य अकादमी पुरस्कार,  असे विविध सन्मान त्यांना लाभले. पुरस्कारांतून मिळालेली जवळ-जवळ सात लाख रुपयांची रक्कम त्यांनी झोपडपट्टी निर्मूलन, वेश्यांच्या एड्सग्रस्त मुलींचे पुनर्वसन, भूकंप, दुष्काळ निवारण, मराठी भाषा व साहित्यभवन वास्तू  व माधव जूलियन व्याख्यानमाला इत्यादी विविध सार्वजनिक संस्थांना उदार-विचारे वाटून टाकली. पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांनी अमेरिका व रशिया येथे प्रवासही केला. समग्र मानवी जीवन आपल्या काव्य व अन्य साहित्यातून कवेत घेण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवतो.

- डॉ. प्रल्हाद वडेर

करंदीकर, गोविंद विनायक