Skip to main content
x

क्षीरसागर, गजानन दामोदर

     गजानन दामोदर क्षीरसागर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांनी शिक्षण मोठ्या कष्टाने पूर्ण केले. शिक्षणाला मदत व्हावी म्हणून ते वृत्तपत्रे टाकीत आणि इतरही कामे करीत. बी.ए. झाल्यावर त्यांनी रीतसर कारकुनाची नोकरी धरली. एल.आय.सी. या सरकारी संस्थेत निवृत्तीपर्यंत नोकरी केली की क्षीरसागर सुखाने निवृत्त झाले असते. पण त्यांचे मन त्या कारकुनीत रमत नव्हते.

     क्षीरसागरांचा पिंड साहित्यिकाचा होता. त्यांचे अक्षरही सुंदर होते. मित्रही साहित्यिक वर्तुळातले होते. त्यांच्या सहवासात क्षीरसागरांना लिहावेसे वाटणे साहजिक होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी रहस्यकथा आणि विज्ञानकथांचे अनुवाद केले. काही विज्ञान कादंबर्‍याही मराठीत आणल्या. तरीही ते अस्वस्थच असत. अखेरीस काहीतरी वेगळे करायचे या ईर्षेने त्यांनी चांगली नोकरी सोडली आणि विज्ञानप्रसाराचा वसा घेऊन एका नव्या पर्वाला सुरुवात केली. त्यासाठीच त्यांनी ‘विज्ञानयुग’ हे मासिक सुरू केले आणि त्याबरोबर ‘अनिरुद्ध प्रकाशन’ ही संस्थाही स्थापन केली. ‘विज्ञानयुग’ त्यांनी जवळजवळ एकहाती चालवले.

     ही संस्था आणि त्यांचा संसार सदाशिव पेठेतील त्यांच्या दोन बाय दोन मीटरच्या दोन खोल्यांत चालत असे. पुढे त्यांचे कार्यालय एका बंगल्याच्या गॅरेजमध्ये गेले. क्षीरसागरांचे शिक्षण विज्ञानशाखेशी संबंधित नव्हते, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी प्रा. प्रभाकर सोवनी, डॉ. मो. वा. चिपळोणकर, ग. स. काजरेकर, शं. ल. चोरघडे, ना. वा. कोगेकर, भालबा केळकर यांचे संपादकीय मंडळ स्थापन केले आणि क्षीरसागर या संपादकीय मंडळाचे सचिव म्हणून कार्य करू लागले. अंकावर सरकारी नियमानुसार जरी संपादक म्हणून त्यांचे नाव होते, तरी पहिल्या भेटीतच ‘मी तो हमाल, भारवाही’, ही भूमिका ते स्पष्ट करीत. असे असले तरी त्यांचे वृत्तपत्रातील बातम्यांवर बारीक लक्ष असे. यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन काही घडले की ते लगेच मंगळवारच्या संपादकीय सभेत तो विषय चर्चेला आणीत.

     यामुळेच १९६९ साली माणूस चंद्रावर उतरताच ‘विज्ञानयुग’चा ‘चंद्रावतरण’ अंक बाजारात आणणे त्यांना शक्य झाले. यानंतर क्षीरसागरांनी एक नवी रूढी रुळवली. दरवर्षीचा दिवाळी अंक एकाच विषयावर, एकाच लेखकाकडून लिहून घ्यायचा. असे अनेक प्रयोग त्यांनी केले. काही दिवाळी अंक ‘विज्ञानकथा विशेषांक’ म्हणून प्रकाशित केले. या आणि इतर अंकांमध्येही प्रस्थापितांबरोबर त्यांनी अनेक नवोदितांना आवर्जून स्थान दिले. त्यांच्या लेखांवर, कथांवर संपादकीय संस्करण करून त्या साहित्याचा दर्जा वाढवला. कित्येक लेखमालांचे त्यांनी पुस्तकरूपानेही प्रकाशन केले. कित्येक विज्ञानसाहित्यिकांना त्यांनी अशा रीतीने घडवले आहे.

     एकदा विषय ठरला की क्षीरसागर, तो लेखक आणि ‘विज्ञानयुग’चे संपादक यांच्याशी चर्चा करून पुस्तकाचा आराखडा तयार करीत. त्याची एक प्रत लेखकाला देत, एक स्वत:जवळ ठेवत. प्रत्येक प्रकरण लिहून झाले की लेखक, तज्ज्ञ संपादक यांची चर्चा घडवून आणत. मुद्रण-प्रत तयार झाली, की प्रत्येक प्रकरणामध्ये घालायच्या चित्रांची यादी आणि त्या चित्रांची जागा निश्चित करीत. पुस्तक छपाई सुरू झाली, की स्वत: एकदा आणि लेखकाला एकदा मुद्रितशोधन करायला लावीत. यामुळे अनिरुद्ध प्रकाशनाच्या अनेक पुस्तकांना राज्य पुरस्कारांसह इतरही अनेक पुरस्कार मिळाले. ‘महासागर’, ‘दूरचित्रवाणी’, ‘वसुंधरा’, ‘विज्ञानाचे शतक’ आणि इतरही अनेक चांगले ग्रंथ क्षीरसागरांमुळे निर्माण झाले. याशिवाय, क्षीरसागरांनी भालबा केळकर, ना. वा. कोगेकर आदी अनेक लेखकांची शंभराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांचे हे योगदान विसरून चालणार नाही. मराठी विज्ञान परिषदेने ‘विज्ञानयुग’  मासिकाला सन्मानपत्र दिले. तो क्षीरसागरांचाच सन्मान होता. मराठीमधून विज्ञान प्रसार करणार्‍या संस्थांमध्ये क्षीरसागरांच्या अनिरुद्ध प्रकाशनाचे, विज्ञानयुगचे आणि क्षीरसागरांचे स्थान फार वरचे आहे हे निश्चित.

     प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी ‘विज्ञानयुग’चे प्रकाशन बंद केले. पण त्यांचा जीव त्यातच अडकलेला होता. कारण, त्यानंतर थोड्याच काळात, पुण्यातच त्यांचे निधन झाले.

निरंजन घाटे

क्षीरसागर, गजानन दामोदर