Skip to main content
x

क्षीरसागर, कमलाकर कृष्ण

मलाकर कृष्ण क्षीरसागर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील तारापूर-चिंचणी येथे झाले व माध्यमिक शिक्षण पेरुगेट भावे विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे झाले. त्यांनी बी.एस्सी. (जनरल), एम.एस्सी. या पदव्या पुणे विद्यापीठातून प्राप्त केल्या. त्यांनी पुणे विद्यापीठातून १९७६ मध्ये भारतीय मधमाशांचा तौलनिक अभ्यास या विषयात पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांनी १९५९मध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या रेशीम संशोधन संस्थेत संशोधक साहाय्यक म्हणून डॉ.गो.बा.देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम कीटक व रेशीम निर्मितीविषयक संशोधनास सुरुवात केली.

त्या दृष्टीने पाचगणी, महाबळेश्‍वर, पुणे या भौगोलिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करून एरंडी रेशीम व तुती रेशीमनिर्मितीच्या दृष्टीने संशोधन प्रकल्पांची आखणी झाली. त्याबरोबरच जंगली रेशीम कीटक जातींपैकी टसर आणि मुगा रेशीम कीटकांचे संगोपन करण्याचेही प्राथमिक प्रयोग झाले. तुती रेशीम कीटकांसाठी तुतीच्या विविध प्रकारच्या पानांचा तुलनात्मक उपयोग केला गेला. कीटकांचे अंडीपुंज मैसूरच्या रेशीम कीटक संशोधन संस्थेतून मिळवले. त्यासाठी तुती वनस्पतींच्या विविध वाणांची प्रायोगिक लागवड व त्यांचा आहाराच्या व वाढीच्या दृष्टीने तौलनिक अभ्यासही सुरू झाला. हे प्रयोग सुमारे ४-५ वर्षे करून महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या भौगोलिक कृषी परिस्थितीला अनुकूल असे वाण निवडले व ते शेतकऱ्यांपर्यंत पालनासाठी वितरित केले. याच अनुवंशिक निवडपद्धतींबरोबर एरंडी, तुती व टसर जातींच्या गुणसूत्र संख्या निश्‍चितीसाठी कोशिकाशास्त्रानुसार अभ्यास करण्यात आला. पैकी एरंडी आणि तुती रेशीम कीटकांच्या कृत्रिम बाह्य बीजफलन प्रयोगातून तुती कीटकांचे चार उत्पादन वाण निर्माण झाले. त्यावरचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर करण्यात आले. मूळ म्हैसूर मातृप्रकारांपेक्षाही हे वाण अनेक गुणधर्मांच्या दृष्टीने सरस ठरले. महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग खात्याने या मूलभूत प्रयोगांची दखल घेऊन तुती लागवड व कीटक संगोपनापासून रेशीम वस्त्रनिर्मिती व विक्रीपर्यंतच्या योजनांना अधिकृत मान्यता व चालना दिली आणि हा कृषीपूरक ग्रामीण व्यवसाय महाराष्ट्रात स्थिरावला.

डॉ. क्षीरसागरांनी रेशीम कीटक अनुवंशशास्त्रांतर्गत काही शोधनिबंध प्रसिद्ध केले व रेशीमनिर्मिती व्यवसायावर दोन मार्गदर्शक पुस्तके लिहिली. ते १९६४मध्ये अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या पुणे येथील केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे डॉ.गो.बा. देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मधमाशा कीटकशास्त्र विभाग व प्रशिक्षण प्रमुख म्हणून काम केले. मधमाशांचे विकृतिशास्त्र, जंगली आग्या मधमाशा (अ‍ॅपिस डोरसाटा), फुलोरी मधमाशा (अ‍ॅपिस फ्लोरा), घुंघुरट्या मधमाशा (ट्रिगोना इरिडपेनिस) यासंबंधीचेही मूलभूत संशोधन केले; ते पूर्वीचे तंत्रज्ञान सुधारण्यास साहाय्यभूत ठरले.

डॉ. क्षीरसागर यांनी सर्व प्रकारच्या भारतीय मधमाशांच्या मोहोळातील राणीमाशी, कामकरीमाशी आणि नर मधमाशी या तीनही घटकांच्या जीवसांख्यिकी, वर्तनवैशिष्ट्ये आणि विकृतिशास्त्रासंबंधीचा तुलनात्मक, संशोधनात्मक अभ्यास केला. त्याचप्रमाणे मधमाशांच्या विविध प्रकारांची मूळ उत्पत्ती व कालानुरूप त्यांचा विकास होतो हे समजण्यास मदत होईल, असा तौलनिक संशोधनावर आधारित प्रबंध सादर करून पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. भारतातील पाळीव सातेरी मधमाशा जगातील मधमाशांच्या ज्ञात घातक विकृतीपासून मुक्त होत्या, परंतु १९५०च्या सुमारास त्यांच्या मोहोळातील विविध कौटुंबिक घटक आणि त्यांच्या जीवनचक्रातील चारही वाढीच्या अवस्थांमध्ये काही रोगांचा प्रादुर्भाव दिसला. या विषयांवर डॉ.क्षीरसागर यांनी सर्वांगीण मूलभूत संशोधन केले, त्यामुळे मोहोळांचे त्यासाठीचे विशेष व्यवस्थापन प्रमाणित करणे शक्य झाले व मोहोळांच्या विनाशावर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळवता आले.

डॉ.क्षीरसागरांचे सुमारे ५० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांची मधमाशा व रेशीम कीटकपालन या विषयांवर आणि अन्य वैज्ञानिक विषयांवर २५हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. यापैकी तीन पुस्तकांना नामवंत पुरस्कार मिळाले आहेत. डॉ.क्षीरसागर मधमाशा व रेशीम व्यवसायासंबंधीच्या तीन राष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्य आहेत. अखिल भारतीय मधमाशापालक संघाचे त्रैमासिक संशोधनपर मुखपत्र ‘इंडियन बी जर्नल’ याच्या संपादक मंडळाचे ते सदस्य होते व संस्थेच्या कार्यकारिणीचेही ते सदस्य आहेत. याशिवाय ‘विज्ञानभारती’ या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणार्‍या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत. विज्ञानप्रसार कार्यासाठी त्यांना डॉ.मो.वि.चिपळोणकर विज्ञान पुरस्कार, स्वा.सावरकर ग्रंथ पुरस्कार,  हरिभाऊ मोटे विज्ञान प्रसार पुरस्कार, विज्ञान कथा पुरस्कार, महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ पुरस्कार, महाराष्ट्र दीप हे  पाच पुरस्कार मिळाले आहेत.

- संपादित

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].