Skip to main content
x

कुलकर्णी, गुरुनाथ आबाजी

जी. ए. कुलकर्णी

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव मुक्कामी झाला. त्यांचे वडील कोर्टात कारकून होते. जी.ए. लहान असतानाच ते वारले. जी.ए. शाळेत जाऊ लागल्यानंतर त्यांच्या आईचेही निधन झाले. बहिणीदेखील अकाली वारल्या. त्यांचे अंतःकरण विदीर्ण झाले. त्यांना भाऊ नव्हता, ते स्वतः अविवाहित राहिले. आपल्या मावशीच्या (सोनू मावशी) कुटुंबावर त्यांचा फार जीव होता. तिच्या मृत्यूनंतर तिच्या नंदा व प्रभावती या दोन मुलींचा संभाळ जी.एं.नी केला. शाळकरी वयात ते आपल्या श्री.पु. मामाकडे बेळगावातच राहत.

१९३९साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि इंग्रजी विषय घेऊन त्यांनी लिंगराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी. ए. झाल्यांनतर पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी विषय घेऊनच चालू ठेवले व एम. ए. झाले. नंतर काही काळ ते मुंबईस सरकारी कचेरीत नोकरी करत होते. १९४७ला ते बेळगावला परत आले आणि एका हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. नंतर त्यांनी कुमठा, विजापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले आणि नंतर धारवाडला जनता शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख व वसतिगृह प्रमुख म्हणून १९५० पासून १९७९पर्यंत काम केले. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. पण भगिनी प्रभावती गंभीर आजारी झाल्याने ही संधी त्यांना स्वीकारता आली नाही. ते धूम्रपान करीत. त्यांना खमंग सामीष भोजन आवडत असे. पत्त्यांचा रमी हा डाव त्यांना अत्यंत प्रिय होता. इंग्रजी चित्रपट पाहण्याचा व बागकाम करण्याचा, त्यांना छंद होता. त्यांचे वाचन अफाट होते. पाश्‍चात्त्य लेखकांची दुर्मिळ पुस्तके ते प्रयासाने मिळवून वाचत. अनेक ग्रंथालयांचे ते सदस्य होते. चित्रकला, संगीत या कलांत ते रस घेत. ब्रिटीश काळात स्थापन झालेल्या धारवाड जिमखान्याचे ते निष्ठावंत सदस्य होते. इंग्रज गृहस्थासारखे त्यांचे वागणे होते. ते अलिप्तपणे वावरत. त्यांची विनोदबुद्धी वैशिष्ट्यपूर्ण होती. १९८५ साली ते पुण्यास बहिणीकडे राहावयास गेले. त्या अगोदर दोन वर्षे ते पोटदुखीने आजारी होते. जुजबी औषधोपचार घेत होते, पण फार खर्चिक उपचार आपल्याला परवडणार नाहीत असे त्यांना वाटे. या संदर्भात मित्रांचे साहाय्य घ्यायचे नाही, असे त्यांनी ठरविले होते. प्रभावतीवर ते सर्वस्वी अवलंबून होते. आपले ओझे कुणावर टाकावे, याचा ते निग्रहाने विरोध करत होते. पुणे मुक्कामी वयाच्या ६३व्या वर्षी ११ डिसेंबर १९८७ मध्ये त्यांचे निधन झाले.

जी.एं.चे अकरा कथासंग्रह, इंग्रजीतून मराठीत अनुवादीत केलेली बारा पुस्तके आणि मनमोकळ्या आठवणींचे एक पुस्तक, इंग्रजी-मराठी भाषेत मित्रांना, परिचितांना, साहित्यिकांना लिहिलेली शेकडो पत्रे; ती मौज प्रकाशनाने चार खंडांत प्रसिद्ध केली आहेत. मुलांना सांगितलेल्या कथांचे दोन संग्रह, त्यांच्या लेखनावरची समीक्षेची चौदा पुस्तके प्रसिद्ध आहेत. पदव्युत्तर स्तरावर त्यांच्या कथांचा अभ्यास झालेला आहे.

पुरातन संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला होता. इजिप्त व दक्षिण अमेरिकन संस्कृतीबद्दल त्यांना अधिक कुतूहल होते. तसेच रिचर्ड बर्टनबद्दलही होते. असांकेतिक, अनोख्या, आक्षेपार्ह मानवी व्यवहारासंबंधी त्यांना प्रचंड कुतूहल होते, काहीसे अनैसर्गिकदेखील. त्याचप्रमाणे काही अमानुष सिद्धी, शक्ती साध्य करण्यासाठी जी साधना काही माणसे गुप्तपणे करतात, तिची माहिती मिळवणे हादेखील त्यांच्या कुतूहलाचा भाग होता. ही माहिती त्यांचा महाविद्यालयामधला गडी तिरकाप्पा त्यांना देत असे. कर्नाटकाच्या काही भागात जारणमारण ही अघोरी विद्या आजमितीसदेखील प्रचलित आहे. जी.एं.च्या ‘अंजन’, ‘तळपट’ यांसारख्या कथा त्याचे स्मरण देतात. पारंपरिक धर्माचरण, अध्यात्म यावर जी.एं.चा विश्वास नव्हता. धार्मिक ग्रंथांचा उल्लेख त्यांच्या कथांत आढळत नाही. उलट अंधश्रद्धेतून क्रौर्यच निर्माण होते, असे त्यांची ‘अमांसी’सारखी कथा सुचवते. आपल्या प्रभावती या बहिणीला मात्र ते मंदिराकडे नेत असत. रक्ताचे नातेसंबंध मात्र त्यांनी धार्मिक निष्ठेने जपले होते. त्यांची ‘स्वामी’सारखी कथा मात्र लोकविलक्षण आध्यात्मिक अनुभूतीचे दर्शन घडविते. पुनर्जन्मावर त्यांचा कदाचित विश्वास असावा, असे ‘पुनरपि’ या कथेवरून ध्यानात येते. आदिम संस्कृतीतल्या माणसाचे अनुभव आणि व्यवहार अभ्यासले, तर या संदर्भातील काही सत्य कदाचित हाती लागेल असे काही वेळा त्यांना वाटत असावे. पण तोही एक भ्रमच अशीही त्यांची धारणा होती. ज्याला नियती म्हटले जाते, तीच माणसांची आयुष्ये निर्धारित करते; हा सारा कळसूत्राचा खेळ आहे. लौकिक अर्थाने याला योगायोग म्हटले जाते, पण हे नियतिदानच होय.

जी.एं.च्या कथांना महाकाव्याची प्रतिष्ठा आणि व्याप्ती आहे, असे काही समीक्षकांना वाटते; तर काही दुसर्‍या समीक्षकांना त्यांनी कथेसारख्या दुय्यम दर्जाच्या वाङ्मय प्रकारात गुंतून न पडता कादंबरीकडे वळायला हवे होते असे वाटते. याबद्दल स्वतः जी.ए. यांनी एक महत्त्वाचा लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, “मी केवळ कथा लिहिल्या, कारण हा साहित्य प्रकार मला आव्हानात्मक वाटतो. कथा-लेखन हा कादंबरी-लेखनासाठी केलेला रियाज आहे, असे समजण्यात येते. अनेक कथाकारांच्या कर्तृत्वाचा विचार केला, तर हा समज गैर ठरतो. कथेला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. लघुकथेच्या लघुत्वामुळे ती लघुकथा बनत नाही. ती दीर्घ होऊ शकते. तिच्या अंतर्गत लहानमोठी वर्तुळे आणि तिरप्या तिरकस रेषा असू शकतात आणि तरी कोळ्याने विणलेल्या जाळ्याला जसा केंद्रबिंदू असतो, त्याचप्रमाणे लघुकथेलाही एक सेंद्रीय  स्वरूपाचे केंद्र असते. नदीचा उगम आणि अंत निश्चित झाले की मध्यंतरी ती कुठेही वाहू शकते. प्रवाहाची गती वाढते, कमी होते, रंगही बदलतो, चिंतनमग्न होतो, स्थिरावतो. कादंबरी नदीप्रमाणे विशाल होते. पण लघुकथेलाही एक झगमगणारा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे तिची जडणघडण स्पष्ट होते. याचा अर्थ असा नव्हे की, लघुकथा हा कादंबरीपेक्षा श्रेष्ठ साहित्य प्रकार आहे. लघुकथेची प्रतिज्ञा आणि स्वरूप वेगळे असते. केवळ रंजन करणे लघुकथेचे प्रयोजन असत नाही. हे अगदी मामुली प्रयोजन होय. त्यापेक्षा गहिरे असे प्रयोजन लघुकथा मानते. स्थलकाळात असणारी मानवी आयुष्याची सुख-दुःखे आणि त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य त्याचे दर्शन घडवण्याचा, वेध घेण्याचा प्रयत्न गंभीर प्रकृतीचा कथाकार करीत असतो.’

जी.एं.नी चार प्रकारच्या कथा लिहिल्या १)पारंपरिक पद्धतीच्या कौटुंबिक कथा ज्यांचा दुःखान्त शेवट असतो. २)मानवी व्यवहारात काही घटना व संघर्ष मूलभूत स्वरूपाचे असतात, त्यांच्या कथा. ३)आधुनिक काळाशी संदर्भित रूपक कथा अगर बोधकथा. ४)ग्रीक अगर पाश्चिमात्य साहित्यातील गाजलेल्या कथांचा आधुनिक काळाशी सुसंगत अर्थ व्यक्त करणार्‍या कथा.

‘माणूस नावाचा बेटा’ या कथेमुळे जी.एं.नी वाचकांचे लक्ष वेधून घेतले. जी.एं.चे कथामन समजून घेण्यासाठी ही कथा बीजभूत आहे. त्यांचे चिंतन, वाचन व त्यांची प्रकृती हे सारे त्यांनी या कथेत भरभरून ओतले आहे.

इंजिनिअर होण्याची आकांक्षा धरणारा दत्तू एका बुरसट शाळेत शिक्षक म्हणून चिकटतो. आपल्या सभोवती पसरलेल्या ढिगातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. चारचौघांसारखा सकल संसार त्याला नको होता. त्याच्या समोरची कार्टी मोठी होणार होती. आपल्यासारखी पोरं जगावर सोडणार होती, या सार्‍यांना टचाटचा चिरडून टाकावे असे दत्तूला वाटले. त्यांपैकी दोघा-तिघांनाच आपण रंगून शिकवलेली ‘औदुंबर’ ही कविता कळणार, बाकी सारे काडेचिराहीत -

शाळेच्या जंजाळातून बाहेर पडून दत्तू संध्याकाळच्या तरल पिवळ्या प्रकाशात उतरला आणि सुखद अलिप्ततेची छाया त्याच्या मनावर पसरली. तो विचार करू लागला, काय आहे हे? आणि हे पाहत असलेला दत्तू तरी कोण? तो हे पाहत आहे हे कुणीतरी पाहत आहे, आणि तो हे पाहत आहे, हे कुणीतरी पाहत आहे हे पाहणारे आणखी कुणी- पण ही त्याची भावना फार वेळ टिकली नाही. वार्‍याने दूर गेलेले ओलसर वस्त्र पुन्हा येऊन अंगाला चिकटावे, तसे त्याचे सारे जीवन त्याला चिकटले. त्या गुंतवळ्यात तो सापडला. हॉटेलात बकाबका खाणार्‍या लोकांकडे पाहून त्याला वाटले काय साम्य आहे आपल्यात आणि त्यांच्यात, निवळ ऐंद्रिय आवडीनिवडीतही सारखेपणा नाही. एक जण थुलथुलीत ढिसाळ बाईकडे पाहून विरघळतो, तर दुसर्‍याला तिच्यामुळे वैराग्य वाटू लागते.

आपल्याकडील थोर माणसांची चरित्रे म्हणजे नुसती रद्दी. जिवंत माणसांचा साक्षात्कार त्यात नाही. निवळ वासनेचे शरीर कधीच जळले नाही. रागाच्या भरात शब्द गेल्याने अगदी जिव्हाळ्याच्या जागी कधी जखम झाली नाही, वा पश्चात्तापाने मन कधी कुरतडले गेले नाही. कधी मोहाने, कधी महत्त्वाकांक्षेने कुणाचा तरी विश्वासघात करून आयुष्यभर वणवण करण्याची कुणावर पाळी आली नाही. आपली चरित्रे म्हणजे वाङ्मयात मांडून ठेवलेली एकसाची सहस्रलिंगे. त्यात कानकाप्या व्हनगॉग, जुगारी डोस्टोव्हस्की, लिंगपिसाट मोपसॉ आहेत कोठे? आपल्या जीवनावर विलासाची कळा कधी आलीच नाही.

दत्तूला दिसत होते की, एकट्याची या जगात फसवणूक चाललेली असते. फर्स्ट क्लास म्हणून दिलेले कलिंगड अ‍ॅनिमिया झालेले निघते. कुठले तरी पदक मिळालेला राष्ट्रीय चित्रपट भिकार, शेंबडा ठरतो. तासापूर्वी आणलेला बल्ब लावताच पटकन खल्लास होतो. भारतीचा ताप उतरेल म्हणून ऐटीत डॉक्टर सांगतात व नंतर पंधरा दिवसांतच तिचे डोळे मिटतात. खेळायला म्हणून दिलेले आठ आण्याचे नाणे तिच्या मुठीत तसेच असते. सगळीकडून फसवणूक, फसणारा मात्र एकटा.

खरेच माणसाची आयुष्ये म्हणजे पिसलेले पत्ते, त्यातून आकृती तरी काय काढायची? एखादी वेडी पतीच्या मृत्यूने छातीत सुरी खुपसून घेते तर दुसरी चेंगरलेल्या स्तनांमध्ये लॉकेट रुतवून घेते. एक जण तारुण्याच्या आठवणीवर आयुष्याला धार लावीत बसतो तर दुसरा पत्नीच्या मृत्यूनंतर १४व्या दिवशी बोहल्यावर चढतो. मालकंसाचा भव्य विस्तार, मोटरखालची किंकाळी, बाळंत होत असतानाचा आक्रोश, विमान हल्ल्याचा मन फाडणारा आवाज, प्रेत बाहेर नेत असतानाची कालवाकालव हे सारे जीवनाचे भागच आणि ती भोगणारी सारी माणसेच. बेलसेनमध्ये कैद्यांना जाळणारी माणसेच आणि हिरोशिमामध्ये अपंग झालेली हजारो माणसेच व तो प्रसंग त्यांच्यावर आणणारीही! आपले मांस कपोतांना देणारा शिबी आणि नररुंडांचा गोपूर रचणारा तैमूर, क्रूसावर हातापायांत खिळे ठोकल्यावर वेदनेने ‘देवा त्यांना क्षमा कर!’ असे उद्गार काढणारा ख्रिस्त आणि त्याच क्रूसाखाली त्याचे कपडे कुणाला मिळावेत यासाठी कवड्या खुळखुळाविणारे पहारेकरी ही सारी माणसेच! या सार्‍याच बिंदूंना घेऊन जाणारे वर्तुळ ते कोणते? सगळा आंधळा सिक्वेन्स न देणारा वेडा डाव! आपण सारेच एक अनिवार्य शिक्षा भोगणारे गुन्हेगार आहोत. सगळा नुसता वांझोट्या, म्हातार्‍या प्रश्नांचा जनानखाना, त्यात त्याचे दुबळे मन कचुंकीप्रमाणे निष्फळ हिंडत असे. या सगळ्याचा निर्माता एखाद्या क्षुद्र आयुष्यात डोकावितो, माणसाच्या खर्‍याखोट्या गोष्टी नोंदून घेतो व त्याप्रमाणे शिक्षा, बक्षिसे वाटत बसतो! यावर आपले नीती, धर्म आधारलेले. सगळीकडे नुसता शून्यांचा बुजबुजाट. अर्थ असलेला आकडा कुठेतरी लपून राहतो आणि आपल्या स्पंदनाने शून्याचे बुडबुडे उडवून फोडीत बसतो. असल्या अर्थशून्य जीवनात साफल्य शोधायचे कुठे? हा जी.एं.च्या कथांतील नियतीवाद व शून्यार्थ!

‘निळासावळा’ (१९५९), ‘पारवा’ (१९६०), ‘हिरवे रावे’ (१९६२), ‘रक्तचंदन’ (१९६६), ‘काजळमाया’ (१९७२), ‘सांज शकून’ (१९७५), ‘रमलखुणा’ (१९७५), ‘पिंगळावेळ’ (१९७७), ‘कुसुमगुंजा’ (१९८९), ‘आकाशफुले’ (१९९०), ‘सोनपावलं’ (१९९१), ‘बखर किमची’ (१९८६), ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ (१९८६), ‘माणसे आरभाट आणि चिल्लर’ (मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले) हे जी. एं.चे कथासंग्रह व इतर पुस्तके होत.

जी.एं.ना आपल्या मित्रांना, चाहत्यांना पत्रे लिहिण्याचा अनिवार छंद होता. ते त्यांचे सिगरेटसारखे व्यसनच होते. त्यांच्या देहावसानानंतर त्यांच्या या प्रचंड पत्रव्यवहाराचे जतन करावे व तो रसिकांसाठी व अभ्यासकांसाठी उपलब्ध करून द्यावा या हेतूने कै.पु.ल. देशपांडे, सौ.सुनीता देशपांडे, श्री.श्री.पु.भागवत, श्री. रामदास भटकळ व प्रा.म.द. हातकणंगलेकर यांची एक समिती स्थापन झाली. ज्या लेखक, वाचक, प्रकाशक यांच्याकडे जी.एं.ची पत्रे असतील आणि ज्यांना या कामाचे महत्त्व पटले असेल, त्यांनी आपल्याकडील पत्रे प्रसिद्धीसाठी समितीकडे पाठवावीत असे समितीने आवाहन केले. त्यानुसार अनेक पत्रे जमली. त्यात सुनीताबाई, श्री.पु., माधव आचवल, ग्रेस आणि अन्य मित्र म.द.हातकणंगलेकर, जयवंत दळवी यांना लिहिलेली पत्रे होती. या पत्रांचे चार खंड प्रसिद्ध झाले आहेत. ते श्री.पु. भागवत, म.द. हातकणंगलेकर, सुरेश चुनेकर, विजय पाडळकर यांनी संपादित केले. जी.ए. जनसंपर्कापासून, साहित्यिक मंडळांपासून, मित्रांच्या मेळाव्यांपासून दूरच राहिले. त्यामुळे साहित्यिक जगातल्या सांकेतिक मानसन्मानांपासून ते दूरच राहिले. दोन सन्मान त्यांना मिळाले. एक इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’चा व दुसरा ‘साहित्य अकादमीचा’. अकादमीचे पारितोषिक त्यांना त्यांच्या ‘काजळमाया’ या कथासंग्रहाला मिळाले. ते त्यांनी स्वीकारले पण दुर्दैवाने ते त्यांना काही तांत्रिक कारणासाठी परत करावे लागले.

आधुनिक मराठी लघुकथेच्या क्षेत्रात जी.ए. यांनी कथाकार म्हणून अतुलनीय निर्मिती केली आहे. कै.गंगाधर गाडगीळ या मराठी नवकथेच्या प्रणेत्याला मान्य नव्हते. जी.ए.कुलकर्णी हे प्रतिभावंत कथाकार होते, पण ते भोवर्‍यात सापडलेले प्रतिभावंत होते, असे त्यांनी म्हटले होते. जी.ए. कुलकर्णी हे हर तर्‍हतर्‍हेच्या सतरंज्या तयार करून बाजार काबीज करण्याची ईर्षा बाळगणारे लोकप्रिय कथाकार नव्हते. तर मंद दिव्याच्या प्रकाशात एकेक टाका घालून अभिजात गुणवत्तेचे गालिचे विणणारे कलावंत होते. या गालिच्यांचे मूल्य कालातीत असते. विशिष्ट कालखंडातच गाजावाजा होऊन विसरले जाणारे नव्हते. त्यामुळे अनेक समीक्षकांनी व अभ्यासकांनी त्यांच्या कथेचे विश्लेषण व गुणगान करण्यात धन्यता मानली. डॉ. द.भि. कुलकर्णी, त्र्यं.वि. सरदेशमुख, एस.डी. इनामदार, प्रा.रा.ग. जाधव, डॉ.सं. त्र्या. कुल्ली., म.द.  हातकणंगलेकर, धों.व. देशपांडे, माधव आचवल, पंडित आवळीकर, धनंजय आचार्य आणि अन्य वाचक-अभ्यासक यांनी जी.एं.च्या कथांवर अनेक अंगांनी आपला अभ्यास, रसग्रहणे मांडली. त्यांच्या देहावसनानंतर जी.ए.भक्तांची अनेक मंडळे ठिकठिकाणी स्थापन झाली. त्यांची जयंती आणि मयंती भक्तिभावाने साजरी होते.

- म. द. हातकणंगलेकर

कुलकर्णी, गुरुनाथ आबाजी