Skip to main content
x

कुलकर्णी, सखाराम धोंडिबा

कुलकर्णी, सदुभाऊ

       खाराम धोंडिबा कुलकर्णी ऊर्फ सदुभाऊ कुलकर्णी यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. डी.एड. पर्यंतचे शिक्षण पंढरपूर येथेच झाले. कोरे गुरूजी, भागवताचार्य वा.ना.उत्पात व प्रा. बाळासाहेब बडवे यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शाळेत असताना नाटक, नकला, वक्तृत्व, पाठांतर या सर्व स्पर्धांमध्ये सखाराम यांना दरवर्षी बक्षिसे मिळत. सखाराम उर्फ सदुभाऊ यांना वाचनाची अत्यंत आवड होती. सावरकर साहित्य, ऐतिहासिक कादंबऱ्या या सर्वांबरोबरच पंढरपूर येथे होणारी सर्व विषयांची व्याख्याने, प्रवचने, किर्तने तसेच नाटके त्यांनी भरपूर पाहिली, ऐकली.

     त्यांना सामाजिक कामाची आवड होती. सावरकर प्रेमी मंडळ व चौफळा तरूण येथून त्यांच्या सामाजिक कामाला सुरूवात झाली. वक्तृत्वाला अभ्यासाची व अनुभवाची जोड मिळाली. नंतर शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या प्राथमिक शाळेत १९७२ मध्ये शिक्षक म्हणून ते रुजू झाले. मुलांना शिकविण्याबरोबरच नृत्य, नाट्य, वक्तृत्व, खेळ, कथा या सर्व प्रकारच्या  कलांचा त्यांनी आधार घेतला. नाट्यप्रेमाच्या आवडीतून १९८८ मध्ये बालरंगभूमीची स्थापना केली. त्यांचाच बाल वाद्यवृंदही तयार केला. या सर्व कामाची दखल घेतली जाऊन १९९४ चा ‘ल. ग. देशपांडे’ पुरस्कार सदुभाऊंना मिळाला.

     शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या प्रशासकीय मंडळावर व नियामक मंडळावरही शिक्षक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. २५ वर्षे शिक्षकाची नोकरी केल्यावर स्वेच्छा निवृत्ती पत्करून वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याकडे ते वळले. वनवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘एकल विद्यालय’ चालवली जातात. एकल विद्यालय म्हणजे एक शिक्षकी शाळा. शिक्षणाच्या माध्यमातून सुरूवात करून टप्प्याटप्याने आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती प्रशिक्षण, सामाजिक संस्कार हे विषय त्याला जोडले जातात. मे १९९८ पासून सदुभाऊ एकल विद्यालयाचे काम करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात हरसूल येथे राहिले. सुरूवातीच्या काळात आवारे गुरूजींचे मार्गदर्शन त्यांना लाभले. दिवसभर या भागातील पाड्यावरची वनवासी मुले आपल्या कामात असतात. संध्याकाळच्या वेळेत या मुलांना शिकवायला जावे लागते. सर्व वयोगटातील मुलांना गोळा करून त्यांचे खेळ ते घेतात. गाणी, गोष्टी सांगतात. नंतर मुलांना लिहायला, वाचायला शिकवितात. गोष्टींच्या माध्यमातून इतिहास, भूगोल, शास्त्र शिकविले जाते. परीक्षा नसते. कोणी विशेष शिकेल असे वाटले तर त्याला जवळच्या वनवासी विद्यार्थी वसतीगृहात पाठविले जाते. बाकीच्या मुलांना निदान लिहायला, वाचायला येते. सही करता येते. सावकार किंवा बँकेचे व्यवहार करता येतात. सुरूवातीला सदुभाऊंच्या कार्याला गावातील काही लोकांनी त्रास दिला. पण त्या विरोधाला न जुमानता सदुभाऊ व त्यांच्या बरोबरीचे कार्यक्रम नेटाने काम करीत राहिले. एकल विद्यालयातर्फे सर्व पालकांची अशी ग्रामसमिती तयार केली. त्या द्वारे मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्याबरोबरच, गावातील सर्व सण उत्सव ‘गावाचे’ म्हणून साजरे केले जातात. गावात उत्सव असला की लोक दारू पित नाहीत. नाहीतर दारू व वनवासी बांधवांचे जन्मजात नाते! पण धार्मिक संस्कारामुळे, दारू बंद होते. गावात आरोग्य योजनाही राबविली. त्यांनी वनवासी बंधू आवारे गुरूजींकडून औषधांची माहिती करून घेतली. रुग्णाला जुजबी, तातडीचे उपचार करून नंतर तालुक्याच्या दवाखान्यात भरती करता येऊ शकते.

      याच बरोबर वनवासी बांधवांना, मुलांना जंगलात मिळणार्‍या आवळा, मध, हिरडा, बेहडा तसेच अनेक फळे व कंद हे गोळा करुन त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली. नाशिक जिल्ह्यातील, पेठ, सुरगाणा व त्र्यंबक तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका येथे एकल विद्यालयांची संकुले कार्यरत आहेत. ही संकुले सुरू करण्यातही सदुभाऊ कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा आहे.

- शरद कुंटे

कुलकर्णी, सखाराम धोंडिबा