कुंटे, महादेव मोरेश्वर
ऐतिहासिक काव्य रचण्याची प्रथा सुरू करणारे महादेव कुंटे हे कृष्णेच्या काठी माहुली येथे जन्मले. लहानपणीच त्याचे पितृछत्र हरपल्याने व गरिबीमुळे कोल्हापुरात माधुकरी मागून त्यांचे शिक्षण झाले. मुंबईत नशीब काढण्यासाठी पोचलेले कुंटे १८५९ मध्ये विल्सन हायस्कूलमधून मॅट्रिक व एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून बी.ए. झाले. मुंबई सरकारच्या शिक्षण खात्यात नोकरी करताना त्यांची बदली कराची, पुणे, कोल्हापूर येथे प्रमुख अध्यापक म्हणून झाली. कोल्हापूर येथे त्यांनी जुन्या पद्धतीप्रमाणे संस्कृतचा सखोल व व्यापक अभ्यास केला होता. मुंबई व अहमदाबाद येथील सरकारी महाविद्यालयात काही काळ ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मराठी शिवाय इंग्रजी, संस्कृत, सिंधी, गुजराती या भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे ते त्या भाषांतून अस्खलित भाषण करीत. ग्रीक, पर्शियन व लॅटिन भाषांचेही ते जाणकार होते.
कुंटे यांची ख्याती ‘राजा शिवाजी’ या रचनेच्या दृष्टीने अपूर्ण पण अभिव्यक्तीदृष्ट्या अपूर्व काव्यामुळे विशेष झाली. इंग्रजी ‘हिरॉइक एपिक’ मराठीत आणणे एवढेच त्यांना अभिप्रेत नव्हते. या काव्याच्या इंग्रजी प्रस्तावनेत त्यांचा हेतू स्पष्ट झाला आहे. ‘अशिक्षित व सुशिक्षित यांना राष्ट्रहितासाठी एकत्र आणले पाहिजे. यासाठी सर्वांना समजेल व आवडेल अशा सरळ व नित्य व्यवहारातील भाषेचा प्रयोग केला पाहिजे.’ संस्कृतनिष्ठ भाषाभिमानी पुणेरी पंडितांचा आदर्श मोडल्यामुळे कुंटे यांच्यावर खूप टीका झाली होती. उच्चारानुसारी भाषेची ही ‘छान तर्वार उप्सून’ आलेल्या त्यांच्या ‘राजा शिवाजी’चा सामना ‘मराठी भाषेच्या शिवाजी’शी झाला. स्वतंत्र काव्यदृष्टीने जाणीवपूर्वक ‘रोमँटिक स्टाइल’मध्ये काव्य लिहिणारा त्या काळातील हा एकमेव कवी होय. कुंटे यांनी ‘राजा शिवाजी’वर सोप्या भाषेत महाकाव्य लिहिण्याचा अभिनव प्रयोग केला. या काव्याचे भाग १ ते ३ (१८६९) व भाग ४ ते ६ (१८७१) प्रसिद्ध झाले. कुंटे यांचा व्यासंग व पांडित्य त्यांच्या ‘षडदर्शन चिंतनिका’ १८७७ ते १८८२ या काळात मासिकरूपाने प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात तसेच ‘व्हिसिसिट्यूड्स ऑफ आर्यन सिव्हिलायझेशन इन इंडिया’ यांमध्ये दिसते. यातल्या पहिल्या ग्रंथाची पृष्ठसंख्या (डेमी आकार) २७७५ आहे.
कुंटे यांच्या मृत्यूमुळे हा ग्रंथ अपूर्ण राहिला. दुसरा ग्रंथ ६०० पृष्ठांचा असून तो १८८० मध्ये प्रकाशित झाला. भ.श्री.पंडित म्हणतात, “कुंट्यांची काव्ये सरस नसली व त्यांत अनेक दोष असले, तरी त्यांनी काव्याच्या क्षेत्रात उलथापालथ घडवून आणली... जुनापुराणा काव्यविषयक दृष्टिकोन पालटला.” कुंटे यांनी ‘मन’ ह्या नावाचे २५५ श्लोकांचे काव्य रचून १८७२ साली प्रसिद्ध केले होते. तसेच ‘ऋषी’ नावाचे ७७० ओळींचे काव्य इंग्रजीत लिहून १८७८ मध्ये प्रसिद्ध केले. अनाथ झालेल्या वामन शिवराम आपटे यांना त्यांनी मदत केली. कुंटे यांच्या काळात तरी त्यांच्या तोलाचा चिकित्सक व व्यासंगी पंडित महाराष्ट्रात झाला नाही.