Skip to main content
x

खोबरेकर, विठ्ठल गोपाळ

        पुराभिलेख व पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक व इतिहास संशोधक डॉ. विठ्ठल गोपाळ खोबरेकर यांचा जन्म पूर्वीच्या रत्नागिरी व आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कवठी येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मालवण येथेे व पुढील उच्च शिक्षण मुंबईतील सेंट झेविअर कॉलेजमधून झाले. त्यांनी १९५३ साली मराठ्यांच्या सत्तेचा दक्षिणेकडील विस्तारया विषयावर प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठाची एम.ए. पदवी संपादन केली व कोकणचा इतिहासलिहून पीएच.डी. पदवी मिळवली. १९५४ साली महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख खात्यात संशोधक साहाय्यक म्हणून प्रवेश केला. १९५८-६० या काळात बडोदे दप्तरखान्याचे प्रमुख म्हणून काम केले. १९६०-६९ या काळात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागाचे साहाय्यक संचालक म्हणून काम पाहिल्यावर १९६९-८१ या काळात ते पुराभिलेख व पुरातत्त्व विभागाचे संचालक झाले. इंग्रजी सत्तेविरुद्धचा महाराष्ट्रातील सशस्त्र उठावगुजरातेतील मराठी राजवटया दोन ग्रंथांमुळे इतिहास संशोधक म्हणून ते प्रसिद्धीस आले.

त्यांनी वरीलशिवाय अनेक सन्माननीय जागांवर कामे केली. ते लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो होते व इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्डस कमिशन आणि इंडियन हिस्टरी काँग्रेस या संस्थांचे १५ वर्षे सभासद होते. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून व महाराष्ट्र राज्य पुराभिलेख व पुरातत्त्व मंडळाचे चिटणीस म्हणूनही १५ वर्षे काम केले. मुंबई व एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्व अभ्यास मंडळाचे सभासद, मुंबई येथील इतिहास संशोधन मंडळाचे सभासद, सचिव व संचालक आणि भारतीय इतिहास आणि संस्कृतीया त्रैैमासिकाचे संपादक म्हणून ते कार्य करत होते.

डॉ. खोबरेकर यांची पुराभिलेख व इतिहास संशोधनातील इतर कामगिरी अशीच उल्लेखनीय आहे. ते १९७२ मध्ये मॉस्को येथे भरलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय पुराभिलेखाधिकारी परिषदेच्या अधिवेशनास राज्य प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यानंतर ते लंडनला कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसंबंधी कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी जाऊन आले. भारतातील प्रमुख दप्तरखान्यातील ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केला. तंजावर, इंदोर, मद्रास, दिल्ली, गोवा, बिकानेर वगैरे ठिकाणी असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या साधनांचे अवलोकन केले. पेशवे दप्तर (पुणे) व कोल्हापूर रेकॉर्ड ऑफिसमधील मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांची वर्णनात्मक सूची तयार करण्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली आणि या चार लाख कागदपत्रांची सूची चार खंडात प्रसिद्ध केली.

महाराष्ट्रातील दप्तरखानेया त्यांच्या संशोधनात्मक ग्रंथास १९७० सालातील उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पारितोषिक मिळाले. ते अनेक इतिहास परिषदांमध्ये सहभागी होऊन आपले स्वतःचे शोध निबंध वाचत असत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाचे ते सुरुवातीपासून - म्हणजे १९६८पासून मानद संचालक होते. इतिहास संशोधन मंडळातर्फे त्यांनी अनेक वेळा इतिहास परिषदांचे आयोजन केले, तर एकवीस वेळा चर्चासत्रे आयोजित केली. त्यांनी अनेक व्याख्यानांचे आयोजन केले, तसेच स्वतः अनेक व्याख्याने दिली. इ.स. १९८१ व १९८४ या दोन वर्षी त्यांनी नागपूर व अमरावती विद्यापीठाच्या इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवले होते. त्यांनी तीसपेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती केली. त्यात अधिकतर साधनग्रंथांचाच समावेश दिसतो. अनेक ठिकाणी वाचलेल्या व प्रकाशित केलेल्या त्यांच्या ऐेतिहासिक शोध निबंधांची संख्या शंभरपेक्षा अधिकच भरेल. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी मूळ कागदपत्रांवरून केला असून शिवकालीन ऐतिहासिक कागदपत्रेतारीख-इ दिलकशाअसे शिवकालावरील कागदपत्रांवर आधारित साधनग्रंथ संपादित करून प्रसिद्ध केले. अभ्यासूंसाठी शिवकालाची साधनचिकित्सा लिहून इतिहास आणि संस्कृतीया त्रैमासिकाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज त्रिशत्सांवत्स समारोह संशोधकीय विशेषांकप्रसिद्ध केला.

महाराष्ट्राबाहेरील ज्या स्थळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले, त्या त्या स्थळी जाऊन त्याबद्दलचे निरीक्षणात्मक अहवाल त्यांनी शासनाला सादर केले आहेत. त्यांचा शिवकालाचा व्यासंग दांडगा होता.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या इतिहासाचा पेशवे कालखंडलिहिण्याचे काम सोपवले होते. ते त्यांनी सातशे पृष्ठे लिहून पूर्ण केले. त्यांचा मराठ्यांच्या स्वार्‍यांचे मुक्कामहा ६१० पृष्ठांचा साधनग्रंथ त्यांच्या संशोधन चिकाटीची, श्रमाची व इतिहास ज्ञानाची साक्ष देतो. मराठ्यांनी राज्यविस्तारासाठी दक्षिण व उत्तर हिंदुस्थानात व इतरत्र अनेक स्वार्‍या केल्या. (इ.स. १७०७-१८०३) प्रत्येक स्वारीत सैन्याने कोणत्या गावी, कोणत्या तारखेस व किती दिवस तळ दिला, याची जंत्रीवजा माहिती पेशवे दप्तरातून टिपून ती या ग्रंथात साधार दिलेली आढळते. मराठी लष्करांच्या तळांचे कालज्ञान इतिहासावर प्रकास टाकत असल्याने पेशवे काळाच्या अभ्यासकांना हा एक उपयुक्त मौलिक साधनग्रंथ म्हणून महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्रात इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यावर ठिकठिकाणी जे सशस्त्र उठाव झाले, त्याची माहिती त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध महाराष्ट्रातील सशस्त्र उठावया आपल्या ग्रंथात दिली आहे.

इ.स. १८५७ ते १९४७ या कालखंडात स्वातंत्र्याकरिता जे सशस्त्र उठाव झाले, बंडे झाली त्यासंबंधीच्या हकिगतीची तत्कालीन कागदपत्रे अभ्यासून ती पाच खंडात अर्काईव्ह्ज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध केली आहेत. महाराष्ट्रातील सव्वीस जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्य आंदोलनासंबंधीची जी कागदपत्रे होती, ती त्यांनी अभ्यासली असून इतिहास अभ्यासकांना त्यांचा उपयोग होण्यासाठी ती त्यांनी औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, मुंबई येथील अभिलेखागारात आणून जपून ठेवण्याची कामागिरी केली. त्यांनी इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (खउकठ) या संस्थेकडून फेलोशिप मिळवून कोकणचा सामाजिक व आर्थिक इतिहास’ (१६५०-१८१८) पुरा केला.

- डॉ. आर.एच. कांबळे

खोबरेकर, विठ्ठल गोपाळ