Skip to main content
x

मेश्राम, केशव तानाजी

     केशव मेश्राम हे सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथून एम.ए. (मराठी) झाले. त्यांना प्रारंभी मोलमजुरीची हलकी-सलकी कामे करावी लागली. नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्याच काळात ‘रूपगंधा’ नियतकालिकात काम केले. पुढे, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच रेल्वे खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन ते महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. तेथील एक वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी मुंबई येथे, महर्षी दयानंद सरस्वती महाविद्यालयात अध्यापनकार्य केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातही प्रपाठक व विभागप्रमुख म्हणून सेवा केल्यानंतर नोव्हेंबर १९९७ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले.

     चिंतनशील कवी

     वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतून लेखन करणार्‍या मेश्रामांचा मूळ पिंड कवीचा होता. ‘कविता’ हा त्यांचा विशेष आवडीचा साहित्यप्रकार. ‘रहस्यरंजन’ विशेषांकात त्यांची ‘मेळा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली (१९५८). त्यानंतर त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले. ‘उत्खनन’ (१९७७), ‘जुगलबंदी’ (१९८२), ‘अकस्मात’ (१९८४), ‘चरित’ (१९८९), ‘कृतकपुत्र’ (२००१), ‘अनिवास’ (२००५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. डॉ. सुमतेन्द्र नाडिग यांच्या मूळ कन्नड भाषेतील चिंतनकाव्याचा त्यांनी ‘दाम्पत्यगीता’ हा मराठी भावानुवाद केला.

     दलित कवितेच्या प्रारंभ काळातील एक प्रमुख कवी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. सर्व प्रकारच्या अनुभवांना मोकळेपणाने सामोरी जाणारी त्यांची कविता असून पारंपरिक लयीतील, तसेच मुक्तछंदात्मक लयीतील काव्यलेखनातून त्यांचे काव्यमूल्य सिद्ध होते. समाजातील दैन्य, दारिद्र्य, विषमता व जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील अनास्था भाव हे त्यांच्या काव्यलेखनाचे विषय होत. नव्या पिढीच्या ध्येयशून्य तडजोडीची वेदनाही त्यांच्या काव्यात उमटलेली दिसते. म्हणूनच ‘निसर्गाच्या विविध कळा - त्यांतल्या सर्व तरल छटांसह रंगवणार्‍या मेश्रामांच्या लेखनात शहरी जीवनातील रूक्ष व कडवट अनुभव तीव्रपणे चित्रित झालेले आहेत,’ असे शांता शेळके यांना वाटते.

     सर्वच काव्यसंग्रहांतून सामाजिक दुःखाची आच व्यक्त होते. जीवनातील रूक्ष, कडवट अनुभव काव्यात मांडताना त्यांच्या शब्दांना तीक्ष्ण शस्त्राची धार येते. ते वृत्तीने आत्मरत असले तरीही त्यांची सामाजिक बांधीलकीशी निष्ठा होती. ‘उत्खनन’, ‘जुगलबंदी’ ह्या काव्यसंग्रहांमध्ये धर्मव्यवस्थेने लादलेल्या मानहानीच्या जीवनाविरुद्ध विद्रोहाचे भावप्रकटन आले आहे. ‘चरित’, ‘कृतकपुत्र’, ‘अनिवास’मध्ये त्यांची प्रखर आंबेडकरवादी जाणीव व्यक्त होते. गतकाळाचे वास्तव नजरेसमोर ठेवून वर्तमानाला सामोरी जाणारी त्यांची कविता असून ‘आत्मपीडेकडून आत्मशोधाचा प्रत्यय’ हा त्यांच्या कवितेचा स्थायिभाव आहे.

     ‘हकिकत’ आणि ‘जटायू’ (१९७२) व ‘पोखरण’ (१९७९) ह्या प्रसिद्ध कादंबर्‍या आहेत. ‘हकिकत’मध्ये ‘स्व’चे वास्तवदर्शन, तर ‘जटायू’मध्ये अंधश्रद्धेला बळी ठरणार्‍या अस्पृश्य वर्गातील तरुणाच्या मनाची घुसमट दिसते. समाजव्यवस्थेतील जळजळीत अनुभवांची मांडणी त्यात आहे. ‘हकिकत’ आत्मनिवेदनाचा घाट असलेली, तर ‘जटायू’, ‘आम्ही’च्या समूहभावाने निवेदित होत जाणारी अभिव्यक्ती. ‘जटायू’ हे एक मिथ आहे. (दुर्बल घटकांसाठी रक्तबंबाळ होणारा रामायणातील ‘जटायू’-मिथ.) ‘हकिकत आणि जटायू’ ही कलाकृती आत्मकथन, स्वकथन, दीर्घकथा की कादंबरी?, असा प्रश्न पडतो. परंतु, ही कलाकृती म्हणजे आत्मकथा निवेदन करणारी कादंबरीच होय.

     ‘पोखरण’ ही दुसरी कादंबरी. या कादंबरीत आर्य - अनार्य अशा दोन विचारसरणींची मांडणी केली आहे. धम्मिल हा आर्य संस्कृतीचा प्रतिनिधी. जामालिन ही अनार्यांचे प्रतिनिधित्व करणारी टोळी. टोळी समूहाने राहणारा आदिम समाज आपली वसाहत कशी तयार करतो आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण कसे करतो, याचे या कादंबरीत दर्शन होते. ‘आदिम प्रवृत्तीच्या असंस्कृत लोकांतील आत्मशोधाच्या जाणिवेतून दलितत्वाचा शोध’ हे या कादंबरीचे सूत्र आहे. यालाच ‘पुरावास्तवाच्या शोधाचे’ सूत्रही म्हणता येईल. ह्या दोनही कादंबरी लेखनाच्या प्रयोगामुळे मेश्रामांचे मराठी दलित कादंबरी विश्वातील स्थान अढळ झाले आहे.

     त्यांचे ‘खरवड’, ‘पत्रावळ’, ‘धगाडा’, ‘मरणमाळा’, आदि नऊ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या कथालेखनात सामाजिक विषमता, अस्पृश्यता, अन्याय - अत्याचार, अपमान, विटंबना, अवहेलना, गुन्हेगारी अशा वास्तवाचे चित्रण आहे. त्यातून दलितत्वाची जाणीव प्रामुख्याने अभिव्यक्त झालेली आहे.

     याशिवाय ‘सातपुड्यातील खजिना’ (१९७८) हा त्यांचा बालकथासंग्रह प्रसिद्ध आहे. प्रा.म.द. हातकणंगलेकर यांनी मेश्रामांच्या निवडक कथांचा ‘ज्वाला कल्लोळ’ (१९९६) हा संग्रहही संपादित केला आहे. मेश्रामांच्या सर्वच कथांतून समाजवास्तवाचे दर्शन घडते.

     ‘छायाबन’ (१९७३), ‘रुतलेली माणसे’ (१९८२), ‘गाळ आणि आभाळ’ (१९७९), ‘गळतीचे क्षण’ (१९९७), ‘ओलाव्याचे ठसे’ (२००४) इत्यादी ललितगद्यसंग्रहातून दलित जीवनातील दुःखपूर्ण अनुभवाच्या आकांताची मांडणी असली तरी त्यात एक भावस्पर्शी काव्यात्मता आहे. हे ललितगद्य वाचताना ‘गद्यकाव्य’ वाचत असल्याचा प्रत्यय येतो. ह्या ललित निबंधात चिंतनशीलता, आत्मपरता, उत्कटता, कल्पनारम्यता व सौंदर्यदर्शन इत्यादी गुणांचा मेळ असल्याचे प्रत्ययास येते.

     समाजदृष्टिकोनातून समीक्षा

     मेश्रामांची ‘समन्वय’ (१९७९), ‘शब्दांगण’ (१९८०), ‘बहुमुखी’ (१९८४), ‘प्रश्नशोध’ (१९७९), ‘साहित्य-संस्कृती मंथन’, ‘साहित्य प्रवर्तन’, ‘प्रतिभा स्पंदने’ आदी समीक्षेची ग्रंथसंपदा आहे. ह्या समीक्षाग्रंथात संत साहित्य, दलित साहित्य, नवसाहित्य, आधुनिक साहित्य, ग्रामीण साहित्य, शाहिरी वाङ्मय, धर्म संकल्पना, समाज परिवर्तनाची बदलती दिशा, साहित्यातील तात्त्विक, सैद्धांन्तिक व आस्वादनाच्या पातळीवरचे हे समीक्षालेखन आहे. त्यांची समीक्षादृष्टी जशी आस्वादकाची, तशीच ती समाजचिंतकाचीही आहे. म्हणूनच, त्यांच्या समीक्षालेखनात वाङ्मयाच्या निर्लेप आस्वादनाबरोबरच समाजशास्त्रीय, मानवतावादी, समतावादी, प्रबोधन, आणि परिवर्तनवादी अशाही वृत्तींचा आढळ होतो. ‘समन्वय’, ‘बहुमुखी’ तसेच ‘विद्रोही कविता’ या संपादित काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतून त्यांचा ‘काव्यविचार’ प्रामुख्याने व्यक्त झाला आहे.

     ‘डॉ. आंबेडकर चिंतन’ (१९९२) व ‘दलित साहित्य आणि समाज’ (२००५) ही वैचारिक लेखनाची दोन पुस्तके त्यांनी लिहिली. ‘डॉ. आंबेडकर चिंतन’ या ग्रंथातून त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तित्व-विचाराचा वेध घेतला आहे. आंबेडकरी चळवळीचा ज्वलंत इतिहास असून ‘दलित साहित्य आणि समाज’ या ग्रंथातून दलित साहित्याच्या सामाजिक बांधीलकीविषयीची चर्चा- चिकित्सा आहे.

     ‘विद्रोही कविता’ (१९७८), ‘वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध’ (२००७) ही संपादने त्यांनी केलेली असून, ‘दलित साहित्यातील स्थितिगती’ (१९७९) आणि ‘नवी विद्रोही कविता’ (२००६) ही संपादनेही त्यांनी अनुक्रमे उषा मा.देशमुख आणि डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या सहकार्याने केली आहेत. मुंबई साहित्य संघाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन विशेषांकाचे संपादनही त्यांच्या नावावर आहे (१९८६). ही सर्व संपादने त्यांच्या साक्षेपी संपादनाची साक्ष आहेत.

     याशिवाय साहित्य - संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, कायदा व सल्लागार मंडळ इत्यादी मंडळांवर त्यांनी सदस्य म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय असून महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधन समितीवरही ते सदस्य होते. दूर शिक्षण संस्था, मुंबई विद्यापीठ: एम.ए. (मराठी)च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपुस्तके तयार करवून घेणे आणि मार्गदर्शन करणे हेही कार्य त्यांनी सांभाळले. तसेच, जनताशिक्षण प्रसारक मंडळ, अलिबाग, जि. रायगड या संस्थेत समन्वयक म्हणून त्यांनी काम केले.

     मेश्रामांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. त्यांत अस्मितादर्श लेखक-वाचक मेळावा (१९७८), मुंबई उपनगर साहित्य संमेलन, विलेपार्लेे, मुंबई (२००१), कामगार साहित्य संमेलन-अकरावे, पिंपरी, चिंचवड, पुणे (२००४), मराठी कोकणी नवोदितांचे साहित्य संमेलन-नववे, पुणे (२००४), आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलन, नाशिक (२००५) अशा काही महत्त्वाच्या साहित्य संमेलनांचा समावेश होतो.

     मेश्रामांना वाङ्मयीन योगदानासाठी विविध पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांत म. सा. परिषदेचा डॉ.भालचंद्र फडके पुरस्कार (२०००), दलित समीक्षा पुरस्कार (२०००), महाराष्ट्र फाउण्डेशनचा पुरस्कार (२००३), शाहू- फुले परिवर्तन अकादमीचा लेखक सन्मान पुरस्कार (२००३), जीवन गौरव पुरस्कार (२००५) ह्या पुरस्कारांचा समावेश असून महाराष्ट्र शासनाचे: कवी केशवसुत पुरस्कार (‘उत्खनन’), विशेष पुरस्कार (‘चरित’), आणि कादंबरी लेखनासाठी ह.ना.आपटे पुरस्कार (‘हकिकत’ आणि ‘जटायू’), विशेष पुरस्कार (‘पोखरण’) इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. ‘पत्रावळ’ आणि ‘धगाडा’ या कथासंग्रहांसाठी महाराष्ट्र शासनाचा दिवाकर कृष्ण पुरस्कार, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कर्‍हाड पुरस्कार प्राप्त झाला आहे.

     राष्ट्रीय काव्य चर्चासत्र, पटणा - बिहार (१९८८), साहित्य अकादमी, शिलाँग-मेघालय (२००३), जपानमधील टोकियो येथील चर्चासत्र, तसेच गोवा स्वातंत्र्यदिन सार्वभाषिक कविसंमेलनात मराठी भाषेचे प्रतिनिधी म्हणून मेश्रामांचा सहभाग होता.

     मराठी दलित साहित्यातील कविता आणि कादंबरी या साहित्यप्रकारांना त्यांचे विशेष योगदान आहे, असे म्हणता येईल.

- डॉ. शोभा रोकडे

मेश्राम, केशव तानाजी