Skip to main content
x

नाईक, जगन्नाथ विश्राम

     राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले, महाराष्ट्राच्या विद्यापीठीय  क्षेत्रातील इतिहास-शिक्षक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या, विशेषत: एकोणिसाव्या शतकाच्या इतिहासाविषयी मोलाचे संशोधन करणारे ख्यातनाम अभ्यासक जगन्नाथ विश्राम नाईक यांचा जन्म गोव्यातील सावर्डे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. त्यांचे वडील विश्राम जगा नाईक हे एक छोटे दुकानदार होते; पण त्यांचे मराठी साहित्याचे चौफेर वाचन होते आणि मोडी लिपीत ते सफाईदारपणे आपली दैनंदिनी व पत्रे लिहीत असत.

     कोकणी व मराठी भाषांच्या संस्कारात वाढलेल्या जगन्नाथ यांनी पुढील शिक्षणात हिंदी व इंग्रजी भाषा आत्मसात केल्या आणि संशोधनाच्या निमित्ताने फ्रेंच आणि पोर्तुगीज भाषांचे जुजबी ज्ञानही प्राप्त केले. १९६० मध्ये मुंबई विद्यापीठाची इतिहास विषयातील एम.ए. ही पदवी प्राप्त केल्यावर प्रथम एल्फिन्स्टन  महाविद्यालयात (१९६०-६२) व त्यानंतर मुंबईच्याच इस्माइल यूसुफ शासकीय महाविद्यालयात (१९६२-७३) त्यांनी इतिहासाचा व्याख्याता म्हणून नोकरी केली.

     त्यांची उर्वरित कारकीर्द मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात (१९७३-९४) पार पडली. ३१ मे १९९४ रोजी प्राध्यापक व विभाग-प्रमुख पदावरून ते निवृत्त झाले. प्रा. नाईक सुमारे अर्धशतकाहून अधिक काळ संशोधनात मग्न राहिले. तसेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम.फिल. व पीएच.डी. या पदव्या मिळवल्या. या प्रवासात प्रा. नाईक यांना मुंबई येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये गणिताचे अध्यापन करणार्‍या त्यांच्या पत्नी नीला नाईक यांची साथ लाभली.

     अभिलेखागारे व ग्रंथालये यांमधील अस्सल कागदपत्रांच्या आधारे सुमारे अर्धशतकभर संशोधन-साधना करणारे प्रा. ज.वि. नाईक यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी जी  मोलाची कामगिरी केली, ती ग्रंथांपेक्षा शोधनिबंधांच्या रूपाने अधिक ज्ञात आहे. लोकप्रिय माध्यमे वा व्यासपीठे यांच्यापेक्षा विद्यापीठीय व संशोधकीय अभ्यास-जगतात प्रा. नाईक अधिक वावरले. त्यांनी प्राधान्याने इंग्रजीमध्ये लेखन केले व व्याख्याने दिली. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रेतिहासावर, विशेषत: १८५७ पूर्व इतिहासावर प्रा. नाईक यांनी प्रकाश टाकला.

    एकोणिसाव्या शतकाच्या आरंभकालातील सर्वच मराठी विचारवंतांनी ब्रिटिश अंमल म्हणजे ‘ईश्वरी वरदान’ मानले, हा गैरसमज असल्याचे प्रा. नाईक यांनी स्पष्ट केले. किंबहुना, भास्कर पांडुरंग, भाऊ महाजन, रामकृष्ण विश्वनाथ यांनी ब्रिटीश अंमलाची समीक्षा करून गोर्‍या साहेबांवर खरमरीत टीका केल्याचे त्यांनी दाखवून दिले. या विचारवंतांच्या अर्थशास्त्रीय मीमांसांवर भाष्य करताना प्रा. नाईक यांनी  त्यांना ‘दादाभाई नौरोजींच्या शोषण-सिद्धान्ताचे पूर्वसुरी’ म्हणून गौरविले आहे. परमहंस सभेच्या रूपाने उद्भवलेल्या आरंभकालीन जातिविरोधी चळवळीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. भाऊ महाजन यांचे योगदान यथार्थपणे मांडताना त्यांच्या ‘ज्ञानदर्शन’मध्ये प्रकाशित झालेली (१८५४-५६) ‘परागंदा झालेल्या गृहस्थाची कन्या’ ही कादंबरी प्रा. नाईक यांनी उजेडात आणली. अपूर्ण स्वरूपात का होईना, पण ‘यमुना पर्यटन’च्या आधी प्रसिद्ध झालेली ही ‘मराठीतील पहिली कादंबरी’ असल्याचा संशोधकीय दावा प्रा. नाईक यांनी केला. त्यांचे एकमेव मराठी पुस्तक या विषयाचा मागोवा घेणारे आहे.

     एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधनाविषयीचे व समाज-सुधारणा चळवळीविषयीचे त्यांचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनावरील पाश्चात्त्य विचारवंतांचा प्रभाव, जॉर्ज जर्व्हिसचे ‘गणित-शिल्प-विद्यालय’, १८५७ पूर्व मराठी नियतकालिके, प्रार्थना समाजाविषयीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण, महात्मा जोतिबा फुले, डॉ. भाऊ दाजी लाड, मामा परमानंद, डॉ. रा.गो. भांडारकर, न्या. म.गो. रानडे, सार्वजनिक काका, राजर्षी शाहू महाराज, र.धों. कर्वे इ. सुधारकांचे योगदान या विषयांवरचे प्रा. नाईक यांचे लेखन त्याचीच साक्ष देते. लोकमान्य टिळकांविषयीचे प्रा. नाईक यांचे लेखन त्याच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. कार्ल मार्क्सचा परिचय भारताला प्रथम टिळकांनीच करून दिला (१८८१), असे प्रा. नाईक यांनी सिद्ध केले आहे.

    मंडालेच्या तुरुंगवासातून टिळकांना मुक्त करताना ब्रिटीश सरकारने ‘गीतारहस्या’चे हस्तलिखित ठेवून घेऊन संशयात्म्याच्या नजरेने त्याची कशी कसून तपासणी केली याविषयी नाईक यांनी जे साधार विवेचन केले आहे, ते त्यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथातून वाचण्याजोगे आहे. मध्ययुगीन भारतीय संतांची कामगिरी; छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची अर्थपूर्णता; राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद व भारतीय प्रबोधन; बंगालमधील वंगभंगविरोधी चळवळीचा पश्चिम भारतातील प्रभाव; भारतीय स्वातंत्र्य-चळवळीला महाराष्ट्राचे योगदान; राष्ट्रवाद व राष्ट्रीय ऐक्य; गांधीजींची वर्तमानातील प्रस्तुतता; फ्रेंच राज्यक्रांती इत्यादी विषयही प्रा. नाईक यांनी हाताळले आहेत. इतिहासाविषयी चिंतनपर लेखन करताना, ‘इतिहास-लेखन ही एक नैतिक कृती असते’ आणि ‘तो सत्याचा अखंड चाललेला शोध असतो’, हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले आहेत.

     नाईक यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. विविध प्रतिष्ठित व्याख्यानमालांमध्ये त्यांनी विद्वत्तापूर्ण व्याख्याने दिली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १९९९ मध्ये इंग्रजीत प्रा. नाईक गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद (२००६), इंडियन हिस्टरी काँग्रेस (२००७) आणि कोकण इतिहास परिषद (२०१२) यांची त्यांनी अध्यक्षपदे भूषविली. ‘शास्त्री इंडो-कॅनडियन इन्स्टिट्यूट’चे फेलो म्हणून कॅनडा येथील टोरोंटो विद्यापीठाला (१९८२), विद्यापीठ अनुदान मंडळाचे व्हिजिटिंग फेलो म्हणून त्यांनी अनुक्रमे वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाला (१९९१) व कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला (२०००-२००१) भेटी दिल्या. ते २००० साली मुंबई विद्यापीठाचे ‘पंडित सेतुमाधवराव पगडी फेलो’ होते.

     भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे राजा राममोहन रॉय फाउण्डेशन (कोलकाता), नॅशनल बुक ट्रस्ट (नवी दिल्ली), भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (नवी दिल्ली), मणिभवन गांधी संग्रहालय (मुंबई), एशियाटिक सोसायटी (मुंबई) इत्यादी नामवंत संस्थांशी सदस्य वा सल्लागार या नात्याने प्रा. नाईक यांचा निकटचा संबंध आला. एशियाटिक सोसाटीच्या विश्वस्त मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. एकंदरीत, इतिहासाचे एक नामवंत अध्यापक व संशोधक म्हणून नाईक यांनी आपला खास असा ठसा उमटवला.

डॉ. राजा दीक्षित

नाईक, जगन्नाथ विश्राम