Skip to main content
x

नाईक, प्रदीप वसंत

          प्रदीप वसंत नाईक यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य वीज मंडळात वरिष्ठ अधिकारी होते.  प्रदीप नाईक लहान असतानाच हे कुटुंब नागपूरातील श्रद्धानंद पेठेतून पुण्यात स्थायिक झाले.   सातार्‍याच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेऊन ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए.) तेहेतिसाव्या तुकडीत पुढील शिक्षणासाठी हजर झाले. २१जून १९६९ रोजी त्यांना लढाऊ वैमानिकम्हणून नियुक्ती मिळाली. त्यांचे सुरुवातीचे उड्डाण-प्रशिक्षण, ‘हिंदुस्थान - ट्रेनर टूया संपूर्णपणे भारतात निर्मिलेल्या विमानात झाले. त्यानंतर त्यांंनी व्हॅम्पायर व हंटर या विमानांमधून उड्डाणे केली.  मिग-२१ या विमानांचे एक नितांत कुशल व अत्यंत यशस्वी वैमानिक म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. १९७१ च्या भारत-पाक युद्धातही लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी बजावली.

नाईक प्रथम अर्हताप्राप्त उड्डाण प्रशिक्षक झाले व पुढे टॅकडेमधून (टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) फायटर कॉम्बॅट लीडरम्हणून उत्तमपणे उत्तीर्ण झाले. पुढे त्यांना याच संस्थेत संचालक म्हणून घेण्यात आले. वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून त्यांनी सैनिकी प्रशासनाचे स्नातकोत्तर शिक्षण घेतले व ते तेथेच निदेशक-प्रशिक्षकही झाले. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधून त्यांनी डॉक्टरेटच्या समकक्ष असलेला सैनिकी अभ्यासक्रम पूर्ण केला.

भारतीय वायुसेनेने मिग-२३ विमाने रशियाकडून खरेदी करताना त्यात भारतीय गरजांनुसार बदल करण्याची कामगिरी ज्या आठ ज्येष्ठ वैमानिकांवर सोपविण्यात आली होती त्यामध्ये प्रदीप नाईक एक होते. नंतर एका फ्रंटलाइन फायटर स्क्वॉड्रनचे प्रमुख व एका महत्त्वपूर्ण लढाऊ विमानतळाचे प्रमुख (स्टेशन कमांडर) व बिदरच्या वायुसेना तळावरील उड्डाण प्रशिक्षण संस्थेेचे ते एअर ऑफिसर कमांडिंगहोते. त्यांनी वायुसेनेच्या विविध स्तरांवर अनेक महत्त्वपूर्ण पदे सांभाळली. वायुसेनेच्या पश्चिम विभागाचे सीनियर एअर स्टाफ ऑफिसर’, मध्य विभागाचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफव वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून त्यांचे योगदान विशेष ठरले. त्यांना परमविशिष्ट सेवा पदक’, ‘विशिष्ट सेवा पदक’, ‘अतिविशिष्ट सेवा पदक’, राष्ट्रपतींचे मानद ए.डी.सी. हे सन्मान प्राप्त झाले.

३१ मे २००९ रोजी नाईक यांनी वायुसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एप्रिल २०१० पासून त्यांच्याकडे संरक्षण दलाच्या तीनही विभागाच्या समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.  वायुसेना प्रमुख उत्तर सीमेवरील वायुसेनेच्या तळांना अधिक बळकटी देण्याचे काम त्यांनी सुरू केले. उत्तर सीमेवर अनेक नवीन हवाई तळ त्यांनी स्थापन केले.

नाईक यांच्या पत्नी मधुबाला (पूर्वाश्रमीच्या सोनक) एअर फोर्स वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशनच्या केंद्रीय अध्यक्षा आहेत. त्यांचा एक पुत्र वायुसेनेत लढाऊ वैमानिक आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त, नाईक यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ८ मे २०१० रोजी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

- अशोक मोटे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].