Skip to main content
x

चंद्रगिरी, लीला

लीला

     गाण्याची आवड असणाऱ्या आणि अनपेक्षितपणे अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केलेल्या लीलाबाई यांचा जन्म बेळगावला झाला. त्यांचे घराणे मूळचे आंध्र प्रदेशातील चंद्रगिरी या गावचे असल्यामुळे त्यांचे आडनाव चंद्रगिरी असे पडले. लीला यांच्या जन्माच्या आधीच त्यांच्या वडिलांचे निधन झालेले होते. उत्पन्नाचे साधन नसलेल्या व आर्थिक विवंचनेत असलेल्या लीला यांना समादेवी गल्ली येथील प्राथमिक शाळेत घातले. पण शिक्षणात फारसा रस नसलेल्या लीला यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेऊन शाळा बंद केली. याच दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पंडितांकडे बाबूराव पेंटर गेले असता त्यांच्या पाहण्यात लीला आल्या व थोड्या कालावधीतच लीला यांना बाबूराव पेंटर यांच्याकडून चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा झाली. स्त्रियांनी घराबाहेर पडून चित्रपटात काम करणे अक्षम्य गुन्हा मानला जात असलेल्या काळाचा विचार करता लीला यांच्या आईने नकार देणे स्वाभाविकच होते. पण अठराविश्‍वे दारिद्य्र असणाऱ्या घरात उत्पन्नाचे काहीच साधन नसल्यामुळे कालांतराने लीला यांना चित्रपटात काम करण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

     बाबूराव पेंटर यांच्या विनंतीवरून लीला चंद्रगिरी प्रभात फिल्म कंपनीत दाखल झाल्या. आल्याआल्या लीला यांना चित्रपटात काम देण्यात आले नसल्याने केवळ चित्रीकरण पाहण्याचेच काम तेवढे उरले. आपल्याला काम मिळाले नाही तर, या चिंतेत असतानाच त्यांना ‘स्वराज्याचं तोरण’ (१९३०) या मूकपटातील ‘भवानीमाता प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांना तलवार देते’ या प्रसंगात भवानीमातेची भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. हेच लीलाबाईंचे चित्रपटसृष्टीतले पहिले पाऊल होते. ब्रिटिश राजवटीत आक्षेपार्ह असणारे भाग वगळून हा चित्रपट पुढे ‘उदयकाल’ या नावाने प्रदर्शित झाला. या वेळेस मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी भालजींना आपले गुरू मानले. यानंतर प्रभातने पुढे ‘चंद्रसेना’ हा पौराणिक विषयावरचा चित्रपट करण्याचे ठरवले. यात चंद्रसेना या पौराणिक पात्राची भूमिका लीला यांना मिळाली. हाच लीला यांची प्रमुख भूमिका असणारा पहिला चित्रपट.

      त्यानंतर १९३० साली त्यांना प्रभात फिल्म कंपनीच्या ‘अग्निकंकण’ या बोलपटातही नायिकेची भूमिका मिळाली. हा मराठीतील पहिला बोलपट आणि पहिल्या बोलपटाची पहिली नायिका होण्याचा मान लीला यांना मिळाला. या चित्रपटात मा. विनायक नायकाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात लीलाबाईंनी गाणीही गायली होती. त्यानंतर लगेचच त्यांना ‘सिंहगड’ (१९३३) या ऐतिहासिक चित्रपटात सती कमलकुमारीची महत्त्वपूर्ण भूमिका केली, तर ‘सैरंध्री’ (१९३३) या चित्रपटात लीलाबाईंनी नायिका म्हणून काम केले आणि या सर्व चित्रपटांत त्यांनी गाणीही गायली. ‘सैरंध्री’ हा मराठीतली पहिला रंगीत चित्रपट. या चित्रपटात लीलाबाईंनी भूमिका केल्याने त्यांना ‘पहिल्या रंगीत बोलपटाची नायिका’ होण्याचे भाग्य मिळाले. ‘सिंहगड’ या चित्रपटानंतर प्रभात फिल्म कंपनीने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. मात्र लीलाबाई कोल्हापूरलाच राहिल्या.

       नंतर बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, मा. विनायक यांनी प्रयत्न करून कोल्हापूरलाच ‘कोल्हापूर सिनेटोन’ कंपनी सुरू केली. १९३४ साली कोल्हापूर सिनेटोनने कृष्णजन्मावर आधारित ‘आकाशवाणी’ हा चित्रपट बनवला. भालजी पेंढारकर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटात लीलाबाईंनी देवकीची भूमिका केली होती. त्यानंतर १९३५ साली याच कंपनीचा ‘कालिया मर्दन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. १९३६ साली पुण्याला सरस्वती सिनेटोनने ‘सावित्री’ हा बोलपट काढला. या चित्रपटात लीलाबाईंनी ‘सावित्री’ची भूमिका केली होती, तर माधव काळे हे सत्यवानाच्या भूमिकेत होते. या चित्रपटानंतर लीलाबाई आणि भालजी पेंढारकर विवाहबद्ध झाले आणि पुढे त्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट एकत्र केले. १९३५ साली शालिनी सिनेटोनचा ‘कान्होपात्रा’ चित्रपट प्रदर्शित झाला. लीलाबाईंनी त्यात कंचनीची भूमिका केली होती आणि नटसम्राट चिंतामणराव कोल्हटकर यांनी खलनायकाची भूमिका केली होती. या चित्रपटात या दोघांच्या अभिनयातली जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली; शिवाय लीलाबाईंनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली.

      ‘राजा गोपीचंद’ (१९३७) हा सरस्वती सिनेटोनचा भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केलेला एक यशस्वी चित्रपट. या चित्रपटात त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीतल्या तीन आघाडीच्या नायिका एकत्र आल्या होत्या. त्या होत्या लीलाबाई, रत्नप्रभा आणि उषा मंत्री. नंतर भालजी पेंढारकरांनी नवहंस चित्रपट कंपनीच्या ‘संत दामाजी’ या चित्रपटाचे संवाद लिहिले आणि त्याचे दिग्दर्शनही केले. या चित्रपटात लीलाबाईंसह ललिता पवार, गंगाधरपंत लोंढे व बाबूराव पेंढारकर यांसारख्या अव्वल कलाकारांनी काम केले होते. १९४२ साली मुंबईच्या स्वस्तिक टॉकीजमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.

      भालजींनी १९४४ साली ‘महारथी कर्ण’ हा चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटात लीलाबाईंनी कर्णपत्नी वृषालीची भूमिका केली होती. त्यानंतर ‘स्वर्णभूमी’, ‘वाल्मिकी’, ‘परशुराम’ अशा चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. १९५२ साली भालजी पेंढारकर यांच्याच ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात त्यांनी भूमिका केली. १९८१ साली ‘गनिमी कावा’ चित्रपटात लीलाबाई यांनी छोटी भूमिका अभिनित केली.

     लीलाबाईंनी निर्माण केलेल्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे केंद्र शासनाचे पहिले पारितोषिक मिळाले होते. १९९२ मध्ये भारतीय विद्याभवन कला केंद्र मुंबई या मान्यवर संस्थेतर्फे त्यांना गौरवण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनानेही या वर्षी त्यांचा गौरव केला. १९९६ मध्ये त्यांना माऊली आनंद पुरस्कार दिला गेला. लीलाबाईंचा आवाज गोड असल्याने त्यांनी गायलेल्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका त्या काळी कोलंबिया, एच.एम.व्ही. यासारख्या कंपन्यांनी काढल्या होत्या. वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी कोल्हापूर येथे लीलाबाईंचे निधन झाले.

- संपादित

संदर्भ
१) शब्दांकन ः अर्जुन नलावडे, 'माझी जीवनयात्रा - लीलाबाई पेंढारकर', सुरेश एजन्सी, पुणे; १९९७.
चंद्रगिरी, लीला