ध्वनिचित्रफितीवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
शनिवार, दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, पुणे येथे सायंकाळी ४ ते ६ या वेळेत 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प' आणि 'राज्य मराठी विकास संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोषणशास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या ध्वनिचित्रफितीवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान कवितांच्या अभिवाचनाने झाली. मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या अग्रणी साठे, शार्दूल संत आणि दिशा सपकाळ या विद्यार्थ्यांनी कवितांचे अभिवाचन केले. त्यानंतर शिल्पकार चरित्रकोशच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. भूमिका मांडताना त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पाची माहिती आणि या प्रकल्पाची उपयोगिता स्पष्ट केली. कार्यक्रमासाठी अपर्णा जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. अपर्णा जोशी यांनी वैज्ञानिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव, तसेच चंद्रयान मोहिमेचे आपले अनुभव सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणातील विज्ञानाची भूमिका स्पष्ट केली. 'विज्ञान हे समाजाचे देणं आहे, तो वर्गात बसून शिकायचा विषय नसून ती जीवन जगण्याची पद्धती आहे,' असे अपर्णा जोशी म्हणाल्या. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी झोरे यांनी केले.