Skip to main content
x

पानसे, विनायक गोविंद

     विनायक गोविंद पानसे यांचा जन्म नाशिक येथे झाला. डॉ. पानसे यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या सरकारी हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत विल्सन महाविद्यालयात झाले. मुंबई विद्यापीठातून गणित, रसायन व भौतिकशास्त्रात बी.एस्सी. झाल्यावर १९२७ साली विनायक गोविंद पानसे यांना, वनस्पतींची निपज करण्यात निष्णात असणाऱ्या डॉ. जे.बी. हचिन्सन यांच्या हाताखाली साहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. या पहिल्या नोकरीत कृषिशास्त्रातले संख्यात्मक कौशल्य आत्मसात करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे जनुकीय प्रतिमाने निर्माण करून याच विषयाच्या विस्तारावर रोनाल्ड फिशर यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या प्रबंधावर त्यांना पीएच.डी. मिळाली. १९४० साली स्वदेशी परतल्यावर इंदूरच्याच संस्थेत त्यांच्यावर सोपवलेल्या संख्याशास्त्रज्ञापासून संचालकपदापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. तोपर्यंत कृषिसंख्याशास्त्र संशोधन क्षेत्रात पानसे यांचा नावलौकिक पसरल्यामुळे १९५१ साली केंद्र सरकारने त्यांना ‘भारतीय कृषी संशोधन मंडळ’ (आय.सी.ए.आर.) या संस्थेत सांख्यिकी सल्लागार म्हणून निमंत्रित केले.  कृषिक्षेत्रातली प्रयोगशीलता व सर्वेक्षण या दोन्ही सबल बाजूंकडे पाहण्याच्या डॉ. पानसे यांच्या दृष्टिकोनास मिळणारे यश आणि दिवसेंदिवस कृषिशास्त्रात वाढत जाणारी संख्याशास्त्राची उपयुक्तता लक्षात घेऊन केंद्र शासनाने या मंडळाचे ‘कृषी सांख्यिकी संशोधन संस्थे’मध्ये (इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टीक्स रिसर्च इन्स्टिट्यूट) रूपांतर केले. या नामांतरामुळे संस्थेला उच्चशिक्षण संस्थेचा दर्जा प्राप्त झाला.

     डॉ. पानसे यांच्या कार्यकाळात शेतकी संशोधन आणि त्याच्या विकासाशी संबंधित अशा अनेक विषयांत सांख्यिकी पद्धतिशास्त्राची विस्तृत वाढ होण्यासाठी या संस्थेने मोलाचे उपयोजित संशोधन केलेले आहे. वनस्पती जनन, वनस्पती जनन प्रयोग, शेतावर कृषिशास्त्रीय प्रयोग संकल्पना व विश्‍लेषण, एकरी आकडेवारी आणि पीक उत्पादन सुधारण्यासाठी नमुना निवड तंत्राचा वापर, उत्पादन खर्चाचा अभ्यास, मासेपकडीचे आकलन, पशुधनसंख्या व उत्पादन यांचे अंदाज, मोठ्या प्रमाणांवर सुधारणा कार्यक्रम, उदाहरणार्थ : जिल्हास्तरावरील शेतकी कार्यक्रम, अन्नपुरवठा, नियोजन, इत्यादी विषय पानसे यांनी हाताळल्याचे आढळते. त्यांच्या या कार्याची महती जाणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी महामंडळाने (एफ.ए.ओ.) डॉ. पानसे यांच्यावर आशिया व अतिपूर्वेकडील देशांसाठी कृषिविषयक खानेसुमारीच्या प्रादेशिक सल्लागाराची जबाबदारी सोपविली. या देशांना वारंवार भेटी देऊन डॉ. पानसे यांनी त्यांच्या कृषिसंबंधीच्या समस्यांत मोलाचा सल्ला दिला.

     या अधिकृत कर्तव्यांबरोबर डॉ. पानसे यांनी भारतीय कृषी सांख्यिकी संस्था (इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स) स्थापन करून कृषिसंख्याशास्त्राचे अभ्यासक व या विषयात रुची असणाऱ्या मंडळींना वैचारिक आदानप्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले. त्याचे पदाधिकारी, नियतकालिकाचे संपादक अशा विविध जबाबदाऱ्या पानसे यांनी हौसेने पार पाडल्या. त्यांच्या कर्तृत्वामुळेच या समाजास आजची प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.

     शेतकीसंबंधीच्या साऱ्या कार्यक्रमांची कार्यवाही करताना, अधिकारपदावर असताना कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता, आपले विचार स्पष्टपणे मांडून अंगीकृत कार्य तडीस नेण्याचा पानसे यांचा स्वभाव होता. तसेच त्यांच्या चारित्र्याची प्रबलता व कामाची गुणवत्ता इतक्या उच्च दर्जाची होती, की आलेल्या अडचणींवर ते सहज मात करू शकत असत. म्हणूनच, या संस्थेतून निवृत्त झाल्यावर त्यांना नियोजन आयोगावर पाचारण करण्यात आले होते. महिनाभर काम करून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या जबाबदारीतून ते मोकळे झाले आणि पुढे ते अवघ्या त्रेसष्टाव्या वर्षी दिवंगत झाले.

- प्रा. स. पां. देशपांडे

पानसे, विनायक गोविंद