Skip to main content
x

सुखात्मे, पांडुरंग वासुदेव

      जागतिक स्तरावर भूक, अपुरा आहार, कुपोषण या क्षेत्रांत संख्याशास्रीय निकषांनुसार सर्वेक्षण करून या समस्यांच्या मूळ कारणांविषयीच्या संशोधनाचे अग्रणी असणाऱ्या सुखात्मे पांडुरंग वासुदेव यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. मुलांच्या शिक्षणासाठी खेड्यातले घर विकण्याची दूरदृष्टी त्यांच्या वडिलांनी दाखवली होती. शाळेत सतत आणि पुण्यात मॅट्रिकला पहिल्या क्रमांकाचे यश मिळवणाऱ्या सुखात्मे यांनी पदवीनंतर आय.सी.एस.च्या सनदी नोकरीचा सरधोपटमार्ग सोडून ‘लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजा’तून संख्याशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरविले. परंतु ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या संख्याशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग कसा होईल,’ या पंडित मदनमोहन मालवीय यांनी विचारलेल्या प्रश्‍नाने ते भारून गेले. त्यामुळे संख्याशास्त्राच्या विशुद्ध अथवा सैद्धान्तिक बाजूंमध्ये प्रावीण्य मिळविण्याऐवजी ज्या ज्ञानाचा उपयोग पशुसंवर्धनाद्वारे दूध उत्पादनात वाढ, कृषी सर्वेक्षणाद्वारे हेक्टरी पिकांचा अंदाज घेणे, पीक कापणी प्रयोग, पोषक आहार, कुपोषण अशा सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित प्रश्‍नांची उकल करता येईल, असे नमुना पाहणी सर्वेक्षण पद्धतिशास्त्राचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. 

     एकूण चार भागांत विखुरलेल्या सुखात्मे यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधांपैकी तीन भागांवर त्यांचे शोधनिबंध आधी प्रसिद्ध झाले होते. मात्र ‘बायपार्टिशनल  फंक्शन्स’ या चौथ्या भागाबद्दल परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे तो वगळून १९३६ साली त्यांना पीएच.डी. पदवी देण्यात आली, तर त्यांचे मार्गदर्शक आर.ए. फिशर यांच्या सल्ल्यानुसार चौथा भाग फिरून विस्ताराने नव्या स्वरूपात मांडून सादर केल्यावर विद्यापीठाने त्यांना १९३९ साली डी.एस्सी. प्रदान केली.

     भारतात परतल्यावर डॉ. सुखात्मे एखाद्या विद्यापीठात सहज मानाची जागा मिळवू शकले असते. परंतु त्यांनी स्वीकारलेल्या अ.भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य संस्था, कोलकाता (१९३९-१९४०), भारतीय कृषी संशोधन मंडळ, दिल्ली (१९४०-१९५१) व संयुक्त राष्ट्रसंघाचे अन्न व कृषी आस्थापन (१९५२-१९७०) या नोकऱ्या आणि सेवानिवृत्तीनंतर २० वर्षे जीवमिती (बायोमेटरी) संशोधनाबरोबर खेड्यातील आरोग्य सुधारणा व इंदिरा कम्युनिटी किचनमधून गरिबांसाठी पोषक आहार या उपक्रमाद्वारे त्यांनी केलेले समाजपरिवर्तनाचे प्रयत्न यातून जणु त्यांनी आपल्या वर्तनाने पं. मालवीयजींच्या प्रश्‍नाचे उत्तरच दिले.

     कोलकाताच्या आरोग्यसंस्थेतील डॉक्टर विद्यार्थ्यांकडून रक्तदाब, रक्तपेशी, रक्तातील साखरेचे प्रमाण काढण्याचे प्रकल्प करवून घेतल्यावर त्यांना संख्याशास्त्राची तत्त्वे चांगल्या प्रकारे समजावता येतात या अनुभवातून सुखात्मे यांना पुढील आयुष्यात सैद्धान्तिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली. भारतीय कृषी संवर्धन मंडळात दाखल झाल्यावर सुखात्म्यांवर प्रथम जे काम सोपविले गेले, ते म्हणजे इटाह (उत्तर प्रदेश) येथील शेळीच्या दुग्धप्रकल्पाची छाननी करण्याचे. तत्पूर्वी दहा वर्षे ब्रिटिश प्रजनन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली एक यशस्वी प्रकल्प म्हणून तो गणला जात होता. त्या संदर्भातील आधार सामग्रीचे काळजीपूर्वक संख्याशास्त्रीय विश्‍लेषण करून डॉ.सुखात्मे यांनी त्यातील त्रुटी दाखविल्या आणि आपल्या नोकरीच्या अल्पावधीतच इंग्रज अधिकाऱ्यांपुढे तो प्रकल्प फसल्याचा धाडसी निर्णय जाहीर केला. दूधप्रकल्पाचा असा बोजवारा झाल्याने आणखी इतर प्रकल्पांची शहानिशा करावयास सुखात्म्यांना सांगितले तर पुरती फजिती होईल, या भीतीने या प्रकल्पांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना संख्याशास्त्रीय पद्धतीचे प्रशिक्षण देणे आणि त्यासाठी लागणारे पाठ्यपुस्तक लिहिणे अशा कामांत वरिष्ठांनी सुखात्म्यांना गुंतवून ठेवले. ‘स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च’ हा त्यांचा ग्रंथ आज कृषी विद्यापीठ व त्याअंतर्गत महाविद्यालयांत लोकप्रिय पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जातो.

     पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९४२) देशातील शिलकी धान्यसाठा व नव्या हंगामात होणाऱ्या पिकांचा केंद्र सरकारला तातडीने हवा असलेला अंदाज देण्यासाठी सुखात्म्यांनी जागोजागी प्रत्यक्ष जाऊन नमुना सर्वेक्षण केले. ते करताना त्यांनी नमुना पाहणी तत्त्वात पद्धतिशास्त्रविषयक बरेच नवे उपक्रम विकसित केले आणि त्यांचा उत्तम प्रकारे व्यावहारिक उपयोग केला. त्याशिवाय समुद्रातील मासळींचा अंदाज ठरविणारी नमुना पाहणीची उपयुक्त पद्धतदेखील विकसित केली आणि प्राण्यांच्या पैदाशीसंबंधीच्या आकडेवारीचे वैज्ञानिक मूल्यमापन सुरू केले.

     सुखात्म्यांच्या या  कामांची कीर्ती थेट संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न व कृषी आस्थापनांपर्यंत जाऊन थडकली. परिणामी त्यांनी सुखात्मे यांच्यावर आग्नेय आशियातील सरकारी अधिकाऱ्यांना शेतीची खानेसुमारी व नमुना कौशल्यावर आधारित कृषी व लोकसंख्या प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली. इतकेच नव्हे, तर जागतिक कृषी खानेसुमारीविषयक कार्यक्रम तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या सभेला आणि नमुना पाहणीचा भारतात राबविला गेलेला प्रयोग या विषयावर व्याख्यान देण्यास पाचारण केले.

     कृषिसंशोधन मंडळात, थोडक्या काळात धडाडीने केलेल्या कामांमुळे सुखात्म्यांना यश मिळत गेले. पण कृषिसर्वेक्षण करताना भूखंडाचा आकार आणि विस्तार, तसेच हे काम संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी करावे की नव्याने भरती करून प्रशिक्षित कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्यांनी करावे यासंबंधी केंद्रातील वरिष्ठांशी मतभेद झाल्यावर संशोधनाच्या संदर्भातील कोणतीही उपयोजित क्षेत्रातील बाब एका केंद्रीय यंत्रणेच्या समितीशिवाय पुढे नेऊ नये, असा फतवा काढून कृषिसंशोधन मंडळाच्या अखत्यारीतून सर्वेक्षण, पीक कापणी इत्यादी कामे काढून घेतली गेली.

     १९६५ साली केंद्रीय अन्नमंत्र्यांनी अतिशय चांगली उपज करणारा म्हणून मनिलाहून ‘तायचुंग-१’ जातीचा जो तांदूळ आणला, तो कटक तांदूळ संशोधन संस्थेत संख्याशास्त्रीय विश्‍लेषणानंतर भरघोस पीक देऊ शकणाऱ्या बुटक्या जातीच्या तांदुळासारखा तंतोतंत निघाला. घाऊक प्रमाणात नियमित उत्पादनासाठी ही जात निवडण्याची डॉ. सुखात्म्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली शिफारस अव्हेरली गेली नसती, तर देशात दहा वर्षे आधीच हरितक्रांती झाली असती.

     भारतीय कृषी संशोधन मंडळाची संख्याशास्त्र शाखा कृषी संशोधकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून मौलिक संख्याशास्त्रीय कार्य करीत असल्याने, सर्वार्थाने तिचे काम शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या धाटणीप्रमाणे चालते म्हणून ‘इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च स्टॅटिस्टिक्स’ असे नामांतर करून तिला उच्च दर्जा द्यावा, ही त्यांची मागणी फेटाळली गेली. या त्यांच्या मागणीस अर्थमंत्र्यांचा संपूर्ण पाठिंबा होता; कारण त्यामुळे शासनास जादा आर्थिक भार सोसावा लागणार नव्हता. या सततच्या अडथळ्यांना वैतागून सुखात्मे यांनी जागतिक अन्न व कृषी संस्थेतील आमंत्रणाचा स्वीकार केला व ते रोम येथे गेले.

     १९५१ साली कृषिमंडळाच्या सेवेतून मुक्त झाल्यावर डॉ.सुखात्मे यांनी एम्स येथील आयोवा स्टेट विद्यापीठाच्या संख्याशास्त्र प्रयोगशाळेचा उपयोग करून ‘सँपलिंग थिअरी ऑफ सर्व्हेज’ हे पुस्तक पुरे केले. अन्न व कृषी आस्थापनाच्या पंखाखाली असणाऱ्या देशांना भारतात अवलंबविलेल्या नमुना पाहणी तंत्राच्या अनुभवाची माहिती व्हावी व त्यांना हे तंत्र आचरणात आणता यावे, म्हणून डॉ. सुखात्मे यांना या पुस्तकाच्या लेखनास अग्रक्रम द्यावा लागला. अन्न व कृषी आस्थापनाने या पुस्तकाच्या स्पॅनिश व फ्रेंच भाषेतदेखील आवृत्त्या काढल्या. याशिवाय त्यांनी नमुना सर्वेक्षणास भक्कम वैज्ञानिक पाया असल्याची या क्षेत्रातील मंडळींची खात्री पटावी म्हणून नमुना निरपेक्ष दोषांचे मूल्यमापन व ते नियंत्रित करण्याचे उपाय सुचविणारे चार असहसंबंधित घटकांचे बनविलेले रेषीय प्रतिमान तयार केले. त्यानंतर प्रत्यक्ष अन्न कृषी आस्थापनात पदभार स्वीकारल्यावर,

     १. नमुना निवड पाहणीची तत्त्वे आणि उपयोग यांचे राष्ट्रीय तज्ज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रादेशिक संस्था काढावी,

     २. क्षेत्रीय नोकरांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा घेऊन धान्योत्पादन व आहार यांचे सर्वेक्षण करावे,

     ३. दशवार्षिक खानेसुमारी व सर्वेक्षण यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक आयोग व समित्या नेमाव्यात,

     असे जे कार्यक्रम, सुखात्म्यांनी सर्व देशांना जो त्रिसूत्री कार्यक्रम नेमून दिला, त्यांतून फलद्रूप झाले. कारण त्या-त्या देशातील वरिष्ठ संख्याशास्त्रज्ञांनी युनोच्या कार्यक्रमाखाली प्रशिक्षण संस्थांचे प्रमुखपद स्वीकारून सल्लागार व तज्ज्ञ म्हणून काम करावे, असे त्यांचे मन वळवण्यात सुखात्म्यांना यश आले.

     पुढील आयुष्यात पोषक आहार हा सुखात्म्यांच्या चिंतनाचा आणि व्यवहारात राबवण्याचा विषय बनला, त्याची सुरुवात या  आस्थापनात गेल्यापासूनच झाली. कारण, विकसनशील देशातील अपुरा आहार, भूक व प्रथिनांची कमतरता यांचे आकलन करून त्यावर उपाय योजणे, हा त्या आस्थापनाचा प्रसंख्याशास्त्र प्रमुख म्हणून सुखात्म्यांच्या कामाचा भागच होता. या आस्थापनाच्या पहिल्या सरसंचालकांनी, नोबेल पारितोषिक विजेते लॉर्ड बॉइड ओर्र यांनी शरीरपोषणासाठी लागणारे व प्रत्यक्ष मिळणारे उष्मांक यांची तुलना करून जगात दोन तृतीयांश लोक भुकेने बेजार असल्याचा निर्ष्कष काढला होता. उलट तरुण, निरोगी व्यक्तींची अन्नग्रहण आकडेवारी घेऊन समाकलनाच्या रीतीने जगात फक्त २० टक्के लोकच भुकेने गांजलेले आहेत, असा सुखात्म्यांनी निर्ष्कष काढला. तो आस्थापनात कोणासाही मान्य न झाल्याने तोडगा असा निघाला की, ‘रॉयल स्टॅटिस्टिकल आणि न्यूट्रिशनल सोसायटी’ यांच्या संयुक्त सभेपुढे सुखात्म्यांनी ‘जागतिक भूक’ हा आपला निबंध वाचावा आणि तज्ज्ञांना म्हणणे पटवावे. त्यानुसार २७ मे १९६१ रोजी तो वाचला गेला आणि सुखात्मे त्यातून सहीसलामत बाहेर पडले. इतकेच नव्हे, तर पुढे या निबंधास ‘गाय पदक’ प्रदान करून या संस्थांनी सुखात्म्यांचा सन्मान केला.

     अन्न व कृषी आस्थापनातून निवृत्त झाल्यावर (१९७०) बर्कले विद्यापीठात, रीजंट प्राध्यापक असताना त्यांनी शेल्डन मार्गन यांच्या सहकार्याने, ‘मर्यादित आहार घेतला असता अन्नाचे पचन होऊन, त्याचे अंतिम रूपांतर ऊर्जेत होणे व त्यासाठी स्वनियंत्रण असणे (यास ‘होमोस्टॅसिस’ म्हणतात), मात्र ते स्वनियंत्रण कक्षेच्या बाहेर गेल्यास कार्यक्षमता घटते’, असे ‘सुखात्मे- मार्गन प्रमेय’ विकसित केले.

     १९७२ साली पुण्यात स्थायिक झाल्यावर सुखात्म्यांनी शैक्षणिक व क्षेत्रीय स्तरावर काम करण्याचे ठरवले. त्यापैकी शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी ‘विज्ञानवर्धिनी’ संस्थेत ‘जीवमिती व पोषण’ विभाग चालू केला, पदव्युत्तर अभ्यास व संशोधनाची सोय केली. अनेक विद्यार्थ्यांना स्वत: मार्गदर्शन केले.

     व्यवहारोपयोगी कामात खेड्याचे राहणीमान सुधारणे व गरिबांना पोषक आहार मिळवून देणे ही समाजोपयोगी कामे त्यांनी केली. खेड्यातील आरोग्य सुधारण्यासाठी मुलांपासून स्वच्छतेची जाणीव झाली पाहिजे हे लक्षात घेऊन सुखात्म्यांनी पुण्याजवळील एका खेड्यात शाळेजवळ स्वच्छता करणे, मुताऱ्या बांधणे, वस्तीजवळचा कचरा हटवणे, विहिरी स्वच्छ करून त्यांत क्लोरीन टाकणे, गावात संडास बांधून त्यांना बायोगॅस संयंत्र जोडून गॅसची सोय करणे हे उपाय केल्यावर खेड्यातील रोग हटल्यामुळे तेथील आरोग्यमान सुधारले. मुलांची उंची, वजन व शारीरिक वाढीचा दर वाढला. नाहीतर, अमेरिकेतल्या मुलांइतके अन्नग्रहण प्रमाण ठेवले तरी आपल्याकडे मुलांची वाढ तिकडच्याइतकी होत नव्हती. या तफावतीमागे स्वच्छता व आरोग्याचा अभाव होता. तीन वर्षे सात-आठ खेड्यांत हा प्रकल्प राबवून सुखात्म्यांनी खेड्यांचे आरोग्यमान सुधारून दाखविले.

     धान्य व डाळींपासून घरात शिजवलेले जे अन्न आपण रोज खातो, त्यापासून मिळणाऱ्या पोषणमूल्यांचा गरिबांना लाभ मिळवून देणे व समाजातील दुर्बळ घटकांना रोजगार मिळवून देऊन गरिबी निवारण करता येईल यासाठी सुखात्मे यांनी ‘इंदिरा कम्युनिटी किचन’ प्रकल्प १२ वर्षे राबविला. त्यात पीठ चाळणे, मळणे, थापटणे, लाटणे, भाजणे इत्यादी कामे कारखान्यातील एकास एक काम या पद्धतीप्रमाणे वाटली गेल्यामुळे कुणा एकावर बोजा न पडता, पदार्थ तयार होऊन विक्री केंद्रावर पाठविले की लगोलग संपून जात. कारण त्यांची गुणवत्ता, चविष्टपणा व मुख्य म्हणजे २० ते २५ टक्के स्वस्त; सर्वांत शक्तिमान असा हा प्रकल्प होता.

     आपल्या राज्यातील तरुणांना संख्याशास्त्रविषयक नोकऱ्या मिळाव्यात म्हणून मुंबई विद्यापीठात संख्याशास्त्राचा जो पदव्युत्तर विभाग १९४८ साली चालू झाला, तो डॉ.सुखात्मे यांच्या पुढाकाराने.

     १०० शोधनिबंध, संख्याशास्त्रावर अव्वल दर्जाचे तीन ग्रंथ व अनेक सन्मानांबरोबर भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार हे डॉ.सुखात्मे यांच्या नावावर जमा आहेत.

प्रा. स. पां. देशपांडे

सुखात्मे, पांडुरंग वासुदेव