Skip to main content
x

पाटील, पीतांबर रामचंद्र

जिभाऊ पाटील

पीतांबर रामचंद्र पाटील यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील बोरविहार या गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांचे वडील गावातील मोठे शेतकरी होते. पाटील यांनी प्रथम प्राथमिक सेवा सहकारी सोसायटीत चिटणीस म्हणून प्रवेश केला. ते जीभाऊ पाटील या नावाने ओळखले जात.

जिभाऊ पाटील यांनी 1959 मध्ये दुधाच्या व्यवसायास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी 6 डेअरी सोसायट्या व धुळे जिल्हा दूध उत्पादक कृषिपूरक उद्योग सहकारी संघ यांची स्थापना केली. त्यासाठी केवळ रु. 1940 भागभांडवल उभारून 19 शेरापासून धंद्यास सुरुवात केली. दुधाच्या व्यवसायात भांडवलाची अत्यंत आवश्यकता भासल्यामुळे पाटील यांनी उत्पादक शेतकर्‍याची अल्पबचत म्हणून लिटरमागे एक नया पैसा घेऊन भागभांडवल उभारले. अशाप्रकारे त्यांनी 12 लाख रुपये भांडवल उभारले आणि या व्यवसायातून 35 लाखाचे भांडवल निर्माण केले. तसेच गायी, म्हशी यांसारखी दुभती जनावरे घेण्यासाठी शेतकर्‍यांना 1 कोटींच्यावर कर्ज उपलब्ध करून दिले आणि सामुदायिक दुग्धोत्पादनाची योजना अमलात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

जीभाऊ पाटील यांनी ग्रामीण, तालुका व राज्यपातळीवर विविध संस्थांमध्ये जबाबदारीच्या जागांवर काम केले आहे. ते 1945 ते 1950 या काळात तालुका विकास मंडळाचे सदस्य होते. त्यांनी धुळे तालुका को-ऑप. सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले. ते कृषी प्रोड्युस मार्केट कमिटी-धुळे या संस्थेचेही सभासद होते. त्यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपदही सांभाळले. ते धुळे जिल्हा सहकारी बोर्डाच्या स्थापनेपासून सलग 12 वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. धुळे जिल्हा दूध उत्पादक युनिटीचे स्थायी संचालक व त्यानंतर त्याच संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. पर्यवेक्षक समितीचे ते सभासद अध्यक्ष होते. ते धुळे/बॉम्बे प्रोव्हिजनल को-ऑप. बँक लि. चे 10 वर्षे अध्यक्ष होते. ते महाराष्ट्र राज्य मार्केटिंग सोसायटीमध्येही 5 वर्षे कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालकपदावरही काम केले. धुळे म. च. सहकारी मंडळाचे सदस्य तसेच 4 वर्षे मानद सचिवही होते. ते धुळे जिल्हा स्कूल बोर्डचे 5 वर्षे अध्यक्ष होते व धुळे जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद होते. त्यांनी बोरविहार विद्याप्रसारक संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे अध्यक्षपद भूषविले.

जिभाऊ पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध समितीचे अध्यक्ष होते. ते अखिल भारतीय डेअरी समितीचेही अध्यक्ष होते. अखिल भारतीय सहकारी क्षेत्रात विशेषत: दुग्ध व्यवसाय क्षेत्रात खानदेशातील ते एकमेव नेते असल्यामुळे शेतकरी कुटुंबातील या असामान्य नेत्यास जनतेने सहकार महर्षी ही पदवी अर्पण केली.

- संपादित

पाटील, पीतांबर रामचंद्र