Skip to main content
x

पाटील, तुळजाजी विक्रम

मुंगसाजी देव

मुंगसाजी देव म्हणजेच तुळजाजी विक्रम पाटील यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातल्या धामणगावी झाला. त्यांच्या आईचे नाव ममाईमाता होते. ते आईला अनेक शंका विचारून तिच्याकडून समाधान करून घेत. ते अतिशय मातृभक्त होते. ते गाईगुरे चारायला नेत. आईच्या शिकवणुकीने ते निर्भय, नि:शंक बनले. मुंगसाजींच्या तरुणपणी त्यांचे वडील निवर्तले. त्यांची आई कष्टाची कामे करी.

मुंगसाजींचा विवाह वरोली गावच्या झामराबाई यांच्याशी झाला. गरिबीमुळे गावात हेटाळणी, निंदा होऊ लागली. मुंगसाजी विरक्त बनू लागले, भटकू लागले. अंगावर कपड्यांचे भान नाही, दिगंबरावस्थेत फिरत नऊ महिन्यांनी गावी परतले. ते रात्री-अपरात्री लोकांकडे जात व म्हणत, ‘‘मानवी आयुष्य झोपेत घालवू नका.’’ त्यांचे म्हणणे व त्याचा अर्थ लोकांना न कळल्याने ते त्रागा करीत. आईने त्यांना समजावले. मुंगसाजी आपल्या मालकीच्या गढीत बारा वर्षे एकाच अवस्थेत बसले. त्यामुळे मांडी व पोटरी एकत्र जोडली गेली. त्यांना साक्षात्कार झाला.

त्यांच्या साधुवृत्तीमुळे साप व मुंगूस वैरभाव विसरून त्यांच्या मांडीवर खेळत. हे दृश्य पाहून लोक चकित झाले व त्यामुळे त्यांचे नाव मुंगसाजी देवपडले. अनेक साधक, संत त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांचा आप्त शिवाजी याने त्यांना जाळून व विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला मात्र; मुंगसाजी यांना काहीच झाले नाही. त्यांनी मारेकर्‍याचा द्वेष केला नाही.

सांभा महाराजांना पंढरपूर दर्शनाची ओढ लागली. तेव्हा मुंगसाजींनी त्यांना आपले विठोबारूप अनुभवास आणून दिले. उल्लेखनीय म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी सालवडी येथे विश्वशांती यज्ञ केला, त्यात अग्रपूजेचा मान मुंगसाजी देव यांनाच दिला. मुंगसाजी यांच्या परंपरेत खालील संतांचे नाव घेतले जाते : मूर्तिजापूरचे परमहंस श्री पुंडलिकबाबा, परमहंस श्री मारुतीबाबा, श्री घोगलेबाबा, श्री परशुरामबाबा इत्यादी.

वि.ग. जोशी

संदर्भ
१.भट, नम्रता, संपादक; ‘सकल संत चरित्रगाथा’.
पाटील, तुळजाजी विक्रम