Skip to main content
x

पगडी, सेतुमाधवराव श्रीनिवास

      महाराष्ट्रातील इतिहासकार, उर्दू-फारसी भाषांचे जाणकार आणि उत्तम प्रशासक म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले सेतुमाधवराव पगडी हे श्रीनिवास व कृष्णाबाई या दांपत्याचे चिरंजीव. त्यांचा जन्म बेदर (आता उस्मानाबाद) जिल्ह्यात निलंगा या गावी झाला. सातार्‍याजवळचे वाई हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे पूर्वज एकनाथ उर्फ नाथोपंत हे वाईचे. पेशवाईत कर्नाटकात जमिनी इनाम मिळाल्याने त्यांच्या चार पिढ्या तिकडेच गेल्या. नोकरीच्या निमित्ताने सेतुमाधवरावांचे आजोबा हैद्राबाद राज्यात आले. पगडी यांचे घराणे माध्व संप्रदायी वैष्णव होते. त्यांचे वडील निलंग्याच्या मामलेदार कचेरीत पेश्कार म्हणजे अव्वल कारकून होते. त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी शक्य तेवढे अर्थसाहाय्य केले. परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर घरची परिस्थिती हलाखीचीच बनली. सेतुमाधवराव १९२५ साली पुण्यातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर बी.ए. होण्यासाठी बनारसला गेले. तेथून ते राज्यशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन १९३० साली बी.ए. झाले. व १९३२ साली अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात त्यांनी एम.ए.ची पदवी संपादन केली. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी आय.सी.एस. होण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक अडचणींमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. मार्च १९३३ मध्ये हैद्राबाद सिव्हील सर्व्हिसमधून त्यांची तहसीलदार या पदावर नेमणूक झाली. १९५० साली दिल्लीहून आलेल्या फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनने हैद्राबादच्या ज्या निवडक अधिकार्‍यांना इंडियन अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये (आय.ए.एस.) घेतले, त्यांत सेतुमाधवरावांचीही आय.ए.एस. अधिकारी म्हणून निवड झाली आणि १७ मे १९५१ रोजी ते औरंगाबादला कलेक्टर म्हणून आले. त्यानंतर १९५२ च्या जूनमध्ये ते हैद्राबाद येथील रेव्हेन्यू बोर्डाचे सेक्रेटरी झाले व अखेरीस १९५६पासून त्यांची उर्वरित नोकरी मुंबईला झाली. १९६० मध्ये महाराष्ट्र जिल्हा गॅझेटिअर्सचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ३ सप्टेंबर १९६९ रोजी ते सेवानिवृत्त झाले. चरित्राच्या या त्रोटक तपशीलांवरूनदेखील असे ध्यानात येते की, सेतुमाधवराव पगडी यांची शिक्षणानिमित्त व नोकरीनिमित्त भरपूर भ्रमंती झाली. वेगवेगळ्या स्वभावाच्या, वृत्ति-प्रवृत्तीच्या भाषकांशी त्यांचे संबंध आले आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवात खूपच भर पडली. त्यांच्यावर तेलुगू, कन्नड, मराठी, उर्दू, फारसी व इंग्लिश या भाषांचे विशेष संस्कार झाले. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना डॉ.माधवराव पटवर्धन त्यांचे शिक्षक होते, त्यांच्याबद्दल त्यांना अतिशय आदर व प्रेम वाटत असे. त्यांच्या कविप्रकृतीचा व रसिक स्वभावाचा सेतुमाधवरावांवर चांगला परिणाम झाला. त्याचप्रमाणे त्यांचे श्वशुर प्राध्यापक पुणतांबेकर यांचाही त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. महाविद्यालयात असल्यापासून वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांत ते सहभागी झाले होते आणि त्यांचा तो वक्तृत्वगुण अखेरपर्यंत कायम टिकून होता. अस्खलित बोलणे, अपवादात्मक स्मरणशक्ती, प्रचंड वाचन व सूक्ष्म अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी उत्तम वक्ता म्हणून चांगले यश मिळविले. 

     सेतुमाधवराव पगडी यांनी विपुल व विविध प्रकारचे लेखन केले आहे. कथाकार, समीक्षक, संपादक, इतिहासकार, आणि रसिक व बहुश्रुत वाङ्मयसेवक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यांच्या लेखनातून प्रकट होतात. ‘उषा’ हा त्यांचा पहिला लघुकथासंग्रह १९३८मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे ‘अलकनंदा’ (१९४०), ‘अशोकाची पाने’ (१९४१), ‘गोंडवनातील कथा’ (१९६१), ‘नयन तुझे जादूगार’ (१९७१), ‘नेसोनि शालू हिरवा’ (१९८४), हे कथात्म/ललित लेखन प्रकाशित झाले. हे लेखन त्यांनी केले असले, तरी, सेतुमाधवरावांची मराठी साहित्यविश्वात प्राधान्याने असणारी प्रतिमा (उर्दू-फारसी साधनांच्या साहाय्याने त्यांनी केलेल्या इतिहासग्रंथांमुळे) एक इतिहासकार अशीच ठसली आहे.  ‘सुफी संप्रदाय, तत्त्वज्ञान आणि कार्य’ (१९५३), ‘मिर्जा गालिब व त्याच्या उर्दू गजला’ (१९५८),   ‘मणिकांचन’ (१९६१), ‘उर्दू काव्याचा परिचय’ (१९६१), ‘पानिपतचा संग्राम’ (न. र. फाटक यांच्या सहकार्याने १९६१),  ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ (१९६२),  ‘मोगल आणि मराठे’ (१९६३), ‘मराठे व औरंगजेब’ (१९६३), ‘मोगल मराठा संघर्ष’ (१९६४), ‘हिंदवी स्वराज्य आणि मोगल’ (१९६६), ‘सुंदरा मनामधि भरली’ (१९६६), तसेच ‘शिवचरित्र: एक अभ्यास’ (१९७१), ‘छत्रपती नि त्यांची प्रभावळ’ (१९७६), ‘प्रीति परी’ (१९७९), ‘इक्बालच्या निवडक कविता’ (१९८२), ‘श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय’ (१९८५), ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध खाफीखानाचा साधनग्रंथ’, ‘महाराष्ट्र आणि मराठे’, ‘मराठवाड्यातील आधुनिक कविता’, ‘मराठवाड्यातील गद्य वाङ्मय’, ‘त्रिलिंग देशातील दैनंदिनी’, ‘वरंगळचे काकतीय राजे’, ‘तारीखे दिलखुश’, फिरदौसीच्या कथा भाग १ व २’, ‘इतिहासाचा मागोवा’, ‘हिंदवी स्वराज्य आणि मोगल’, ‘शिवचरित्र एक अभ्यास’, ‘हैद्राबादेतील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ आणि ‘मराठे व निजाम’ हा ऐतिहासिक लेखसंग्रह असे त्यांचे अनेक ग्रंथ त्यांच्या इतिहास प्रेमाची व जिज्ञासू रसिकवृत्तीची साक्ष देणारे आहेत. मराठीखेरीज इंग्लिश भाषेतही त्यांनी ग्रंथरचना केली आहे. ‘अमंग द गोंड्स ऑफ आदिलाबाद’, ‘ग्रामर ऑफ द कोलामी लँग्वेज’, ‘ट्रायबल वेलफेअर इन आदिलाबाद’, ‘हिस्ट्री ऑफ फ्रिडम स्ट्रगल इन हौद्राबाद (३ खंड)’, ‘एटीन्थ सेंच्युरी डेक्कन’, ‘मराठा मुगल रिलेशन्स’ (१६०८ ते १७०७),  ‘छत्रपती शिवाजी’ (१९७४) या त्यांच्या ग्रंथांना विद्वन्मान्यता लाभली आहे. १७५८मध्ये मराठ्यांनी जेव्हा लाहोर घेतले, तेव्हा लाहोरचे दरवाजे उघडून देणारा अफगाणांचा अधिकारी तहमासखान याच्या फारसी आत्मचरित्राचा समग्र इंग्रजी अनुवाद ‘तहमासनामा’ या नावाने सेतुमाधवरावांनी केला आहे. पगडींना गोंड जमातीच्या जीवनात जेवढा रस होता, तेवढाच सुफींच्या गूढ परंपरेतही. जवळपास ४० फारसी इतिहासकारांचा आणि त्यांच्या साधनग्रंथांचा पगडी यांनी मराठी अभ्यासकांस परिचय करून दिला आहे. या ग्रंथांची पृष्ठसंख्या पाच हजारांच्या वर जाईल. उर्दू कवी, मुशाइरे, मैफली, लखनौचा नबाब वाजद अली शहा आणि उर्दू रंगभूमी, निजाम घराण्यातील राजपुत्र, उर्दू कादंबरीकार, लघुकथालेखक, टीकाकार, विनोदी लेखक आणि त्यांचे साहित्य, यांच्याविषयी पगडी यांनी सहा वर्षे बावडेकर यांच्या ‘आलमगीर’मधून सुमारे २०० लेख लिहिले. यांपैकी काही लेखांची ‘विडा रंगतो असा’, ‘सुंदरा मनामधे भरली’ यांसारखी पुस्तके सिद्ध झाली. ‘जीवनसेतू’ (१९६९) हे त्यांचे आत्मचरित्र ग्रंथरूपात प्रसिद्ध होण्याआधी ते ‘आलमगीर’ आणि ‘धनुर्धारी’ यांमधून क्रमश: लेखरूपाने प्रसिद्ध झाले आणि नंतर कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या अनंतराव कुलकर्णी यांनी ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. मराठीतील आत्मचरित्र वाङ्मयात ‘जीवनसेतू’ने चांगली भर पडली आहे. त्यांच्या जन्मापासून त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतचा साठ वर्षांचा जीवनवृत्तान्त त्यांनी अतिशय विस्ताराने या आत्मचरित्रात सांगितला आहे. त्यांचे बालपण, वेगवेगळ्या ठिकाणी झालेले शिक्षण, त्या काळात त्यांना चांगल्या-वाईट माणसांचे आलेले अनुभव, त्यांचा विवाह व वैवाहिक जीवनाचे तपशील, तसेच नोकरी व तीमधील वैविध्यपूर्ण घडामोडी हे सारे सेतुमाधवरावांनी समरसून सांगितले आहे. अनेक रसिक व रंगेल माणसांच्या त्यांनी सांगितलेल्या हकिकती रंजक व उद्बोधक स्वरूपाच्या आहेत. हैद्राबाद येथे त्यांची बरीच नोकरी झाली. या काळात हैद्राबादमधील राजकीय वातावरण, रजाकारांची चळवळ, हैद्राबाद संस्थानचे विलीनीकरण, ते होताना घडलेल्या घटनांचा बहुतेक तपशील सेतुमाधवरावांनी आत्मवृत्तात नमूद केला आहे. त्यांच्या लेखनाची शैली इतिहासकाराची आहे, त्यामुळेच काही वेळा आत्मचरित्र पाल्हाळीक स्वरूपाचे झाले आहे. अर्थात असे असले; तरी समकालीन सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती ह्यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने या आत्मचरित्राचे महत्त्व निश्चितच आहे. आत्मसमर्थनाची वा अकारण आत्मगौरवाची बाधा होऊ न देणारे हे आत्मचरित्र सेतुमाधव या व्यक्तीच्या जडणघडणीचा प्रत्ययकारी आलेख रेखाटते. त्यांनी केलेली स्वत:च्या वाचनाची, अभ्यासाची व समकालीन व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वची नोंद उल्लेखनीय आहे.

     गणित व शास्त्र या विषयांत गती नसल्यामुळे त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत एकदा अपयश आले. परंतु पुढे बी.ए. व एम.ए. या दोन्ही परीक्षांत त्यांनी प्रथम वर्ग व प्रथम क्रमांक संपादन केला, हे लक्षात घेण्याजोगे आहे. त्यांच्या आत्मवृत्तातून प्रकटणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व एका बुद्धीमान, व्यासंगी, कर्तृत्ववान, प्रांजल, समाधानी व प्रसन्न वृत्तीच्या सद्गृहस्थाचे आहे हे जाणवत राहते. आत्मचरित्राच्या अखेरीस त्यांनी असे म्हटले आहे की, कुंडलीप्रमाणे त्यांचे आयुष्य चौसष्ट वर्षांचे आहे; परंतु प्रत्यक्षात त्यांना चौर्‍याऐंशी वर्षांचे सफल जीवन लाभले. 

- प्रा. डॉ. विलास खोले

पगडी, सेतुमाधवराव श्रीनिवास