Skip to main content
x

परांजपे, रामचंद्र गोविंद

बाबासाहेब परांजपे

रामचंद्र गोविंदराव तथा बाबासाहेब परांजपे यांचा जन्म पुणे येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील आडीवरे हे त्यांचे मूळगाव होते. पण त्यांचे वडील नोकरीनिमित्त सोलापूरला आले होते. बाबासाहेब दहा वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. सोलापूरच्या हरिभाऊ देवकरण प्रशालेत ते मॅट्रिक झाले. पुढे अनेक अडचणींवर मात करत ते बी.एस्सी. झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या हिप्परगा ह्या गावी एक राष्ट्रीय शाळा सुरू होती. स्वामी रामानंद तीर्थ हे त्या शाळेचे मुख्याध्यापक होते.  १९२९ मध्ये बाबासाहेब परांजपे या शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून आले. तिथूनच त्यांच्या सार्वजनिक, राष्ट्रीय जीवनाला एकप्रकारे सुरूवात झाली. देखणे व्यक्तिमत्व, प्रचंड वाचन, ओजस्वी वक्तृत्व, देशप्रेम, सेवाभाव, जातीयता निर्मूलनाची कृतिशील तळमळ यामुळे  बाबासाहेब सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे वाटू लागले. सर्वजण त्यांना युवराज म्हणायचे. या संबोधनात आत्यंतिक प्रेम होते, तसाच धाकही.

इ.स. १९३५ मध्ये हिप्परग्याची शाळा सोलापूरला स्थलांतरित झाल्यावर स्वामीजींसमवेत बाबासाहेब अंबेजोगाईला आले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली योगेश्वरी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. योगेश्‍वरी विद्यालयाशी त्यांचा शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक अशा विविध  नात्यांनी संबंध आला. शालेय शिक्षणाला जीवनाचा अर्थ प्राप्त करून देताना त्यांनी शाळेच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीचाही विचार केला.  आपल्या अत्यल्प  मानधनाचा हिस्सासुद्धा  ते गरजू शिक्षकांना, गरीब विद्यार्थ्यांना वाटून देत. काटकसर हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. सार्वजनिक पैसा सार्वजनिक कामासाठीच उपयोगात आणला पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता.

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामीजींकडे होते. बाबासाहेब परांजपे संग्रामात खेचले जाणे स्वाभाविक होते. त्यांचा पिंड संघर्षाचा होता. हातबॉम्ब तयार करण्याची विद्या त्यांना अवगत होती. क्रांतिकारकांच्या प्रशिक्षण कॅम्पची व्यवस्था त्यांच्याकडे असायची.  देशातली असहकारितेची, स्वदेशीची चळवळ त्यांनी योगेश्‍वरी विद्यालयाच्या प्रांगणात आणली. परदेशी कपड्यांची होळी, महात्मा गांधींजींच्या उपोषणाला पाठिंबा देणारे शिक्षक विद्यार्थ्यांचे उपोषण अशा देशभक्तीने भारलेल्या बाबी या प्रांगणाने अनुभवल्या. स्वाभाविकच १९४२ मध्ये निजामाने सुरू केलेल्या अटकसत्रात बाबासाहेबांना अटक होणे अपरिहार्य होते.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व हैदराबादच्या  मुक्तीनंतर १९५२ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक बाबासाहेबांनी बीडमधून जनता लोकशाही आघाडीतर्फे लढविली आणि जिंकली. खासदार झालेल्या बाबासाहेबांनी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक, आर्थिक आणि हरित क्रांतीचा प्रयोग परिश्रमपूर्वक यशस्वी केला. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांची ओळख सिंधुताईं सोबत झाली. त्या विधवा होत्या. आपल्या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून बाबासाहेबांनी सिंधुताईंसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यांना दोन मुली झाल्या. पण बाबासाहेबांनी स्वतःच्या संसारापेक्षा चिंता केली ती ग्रामोद्धार, दलितोद्धार आणि शिक्षणाची. अंबेजोगाई योगेश्‍वरी महाविद्यालय, लातूरचे दयानंद महाविद्यालय, बसवेश्‍वर महाविद्यालय, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन यांच्या स्थापनेत, अंबेजोगाईच्या योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या विस्तारात त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला. दलितमित्र पुरस्कार, इ.स.१९५१ च्या परभणीच्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. मराठवाडा वृत्तपत्राचे विश्‍वस्तपद हे सन्मान प्राप्त झाल्यावर आपली जबाबदारी वाढली, अशी त्यांची धारणा झाली. शेवटच्या आजारपणातही त्यांची ग्रामोद्धाराची तळमळ कमी झाली नाही. 

 - प्रा. डॉ. सौ. कल्पना संतोष मुळावकर

परांजपे, रामचंद्र गोविंद