Skip to main content
x

परांजपे, विजय गोपाळ

     जमशेदपूर येथील टाटा लोह व पोलाद कारखान्यांत (टाटा आयर्न अ‍ॅण्ड स्टील कंपनी - टिस्को) संशोधन खात्याचे संचालक हे उच्च पदास भूषविणारे डॉ. विजय गोपाळ परांजपे यांचे नाव हिंदुस्थानातील धातू क्षेत्रात मोठ्या आदराने घेतले जाते. डॉ. विजय गोपाळ परांजपे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण एल्फिन्स्टन विद्यालयामध्ये तर इंटरपर्यंतचे शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयमध्ये झाले. पुढील चार वर्षांचा धातुशास्त्राचा शिक्षणक्रम त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात अत्यंत प्रभावी रीतीने १९४५ साली पूर्ण केला. तेथील परीक्षेत त्यांनी संपादिलेले विक्रम अजून अद्वितीय आहेत. या विक्रमाबद्दल त्यांना हॅटफील्ड सुवर्णपदक देण्यात आले.

     उच्चशिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेतील प्रख्यात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश मिळवून १९४९ साली तेथील डी.एस्सी.ची पदवी मिळवली. या शिक्षणक्रमात त्यांनी लोह-नत्र पद्धतीवर यशस्वी संशोधन केले. डॉ. परांजपे यांची ही कामगिरी बहुमोल असून त्यांनी प्रतिपादिलेल्या रचना सर्वमान्य गणल्या जातात. तेथील प्राध्यापकवर्गावर यांच्या विद्वत्तेची छाप अवघ्या चार-पाच महिन्यांतच पडून त्यांना लगेच शिष्यवृत्ती मिळाली व १९४६ सालापासून पुढील वास्तव्य हे त्यांनी मिळविलेल्या शिष्यवृत्तीवर झाले. डॉक्टरेटची पदवी संपादन केल्यावर त्यांनी सुमारे एक वर्ष शिक्षकवर्गात काम करीत संशोधन चालू ठेवले.

     भारतात परत येऊन त्यांनी सुमारे दीड वर्ष राष्ट्रीय धातुशास्त्र प्रयोगशाळेत संशोधन केले. ऑक्टोबर १९५२ मध्ये ते ‘टिस्को’ कंपनीच्या संशोधन व विकास खात्यात शिरले. त्यांनी लोह व पोलाद उत्पादनाशी संबंधित असलेल्या नानाविध समस्यांवर अखंड संशोधन केलेले आहे. या अवधीतील त्यांची कामगिरी अत्यंत भरीव आहे. त्यांच्या कामगिरीचा व प्रगाढतेचा वचक सर्वमान्य होता. त्यांनी लिहिलेल्या कित्येक लेखांबद्दल त्यांना सुवर्णपदके मिळालेली आहेत.

     पोलाद कारखान्यात त्यांच्या भरीव कामगिरीमुळे उत्तरोत्तर प्रगती होत गेली. १९५२ साली (रिसर्च मेटॅलर्जिस्ट) संशोधक धातुशास्त्रज्ञ, १९५५ साली सहायक अधीक्षक १९६१ साली अधीक्षक, संचालक, १९६३ साली (चीफ मेटॅलर्जिस्ट) मुख्य धातुशास्त्रज्ञ व १९६७ साली अशा बढत्या मिळाल्या. या काळातील त्यांची कामगिरी खाणीतील खनिज उत्पादनापासून पोलादाचे संस्कार व उपयोग, अशा विस्तीर्ण क्षेत्रात चौफेर पसरली. १९७४ साली परांजपे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नंतर ते पुण्याला येऊन स्थायिक झाले. १९७५ साली त्यांनी स्वत:ची सल्लागार कंपनी सुरू केली आणि अनेक पोलाद उद्योगांना सल्ला दिला. २००१ सालापासून त्यांनी सल्लागार कंपनी बंद केली.

     त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारच्या खाण व पोलाद मंत्रालयाने त्यांना १९६५ साली राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ (नॅशनल मेटॅलर्जिस्ट) हा बहुमान दिला.

     डॉ. विजय गोपाळ परांजपे यांच्या यशस्वी जीवनाचे आंशिक श्रेय त्यांचे विद्वान पिताजी, प्रा. गो.रा. परांजपे यांना दिले पाहिजे. मुंबईहून बनारसला दर आठवड्याला वर्तमानपत्रांतील निवडक उतारे, कात्रणे, संपादकीये व इतर वाचन सामग्री पाठवून त्यांनी आपल्या मुलाला योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला. डॉ. परांजपे यांना बागकामाचा छंद होता. आपल्या बहरलेल्या बगिचातून मित्रांना हिंडवताना व त्यातील प्रत्येक झाडाचे नाव व तोंडओळख करून देताना त्यांना वेळेचे भान राहत नसे. बॉटनी व हॉर्टिकल्चरवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे इतरांना त्यांच्या धातुशास्त्रातील प्रगाढतेची प्रचिती येते. डॉ. परांजपे यांचे पुणे येथे निधन झाले.

अ. पां. देशपांडे

परांजपे, विजय गोपाळ