Skip to main content
x

राऊत, सखाराम अर्जुन

सखाराम अर्जुन

        डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांचा जन्म मुंबईतील गिरगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या अकराव्या वर्षी ते अनाथ झाले. परंतु चिकाटी व दीर्घ परिश्रम यांच्या बळावर त्यांनी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये (सांप्रतचे एल्फिन्स्टन महाविद्यालय) प्रवेश मिळविला. तेथेही बक्षिसे व शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून उच्च शिक्षण घेतले. १८६४ साली वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षण मंडळाने त्यांची नियुक्ती ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यक व प्रसूतिशास्त्र हे विषय मराठी माध्यमातून शिकविण्यासाठी केली. विद्यार्थ्यांना शिकविण्याचे माध्यम मातृभाषा असले पाहिजे, अशी त्यांची विचारधारा होती. त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मराठीतून पाठ्यपुस्तके लिहिली.

     शल्यक्रियातज्ज्ञ असूनही त्यांना वनस्पतिशास्त्राचीही तितकीच आवड होती. त्या काळात वनस्पतिशास्त्र हा एक विषय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकविला जात असे. त्यामुळे डब्ल्यू. ग्रे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकाने राजीनामा दिल्यानंतर त्या जागेकरिता त्यांची निवड झाली. पुढे काही काळ अध्यापन केल्यानंतर त्यांची ज.जी. रुग्णालयामध्ये डॉ. हेन्री ग्रे या युरोपियन शस्त्रक्रियातज्ज्ञाचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. हा मान मिळविणारे ते पहिले भारतीय डॉक्टर होत. यानंतर त्यांनी काही काळ अपमृत्यू निर्णेत्याचे (कॉरोनर) शस्त्रक्रियातज्ज्ञ म्हणूनही काम केले. तसेच अनंत चंद्रोबा यांच्याबरोबर व्हाइसरॉयचे साहाय्यक शस्त्रक्रियातज्ज्ञ हा बहुमानही त्यांना मिळाला होता. पुढे अनंत चंद्रोबांच्या निधनानंतर तत्कालीन मुंबई इलाख्यात त्यांची लसटोचणी विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली.

     त्यांच्या वनस्पतिशास्त्रातील नैपुण्याची ओळख त्यांच्या शास्त्रीय व्याख्यानातून, प्रात्यक्षिकांतून व स्वतंत्र संशोधनातून दिसून येत असे. या वनस्पतिशास्त्राच्या आवडीतून त्यांनी औषधी वनस्पतींचा आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी यांतील आंतरसंबंधीचा तौलनिक अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी आयुर्वेदीय औषधांच्या वापरास उत्तेजन मिळावे यासाठी एक ग्रंथही लिहिला. मुंबईच्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या देशी औषधांची सूची म्हणून हा ग्रंथ उपयोगी पडावा, हा त्यामागील उद्देश होता. याखेरीज त्यांनी ‘विवाह विज्ञान’ (१८७७), ‘बॉम्बे ड्रग’ (१८७९), व ‘देवीच्या रोगाचे स्वरूप आणि त्याच्या शमनाचे व प्रतिबंधाचे उपाय’ हे ग्रंथ लिहिले.

     मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांना त्यांच्या कार्याची चांगली जाण होती. यामुळे त्यांनी संशोधन करून निर्माण केलेल्या ‘डॉसिना फर्गसोनी’ या वनस्पतीचे संकरित रोपटे गव्हर्नरना सादर केले. तसेच, ‘ड्रॅगन ट्री’ या नवीन जातीच्या वनस्पतीच्या शोधाचेही जनकत्व त्यांच्याकडे जाते. अखेरच्या काळात ते ‘बॉम्बे फ्लोरा’ या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रयत्नात होते. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते एक संस्थापक होते.

     समाजसुधारणा क्षेत्रातही ते प्रागतिक विचाराचे मानले जात. १८७० साली आधीचे अपत्य असलेल्या एका विधवेशी त्यांनी विवाह केला. ही त्या काळातील एक क्रांतिकारक घटना होती. वयाच्या अवघ्या सेहेचाळिसाव्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले.

ज.बा. कुलकर्णी

राऊत, सखाराम अर्जुन