Skip to main content
x

रेगे, मेघश्याम पुंडलिक

     व्युत्पन्नता व सामाजिक बांधीलकी यांचा अत्यंत दुर्मीळ असा संयोग असणारे प्रा. मे.पुं. रेगे हे महाराष्ट्रातील विचारविश्वाला सॉक्रेटिक शिक्षक, शिक्षकांचे शिक्षक आणि व्यासंगी प्रबोधनकार म्हणून परिचित आहेत. तत्त्वज्ञानाबरोबरच तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र, धर्म, भाषा, साहित्य इत्यादी विषयांमध्येही त्यांना रस होता. इतकेच नव्हे, तर आपल्या साक्षेपी व सखोल अभ्यासाने त्या-त्या क्षेत्रात त्यांनी विद्वत्तेचे व अभिजात लेखनाचे नवे मानदंड निर्माण केले. प्रा. मेघश्याम पुंडलिक रेगे यांचे शालेय शिक्षण रत्नागिरी व मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. आणि मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊनच एम.ए. केले. १९४६ पासून ते प्राध्यापकी पेशात रुजू झाले. नवसारी, अहमदाबाद, औरंगाबादचे मिलिंद महाविद्यालय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करून १९५४ साली ते मुंबईच्या कीर्तीमहाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून काम पाहू लागले व पुढे उपप्राचार्य, प्राचार्य इत्यादी जबाबदार्‍या त्यांनी १९७९ पर्यंत सांभाळल्या. १९७९-१९८१ या काळात मुंबईच्या जी.डी. पारीख रिसर्च सेंटरचे पहिले संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८१-१९८४ या काळात पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. १९८४ पासून अखेरपर्यंत वाईच्या प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या धर्मकोशाचे ते अध्यक्ष होते.

     तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या निधनानंतर १९९४ पासून विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरादेखील त्यांच्या खांद्यावर आली व तीही त्यांनी अखेरपर्यंत सांभाळली. १९८१ पासून अखेरपर्यंत छशु र्टीशीीं या मासिकाचे व १९८४ ते १९९८ या काळात त्यांनी प्राज्ञ पाठशालेच्या ‘नवभारत’ या वैचारिक मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. या संबध कारकिर्दीत त्यांना काही उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्र फाउण्डेशनच्या वतीने वैचारिक साहित्याबद्दल दिला जाणारा प्रथम पुरस्कार (१९९५), कोकण साहित्य भूषण गौरवचिन्ह, मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद इत्यादी.

      आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दोन मासिकांचे संपादक म्हणून त्यांनी लेखन केलेच; पण त्याव्यतिरिक्तही इतर लेखन विपुल प्रमाणात केले. त्यामध्ये वैचारिक प्रबोधनपर लिखाण, अनुवाद, तात्त्विक लिखाण, टीकात्मक/समीक्षात्मक लेखन अशा विविध प्रकारांचा समावेश होईल. आपल्या लेखनातून विविध सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, तात्त्विक प्रश्‍नांच्या  बाबतीत समाजाचे, विशेषत: तरुणवर्गाचे प्रबोधन करण्याचे काम त्यांनी अत्यंत चिकाटीने व निरलसतेने केले. तरीही त्यांचा उल्लेख ‘विचारवंत’ म्हणून करणे त्यांना स्वत:ला पसंत पडणार नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘बहुश्रुत माणूस — आणि हा सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात बहुमोल असतो — आणि शास्त्रकार हा भेद महाराष्ट्रात अजून उदयाला आलेला दिसत नाही. आणि हा भेद स्पष्टपणे केला जाणे आणि ध्यानात वागविला जाणे, हे बौद्धिक जीवनाच्या निकोपपणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ‘विचारवंत’ हे जे एक आदरार्थी, पण भोंगळ पद महाराष्ट्रात अलीकडे रूढ झाले आहे, ते घातक आहे.’ (‘अनेकविद्यामूलतत्त्वकोविद’; संपादकीय टिपण, ‘नवभारत’, एप्रिल १९८२) या अर्थाने त्यांना विचारवंत म्हणणे अन्यायकारक ठरेल.

      तत्त्वज्ञान व तदनुषंगिक ज्ञानशाखांचा त्यांनी आयुष्यभर व्रतस्थ निष्ठेने सर्वांगपरिपूर्ण व्यासंग केला. त्यांचा मूळ पिंड तत्त्वचिंतकाचा होता व तो पोसला गेला तो मुख्यत: एल्फिन्स्टन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डान्ड्राड यांच्या अध्यापनावर. (संदर्भ : ‘तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल’) प्रा. डान्ड्राडांच्या शिकवण्याच्या सॉक्रेटिक पद्धतीमुळे तत्त्वज्ञानातील अनेक समस्यांचा, ग्रंथांचा व विद्वानांचा रेगे यांना सखोल परिचय झाला आणि त्या अध्यापनशैलीचा त्यांच्या स्वत:च्या अध्यापनशैलीवरही बराच प्रभाव पडला. याबाबत एक खास नोंदवण्यासारखी बाब म्हणजे महाविद्यालयातील अध्यापक म्हणून काम करतानाही त्यांचा व्यासंग केवळ त्या चाकोरीपुरता सीमित कधीच राहिला नाही. विद्यापीठातील प्राध्यापकांनाही मार्गदर्शक ठरेल अशी विद्वत्ता व व्यासंगी वृत्ती त्यांच्या ठायी होती. या अर्थाने ते खरोखरच ‘शिक्षकांचे शिक्षक’ होते. तत्त्ववेत्त्यांच्या मूळ ग्रंथांकडे आपण सरळ (कुणाच्या मदतीविना) जावे, या वृत्तीने कान्ट, जी.ई. मूर, सी.डी. ब्रॉड, सिज्विक, रसेल इत्यादी अनेक तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथ त्यांनी स्वत:च वाचले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘कमकुवत शिक्षकांमुळे तत्त्वज्ञानात्मक लिखाण वाचण्यात स्वायत्तता आली.’

      पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली असणारे प्रा. रेगे भारतीय तत्त्वज्ञानाचा गांभीर्याने विचार करू लागले, ते मुख्यत: दोन व्यक्तींमुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रा. के.जे. शहा. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये काम करीत असताना डॉ. आंबेडकर यांच्या सहवासामुळे त्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाविषयी रुची व दलितांच्या समस्यांविषयी सजग आस्था निर्माण झाली. प्रा. के.जे. शहा यांच्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानीय दृष्टीकोनाची दिशा बदलली. आपले तत्त्वज्ञान घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, धार्मिक परंपरेने प्रभावित असलेल्या आपल्या समाजाला अधिष्ठान ठरू शकेल असे सामाजिक व धार्मिक तत्त्वज्ञान आपण रचले पाहिजे, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या अभिजात परंपरेकडे वळले पाहिजे, या के.जे. शहा यांच्या दृष्टीकोनाशी प्रा. रेगे पूर्णपणे सहमत झाले व भारतीय तत्त्वज्ञानाचा गांभीर्याने विचार करू लागले.

      प्रा. रेगे यांच्या कारकिर्दीतील दोन घटना त्यांच्यामधील ‘सॉक्रेटिक शिक्षक’ समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे १९५९-१९६० या काळात ब्रिटिश काउन्सिलची स्कॉलरशिप मिळून ते एका वर्षासाठी ऑक्स्फर्ड विद्यापीठात गेले. ही स्कॉलरशिप त्यांना (व प्रा. एन.जी. कुलकर्णी यांना) ए.जे. एयर यांच्या शिफारशीमुळे देण्यात आली होती.

     या वर्षभराच्या काळात त्यांनी गिल्बर्ट राईल, जे.एल. ऑस्टिन, ए.जे. एयर, मायकेल डमेट, पी.एफ. स्ट्रॉसन या विद्वानांची व्याख्याने ऐकली, सांकेतिक तर्कशास्त्राचे विशेष अध्ययन केले; पण त्यांच्या स्वत:च्या म्हणण्यानुसार, ‘हा (नवीन) विषय शिकण्यासाठीसुद्धा ऑक्स्फर्डला जाणे आवश्यक होते असे मला वाटत नाही. मी दुसर्‍यापासून ऐकून फारसे शिकू शकत नाही.’ (संदर्भ : ‘माझी तत्त्वज्ञानातील वाटचाल’) मात्र, ऑक्स्फर्डला असताना त्यांच्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे इतर विषयांप्रमाणेच तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन तेथे अत्यंत गांभीर्याने होत असे. आपल्याकडे हे अभावानेच आढळते.

     आपल्या लेखनातून, व्याख्यानांतून, चर्चांमधून असे वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने व जाणीवपूर्वक प्रयत्न केला. बॉम्बे फिलॉसॉफिकल सोसायटी, इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशन या व इतर चर्चासत्रांमधील त्यांची उपस्थिती कायमच आल्हाददायक व आम्हां विद्यार्थ्यांना समृद्ध करणारी, विषयाच्या मूळ गाभ्याकडे जाण्याची दृष्टी देणारी असे. त्यांचे ऑक्स्फर्डमधील वास्तव्य त्यांना नसले तरी त्यांच्या सहवासात येणार्‍या इतरांना चांगलेच लाभदायक ठरले.

     दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे ‘रेगे’ प्रयोग (पंडित फिलॉसॉफर प्रॉजेक्ट) तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात पूर्व-पश्चिम संवाद घडवून आणण्याचे शिवधनुष्य प्रा. रेगे यांनी प्रा. दयाकृष्ण, डॉ. प्रल्हादाचार इत्यादी विद्वानांच्या मदतीने उचलले व यशस्वीपणे पेलले. रसेलच्या ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’मधील विधानविषयक सिद्धान्त व त्याला पारंपरिक पद्धतीने दर्शनाचे अध्ययन केलेल्या संस्कृत पंडितांचा — नैयायिकांचा मिळणारा प्रतिसाद — असे या संवादाचे स्वरूप होते. फोर्ड फाउण्डेशनच्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर पुणे, वाई, वाराणसी, मुंबई अशा अनेक ठिकाणी यासाठी अनेक चर्चासत्रे घेतली गेली व घडून आलेली चर्चा ‘संवाद’ या पुस्तकरूपाने प्रसिद्धही झाली. तत्त्वज्ञान विषयाच्या प्रगतीला मोठी चालना देणार्‍या या अभिनव प्रयत्नाचे प्रा. दयाकृष्ण यांनी मोठ्या गौरवाने ‘रेगे एक्स्परिमेन्ट’ असे नामकरण केले.

      प्रा. रेगे हे ज्ञानशास्त्रात कान्टवादी व नीतिशास्त्रात मूरवादी होते. परंतु, त्यांचे तत्त्वज्ञान पुस्तकी पांडित्यापर्यंत कधीच मर्यादित नव्हते. प्रा. के.जे. शहा यांच्या भारतीय अभिजात दर्शनपरंपरेविषयीच्या गांभीर्याशी सहमत होताना या परंपरेची व ब्रिटिशकाळात सुरू झालेल्या वैचारिक प्रबोधनाची परस्परांशी कशी सांगड घालता येईल, याचा त्यांनी आत्मीयतेने व तत्त्वचिंतकाच्या विचक्षण दृष्टीने विचार केला. डॉ. अंतरकर म्हणतात त्यानुसार, ‘वैचारिक स्वराज्याची भूमिका त्यांनी अंगीकारली व अत्यंत निष्ठेने ती पारही पाडली. आपली तत्त्वज्ञानीय भूमिका स्पष्ट करणारे लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केले, त्याचबरोबर समीक्षात्मक / टीकात्मक लेखनही अत्यंत हेतुपूर्वक व सजगतेने केले. अशा लेखनामागील त्यांची भूमिका अत्यंत प्रांजळ, निकोप व व्यक्तिनिरपेक्ष होती, प्रसंगी औपरोधिक, बोचरी, ग्रंथकाराच्या तथाकथित विद्वत्तेचे वाभाडे काढणारी होती.’ विद्वानांनी आपले ज्ञान अद्ययावत व अचूक राखले पाहिजे व ते तशाच स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे या तळमळीतून त्यांनी प्रसंगी आक्रमक अशी टीकाशैली अंगीकारली. या समीक्षात्मक लेखनातून त्यांची विषयाबद्दलची आस्था, ज्ञानक्षेत्राचे पावित्र्य राखण्याची तळमळ व मूलभूत चिंतन वाचकांपर्यंत थेट पोहोचते. ‘सौंदर्याचे व्याकरण’ व ‘तर्करेखा’ ही डॉ. बारलिंगे लिखित पुस्तके, ‘ज्ञानसमस्या’ हे डॉ. वीणा गजेंद्रगडकर यांनी अनुवाद केलेले पुस्तक इत्यादींच्या प्रा. रेगे यांनी केलेल्या समीक्षांतून त्यांच्या या टीकाशैलीचे प्रत्यंतर येते.

     त्यांचे बरेचसे लेखन मराठीतून झालेले आहे व हा त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेला वसा होता. ग्रमीण महाराष्ट्रातील मोठा वर्ग तत्त्वज्ञानातील विविध समस्या, धर्म व समाजविषयक प्रश्‍न व त्यांतील चर्चा जाणून घेण्यास उत्सुक आहे. त्यांच्यासाठी प्रा. रेगे यांनी मराठीतून विपुल लेखन केले व तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, तर्कशास्त्र, धर्म इत्यादींशी संबंधित अनेक विषयांचा वाचकांना परिचय करून दिला. हे लेखन करताना वापरली जाणारी शास्त्रीय परिभाषा प्रमाणभूत, बिनचूक व नेमकी असावी यावर त्यांचा कटाक्ष असे.

     आपल्या लेखनातून विज्ञाननिष्ठा व विवेकवाद यांच्या मर्यादा त्यांनी दाखवून दिल्या. या दोहोंच्या पलीकडे असणारा प्रांत धूसर असतो व त्यावर धूसरपणेच लिहिता येईल हे त्यांना मान्य होते. मात्र, आधुनिक मानवी जीवनाला या दोहोंची जशी आणि जितकी गरज आहे, तशी व तितकीच धर्माची व अध्यात्माची गरज आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

     ही अज्ञेयवादी भूमिका आहे का? त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘मी आध्यात्मिक वृत्तीने जगत नाही, पण तत्त्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून विश्वाचा पसारा समजून घेण्यात आध्यात्मिक दृष्टीला स्थान आहे, असे मानतो... आध्यात्मिक साधनांच्या सर्व रूपांचा मी आदर करतो.’’

      ज्ञान क्षेत्रातील हा उदारमतवादी दृष्टीकोनही प्रा. रेगे यांच्या व्यक्तिमत्त्वाची अत्यंत लोभस व तितकीच मूल्यवान बाजू होती. या दृष्टीमुळे वादचर्चेत समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचे आकलन त्यांना अचूकपणे होई व चर्चेसाठी निकोप वातावरण तयार होई. कुठल्याही सिद्धान्तात किंवा दृष्टीकोनात वैयक्तिकरीत्या गुंतून न राहता त्याचे साक्षेपी विश्लेषण व विवेचन करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. या वृत्तीनेच त्यांनी अध्यापनाचे व ज्ञानदानाचे कार्य अतिशय ध्येयनिष्ठेने व समरसून केले. महत्त्वाचे म्हणजे, या विचारयज्ञाचा सामाजिक बांधीलकी व कृतिशीलता यांच्याशी असणारा धागाही तेवढाच मजबूत ठेवला.

डॉ. मीनल कातरणीकर

संदर्भ
१.डॉ. देव सुनीती, संपादक; ‘प्रा. मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’; वितरण : राजहंस प्रकाशन, पुणे; २०००.

२.इनामदार, एस.डी.; संपादक : ‘मर्मभेद’; मे.पुं. रेगे यांचे टीकालेख; प्रतिमा प्रकाशन, पुणे; २००७.

३. डॉ. कामत, प्रतिभा; ‘प्रा. मे.पुं. रेगे यांचे तत्त्वचिंतन’; ‘परामर्श’, खंड २८, अंक १; मे-जुलै २००६.
रेगे, मेघश्याम पुंडलिक