Skip to main content
x

रेगे, सदानंद शांताराम

     मराठी कविता व कथेमध्ये नवे प्रवाह रुजविणार्‍या साहित्यिकांच्या सुरुवातीच्या पिढीतील कसदार कवी व लेखक सदानंद रेगे यांचा जन्म त्यांच्या आजोळी, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झाला. १९४० मध्ये मुंबईत दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चित्रकलेच्या शिक्षणासाठी ते जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये दाखल झाले होते. परंतु घरच्या परिस्थितीमुळे १९४२ साली त्यांनी शिक्षण सोडून नोकरीची वाट धरली. सुरुवातीला काही किरकोळ नोकर्‍या केल्यानंतर पश्चिम रेल्वेमध्ये ते १८ वर्षे सेवारत होते. नोकरी करीत असतानाच पुढील शिक्षण घेऊन १९५८मध्ये त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली.

     सदानंद रेगे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात कवितेपासून झाली. त्यांची पहिली कविता १९४८मध्ये ‘अभिरुची’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. मर्ढेकर प्रणीत नवकाव्याच्या परंपरेतील कवी म्हणून ते ओळखले जातात. १९५०मध्ये प्रकाशित झालेला ‘अक्षरवेल’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह; त्यानंतर त्यांचे ‘गंधर्व’ (१९६०), ‘देवापुढचा दिवा’ (१९६५), ‘ब्राँकुशीचा पक्षी’ (१९८०), ‘वेड्या कविता’ (१९८०) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले.

     मानवी अस्तित्वाविषयीचे विविधांगी चिंतन, मानवी मनाच्या अंतःस्तराचा शोध हे त्यांच्या कवितेचे विशेष आहेत. प्रतिमांचा विपुल वापर, कवितेच्या आकृतिबंधाबाबत वेगळे प्रयोग हीदेखील त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. माणसांच्या आदिम प्रेरणांचा वेध घेणारी, तसेच माणूस आणि त्याचा भोवताल यांच्या नात्यांमधील सूक्ष्म कंगोर्‍यांना स्पर्श करणारी त्यांची कविता आशयसमृद्ध आहे. रेग्यांची प्रतिमासृष्टी विलक्षण आहे. ती व्यामिश्र, बहुपदरी व गूढतेकडे झुकणारी आहे. त्यामुळेच त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचा आक्षेपही येतो.

     रेगे यांनी मराठी कथा वाङ्मयातही मोलाचे योगदान दिलेले आहे. विशेषतः कथेचे आशय-विषय, मांडणी व आकृतिबंध यांमध्ये त्यांनी वेगळे प्रयोग केले; म्हणूनच नवकथेच्या प्रवाहातील ते एक महत्त्वाचे लेखक मानले जातात. १९५१मध्ये ‘धनुर्धारी’ या नियतकालिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. ‘काळोखाची पिसे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५४मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘चांदणे’ (१९५९), ‘चंद्र सावली कोरतो’ (१९६३), ‘मासा आणि इतर विलक्षण कथा’ (१९६५) हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले.

     मानवी गुढाचा शोध ही प्रेरणा रेगे यांच्या कवितेप्रमाणेच कथेतही आढळते. माणसाच्या व्यामिश्र मनोव्यापाराचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कथांमधून केला आहे. जगण्यातल्या दुःखाचे, हतबलतेचे दर्शनही त्यांच्या कथांमधून घडते. कवितेप्रमाणेच त्यांच्या कथांमध्येही प्रतिमांचा उदंड वापर आढळतो. रेगे यांनी पाश्‍चात्त्य साहित्याचा व्यासंग जपला. त्यांच्या साहित्यामध्ये पाश्चात्त्य कलाकृतींचे संदर्भ प्रतिमा, प्रतीकांच्या रूपात येतात.

     पाश्चात्त्य साहित्यातील काही उत्तम कलाकृतींचे अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने नाटक व कविता या वाङ्मयप्रकारांचा समावेश आहे. ‘ब्रांद’ (मूळ लेखक हेन्रिक इब्सेन) ‘बादशहा’ मूळ लेखक युजीन ओनील), ‘गोची’ (मूळ लेखक तारोझ रुझिविच) व ‘राजा ईडिपस’ (मूळ लेखक सोफोक्लिज) ही त्यांची अनुवादित नाटके आहेत. त्यांनी ब्लादिमीर मायकोव्हस्की यांच्या कवितांचा अनुवाद त्यांनी केला आहे. ‘पँट घातलेला ढग’ (१९७१) या शीर्षकाखाली या अनुवादित कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी वॉल्ट व्हिटमन यांच्या कवितांचा अनुवादही केलेला आहे. या अनुवादित कवितांचा संग्रह ‘तृणपर्णे’ (१९८२) या शीर्षकाखाली प्रकाशित झालेला आहे. ‘जयकेतू’ हे ‘ईडिपस’चे रूपांतर आहे.

    ‘चांदोबा चांदोबा’, ‘झोपाळ्याची बाग’ हे रेगे यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. रेगे यांच्या निवडक साहित्याच्या संकलनाचे दोन ग्रंथ संपादित झालेले आहेत. अरविंद गोखले यांनी रेगे यांच्या निवडक कथांचे संकलन संपादित केलेले आहे (१९८८). वसंत आबाजी डहाके यांनी रेगे यांच्या निवडक साहित्याचे संपादन केलेले आहे. (१९९६).

    - मनोहर सोनवणे

रेगे, सदानंद शांताराम