Skip to main content
x

साने, गीता जनार्दन

     गीता जनार्दन साने यांचा जन्म विदर्भातील वाशीम येथे झाला. त्यांचे वडील नामवंत वकील होते. बालपणीच त्यांनी शिक्षणासाठी हिंगणे येथील शाळेत प्रवेश घेतला. पुढे अमरावतीमध्येच गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून बी.एस्सी व एम.एस्सी. पदव्या प्राप्त केल्या.

     १९३१ ते १९४४ या काळात कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी मीरत येथे शिक्षिकेची नोकरी पत्करली. त्यानंतर नरसिंग भगमवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९४४ साली नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पतीसोबत धनबाद येथे वास्तव्य केले.

     ‘धनुर्धारी’, ‘प्रतिभा’ यांसारख्या नियतकालिकांतून त्यांच्या प्रारंभीच्या कथा प्रसिद्ध झाल्या. १९३६ ते १९४२ या काळात गीताबाईंच्या ‘निखळलेली हिरकणी’ (१९३६)े, ‘वठलेला वृक्ष’ (१९३६), ‘हिरवळीखाली’ (१९३६), ‘लतिका’ (१९३७), ‘फेरीवाला’ (१९३८), ‘आविष्कार’ (१९३९), ‘माळरानात आपले वैरी’ (१९४१), ‘धुके आणि दहिवर’ (१९४२), अशा अनेक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या.

     गीता साने यांना राजकारण, समाजकारण यांचे आकर्षण होते. समाजसेवेची मनापासून आवड होती. भोवतालचे जीवन डोळसपणे पाहून त्यांनी स्वानुभवावर आधारलेल्या कादंबर्‍या लिहिल्या. स्त्री-मुक्तीचा परखड भाषेत उदो-उदो करणार्‍या गीता साने त्या काळातील बंडखोर लेखिका ठरल्या.

     ‘चंबळची दस्युभूमी’ हा त्यांचा ग्रंथ एक महत्त्वाचे योगदान म्हणता येईल. डाकूंचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या चंबळखोर्‍यात भ्रमंती करून व दस्यूंच्या जीवनाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यासंबंधी आपली निरीक्षणे त्यांनी या ग्रंथात मांडली. त्यातील ऐतिहासिक, आर्थिक निष्कर्ष महत्त्वाचे ठरले. केवळ ललित लेखनात गुंतून न राहता, तळागाळातील स्त्री-समाजाच्या वेदनामय जीवनाचा त्यांनी घेतलेला साक्षेपी वेध त्यांच्या ‘भारतीय स्त्री-जीवन’ या ग्रंथात समाविष्ट झालेला आहे.

      शतकानुशतके स्त्रियांच्या वाट्याला आलेली उपेक्षा, त्यांच्यापुढे उभ्या राहणार्‍या समस्या व त्यांवरील उपाय यांचा मूलगामी शोध घेण्याचा गीताताईंचा प्रयत्न त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विचारवंताची उंची देतो यात शंका नाही.

      - संपादक मंडळ

साने, गीता जनार्दन