Skip to main content
x

शास्त्री, उमेश विश्वंभर

             शुवैद्यकीय क्षेत्रात परोपजीविशास्त्र शाखेतील मूलभूत संशोधनाने आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणारे शास्त्रज्ञ डॉ. उमेश विश्‍वंभर शास्त्री यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी १९६२मध्ये बी.व्ही.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी नोकरीत असताना प्रतिनियुक्तीवर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून एम.व्ही.एस्सी. आणि १९८४मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली. बीड येथे जिल्हा परिषदेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी १९६२ साली आपली कारकिर्द सुरू केली.

             चार वर्षांनंतर १९६६मध्ये ते नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून हजर झाले. त्यानंतर परभणी येथे कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयात निरनिराळी पदे भूषवून १९९१मध्ये उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता झाले व तेथूनच निवृत्त झाले. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात आपल्या आवडत्या संशोधन कार्यात म्हणजे परोपजीविशास्त्रासारख्या रूक्ष आणि उपेक्षित विभागाला त्यांनी आपल्या संशोधन कार्याने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तसेच रोगकारक जीवप्रकाराचे स्वरूप आणि त्याची रोग निर्माण करण्याची पद्धती अभ्यासून रोगनिदान तंत्र विकसित करण्याचे मूलभूत आणि किचकट संशोधन कार्य त्यांनी चिकाटीने आणि चिकित्सक वृत्तीने केले.

             सिस्टोसोमायॉसिस या रोगाचे महाराष्ट्रात पहिल्यांदा निदान करण्याचे श्रेय डॉ. शास्त्री यांना जाते. हा रोग सिस्टोसोमा स्पीन्डॅलिससारख्या कृमीमुळे उद्भवतो आणि गायी-म्हशींमध्ये विशेष करून आढळतो. बॅलेसियॉसिस हा एक परोपजीवी गोचीडजन्य आजार असून संकरित गायींमध्ये तो विशेष करून आढळतो. या रोगाची विषमज्वर, कावीळ, अ‍ॅनिमिया रोगांसारखीच लक्षणे असल्याने योग्य उपचारासाठी रोगनिदान महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने डॉ. शास्त्री यांनी या रोगाने मरण पावलेल्या जनावरांच्या मेंदूच्या ऊतीचा वापर करून हा प्राणघातक रोग बॅलेसिया जातीच्या जंतूपासून होऊ शकतो हे ओळखण्याचे तंत्र विकसित केले. हे तंत्र रोगनिदानासाठी जगभर वापरले जाते.

             थायलेरियासिस हा परोपजीवी आजारदेखील संकरित गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. हा रोग थायलेरिया या सूक्ष्मजंतूमुळे होतो. थायलेरिया या परजीवीमधील बार व व्हेल प्रतिकृतीचा रोगनिदानासाठी वापर करणारे डॉ. शास्त्री हे जगातील पहिले शास्त्रज्ञ होत. श्‍वास घेण्यास त्रास, खोकला, स्तनदाह, हगवण, गर्भपात अशी लक्षणे दाखवणारा टॉक्झोप्लाझ्मॉसिस हा जनावरांचा रोग टॉक्झोप्लाझ्मा या परजीवामुळे होतो. या जंतूची एक नवीन उपजात शोधून डॉ. शास्त्री यांनी संशोधनात भर टाकलेली आहे.

             डॉ. शास्त्री यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांतून ९०हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी पशुपालकांना उपयोगी पडतील असे अनेक मराठी लेख लिहिले आहेत. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याचे संदर्भ १००हून अधिक पुस्तकांत पाहावयास मिळतात. उदगीरसारख्या आडवळणाच्या गावी त्यांनी १९९३ साली अखिल भारतीय शास्त्रज्ञ परिषद यशस्वीरीत्या आयोजित केली. पशुवैद्यक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. शास्त्री यांचा भारतीय पशू परोपजीविशास्त्र सोसायटीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

- डॉ. विजय अनंत तोरो

शास्त्री, उमेश विश्वंभर