Skip to main content
x

संगीतराव, चंद्रकांत श्यामराव

           चंद्रकांत श्यामराव संगीतराव यांचा जन्म एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात नागपूर येथे झाला. त्यांचे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील वाटखेड हे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हैदराबाद, नागपूर व अकोला येथे झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी) १९६४मध्ये व एम.एस्सी. (कृषी) १९६६मध्ये वनस्पति-रोगशास्त्रात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली व त्याबद्दल ते रौप्य पदकाचे मानकरी ठरले.

           संगीतराव यांनी १९८३मध्ये डॉ.पं.दे.कृ.वि.ची पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यासाठी त्यांनी विदर्भातील ज्वारीच्या अरगट रोगाचा अभ्यास केला होता. त्यांनी काही काळ कृषी महाविद्यालय, वरोरा येथे व्याख्याता म्हणून काम केले. त्यांची १९७२मध्ये डॉ.पं.दे.कृ.वि.त साहाय्यक प्राध्यापक म्हणून कृषी महाविद्यालय, अकोला येथे निवड झाली व नंतर ते ज्वारी संशोधन प्रकल्पात शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले. संगीतराव यांची यानंतर सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली व त्यांना एम.एस्सी. व पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली.

           संगीतराव यांनी ज्वारीच्या अरगट रोगाच्या बुरशीचा जीवनक्रम, रोगाची लागण, वाढ, कुंदा व मारवेल ही होस्ट गवते, स्क्लेरोशियाद्वारे प्रसार, मिठाच्या द्रावणाद्वारे ग्रॅव्हिटी सेपरेटर चाळण्यांद्वारे वेगळे करण्याची पद्धत इ.चा अभ्यास केला. तसेच यासंबंधीच्या चर्चासत्रांमध्ये (सेंट लोगोस-ब्राझिल,१९९५) भाग घेतला.  

           संगीतराव यांनी १९९३मध्ये अळिंबी (मशरूम) संशोधन केंद्राची स्थापना चिखलदरा येथे केली. तेथे त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना अळिंबी लागवड करण्याचे प्रशिक्षण व सर्व शेतकऱ्यांसाठी अळिंबी बीजोत्पादन करण्याचे तंत्र शिकविले. त्यांनी प्ल्युरोटस साजर काजू व प्लुरोटस फ्लोरिडा दोन अळिंबीच्या जाती विदर्भासाठी योग्य असल्याचे दाखवून दिले. या धिंगरी जातीच्या अळिंबीचे जास्त उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा (सच्छिद्र सिलेंडर पद्धत) प्रसार केला. या नवीन पद्धतीमुळे उत्पादनात ४०% वाढ होते व अळिंबी पीक आठ दिवस आधीच तयार होते. या प्रकल्पामुळे मेळघाट विभागातील आदिवासी शेतकर्‍यांना रोजगार मिळाला व एक सकस अन्न उपलब्ध झाले. माँट्रीच (नेदरलँड) येथे झालेल्या (२०००) परिसंवादात संगीतराव यांचा गौरव झाला.

           डॉ. संगीतराव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर ३० शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांचे कापसावरील दहिया रोगाचे संशोधन संकलित करून ‘काँपेडियम ऑफ ग्रे मिल्ड्यू ऑफ कॉटन’ हे पुस्तक १९९३मध्ये प्रसिद्ध झाले. ते मशरूम रीसर्च जर्नलचे आजीव सदस्य आहेत. शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी संगीतराव यांनी आकाशवाणीवर व दूरदर्शनवर कार्यक्रम सादर केले.

           डॉ. संगीतराव मे २००१मध्ये सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरसुद्धा त्यांनी ग्राहक पंचायत या अशासकीय संघामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .   

- प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

संगीतराव, चंद्रकांत श्यामराव