Skip to main content
x

संत, प्रकाश नारायण

     कथाकार प्रकाश नारायण संत हे सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत आणि ज्येष्ठ लघुनिबंधकार ना.मा. संत यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म बेळगाव येथे झाला. मातापित्यांच्या वाङ्मयीन प्रतिभेचा वारसा घेऊनच ते जन्माला आले. कलाप्रेम आणि अभिजात रसिकता या देणग्या त्यांना आईवडिलांकडूनच मिळाल्या. ना.मा. संत यांच्या अकाली मृत्यूमुळे प्रकाश संत वयाच्या नवव्या वर्षी पितृसुखाला पारखे झाले. १९४६ साली झालेल्या ना.मा. संत यांच्या मृत्यूनंतर, १९४७ साली प्रकाश संत यांना त्यांच्या आजीने (इंदिरा संत यांच्या आईने) दत्तक घेतले. आपल्या आजोळी दत्तक गेलेले प्रकाश संत, लौकिक जीवनात भालचंद्र गोपाळ दीक्षित म्हणून वावरले.

      त्यांनी शालेय शिक्षण बेळगाव येथील ठळकवाडी हायस्कुलात पूर्ण करून इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण बेळगावचे लिंगराज महाविद्यालय येथे घेतले. त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. जिओलॉजी या विषयात (भूगर्भशास्त्रात) बी.एस्सी. करून, एम.एस्सी.ला प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी बेळगावजवळ असलेल्या कुवेशी या गावी, मँगनीजच्या खाणीवर सहा महिने Junior Geologist म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये एम.एस्सी.साठी प्रवेश घेतला.

      भूगर्भशास्त्रातच एम.एस्सी केल्यानंतर एक वर्ष फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.एस्सीच्या वर्गावर त्यांनी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम केले. १९६१ साली कराड येथे यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयामध्ये ते जिओलॉजी विभागात, विभागप्रमुख-असिस्टन्ट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. कालांतराने त्यांना प्रोफेसर म्हणून बढती मिळाली. १९९७ साली, ३६ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. दरम्यानच्या काळात, १९८२ साली पुणे विद्यापीठातून ‘सावंतवाडी, वेंगुर्ल्याजवळच्या मठ, होडावडा परिसरातील करीव ठेलज्ञचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच.डी केली.

     कथालेखक प्रकाश नारायण संत व भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक डॉ. भालचंद्र गोपाळ दीक्षित ही एकाच व्यक्तिमत्त्वात नांदत असलेली दोन रूपे होती. भूगर्भशास्त्राच्या त्यांच्या व्यासंगाच्या खुणा, ‘वनवास’ ते ‘झुंबर’ या सर्वच कथासंग्रहात आढळतात. भूगर्भशास्त्राचे त्यांचे ज्ञान कथासृष्टीत अत्यंत लालित्यपूर्ण रूप धारण करून येते. डॉ. दीक्षित पक्षितज्ज्ञ होते. त्याच्याही मनोरम खुणा या कथासृष्टीत विखुरलेल्या आहेत.

      प्रकाश संत यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यांच्या कथासंग्रहातील बरीचशी रेखाटने या गोष्टीची साक्ष देतात. संगीत हे त्यांचे दुसरे प्रेम होते. ते चांगले व्हायोलिनवादक होते. अभिजात शास्त्रीय संगीताची त्यांना विलक्षण आवड होती. लेखन हे त्यांचे तिसरे प्रेम होते. त्यांनी अगदी मोजके आणि कसदार लेखन केले. त्यांचे वाचन चौफेर होते. विद्यार्थिदशेतच त्यांनी जागतिक अभिजात कलाकृती वाचल्या होत्या. इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. आयुष्यभर त्यांनी जागतिक वाङ्मयाचा संग्रह केला. त्यावर मननचिंतन केले. आपल्या कलाछंद, भूगर्भशास्त्राचा व्यासंग, पशुपक्ष्यांचे ज्ञान या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या मानसपुत्राला म्हणजे लंपनला बहाल केल्या.

     आपल्या सर्व सर्जनशील साहित्यनिर्मितीमागे आईवडिलांच्या वाङ्मयीन प्रतिभेचा समृद्ध वारसा असल्यामुळे, त्यांची आठवण म्हणून लेखन करताना त्यांनी प्रकाश नारायण संत हेच नाव धारण केले. प्रकाश संत यांच्या सुरुवातीच्या लेखनावर वडिलांच्या साहित्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. प्रारंभी त्यांना लघुनिबंध लिहावेसे वाटले. सुरुवातीची काही वर्षे मोजके लघुनिबंध लिहून पाच-सहा वर्षांतच त्यांनी कथालेखनास प्रारंभ केला.

        १९६० ते १९६४ या काळात त्यांच्या ‘फुलाची गोष्ट’, ‘अर्थ’, ‘वीज’ आणि ‘वनवास’ या चार कथा प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर जवळजवळ २६ वर्षांनी, १९९० सालानंतर संतांनी पुन्हा कथालेखन सुरू केले. वरील चार कथा आणि नंतरच्या नऊ कथा, अशा तेरा कथांचा समावेश १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहात, ‘वनवास’मध्ये आहे. कथालेखनात काळाचा फरक असूनही तेरा कथांमधील अनुभवविश्वात आणि भावविश्वात विलक्षण एकात्मता आहे. ‘वनवास’मध्ये एक संपन्न बालविश्व, बालमनाच्या जाणिवेसह, कोणतीही भूमिका न घेता सहजगत्या साकार होते. पौगंडावस्थेतील लंपनच्या अनेक भावावस्था संतांनी मोठ्या सूक्ष्मतेने टिपल्या आहेत. सुमी आणि लंपनच्या रमणीय भावबंधाचे अनेक आविष्कार, लंपनसारख्या मुलांची क्रीडाशील, वृत्ती मानवेतर जगाबद्दल त्याच्या मनात असलेली विलक्षण आस्था त्यांनी ‘वनवास’मध्ये चित्रित केली आहे.

        लंपनच्या भावविश्वाचा पुढचा टप्पा ‘शारदा संगीत’ या दुसर्‍या संग्रहातल्या कथांतून साकार झाला आहे. लंपनचे विस्तारलेले जग, तसेच त्याच्या कलासक्त मनाचे सुंदर आविष्कार यात प्रकट झाले आहेत. ‘शारदा संगीत’मधला लंपन इतरांच्या मनाचा वेध घेऊ लागला आहे.‘परचक्र’ ही कथा वगळता, या संग्रहातल्या सर्व कथा बहुकेंद्री आहेत. त्या जसे व्यक्तीचे अंतरंग प्रकट करतात, तसे समूहमनही प्रकट करतात.

       २००१ साली प्रसिद्ध झालेल्या तिसर्‍या ‘पंखा’ या कथासंग्रहातल्या कथांमधून, लंपनचे मानवी मनाचे आकलन वाढल्याचे व त्याची जीवनदृष्टी उत्तरोत्तर प्रगल्भ होत चालल्याचे जाणवते. प्रकृती आणि विकृती, मंगल आणि अमंगल, नीती आणि अनीती यांनी व्यापलेले हे जग आहे तसे स्वीकारावे लागते, आपल्या जगण्याचा तो अपरिहार्य भाग आहे याची लंपनला येत चाललेली जाण या कथांमधून प्रभावीपणे प्रकट झाली आहे.

       पहिले तीन कथासंग्रह प्रकाश संत यांच्या हयातीत प्रसिद्ध झाले. चौथा आणि दुर्दैवाने शेवटचा ठरलेला ‘झुंबर’ हा कथासंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने, २००४ साली प्रसिद्ध झाला. स्कूटर अपघातात, डोक्याला लागलेल्या जबर मारामुळे प्रकाश संत यांचे निधन झाले.

       संतांच्या प्रतिभेचे नवेनवे उन्मेष ‘झुंबर’मधल्या कथांतून पाहायला मिळतात. खळाळते हास्य आणि जीवघेणी व्याकूळता या दोन्हींचा या कथांमधून सारखाच प्रत्यय येतो. वरवर विनोदी वाटणार्‍या या कथा अंतर्यामीचे दु:खाचे कढ प्रकट करतात. या कथांमधून भेटणारा लंपन जीवनातील अटळ दु:खांकडे समंजसपणे पाहताना, त्यांचा समंजस स्वीकार करताना दिसतो.

       संतांच्या कथालेखनातील वैशिष्ट्यांचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे भाषा या घटकाला असलेले स्थान. ती आशयसंपन्न आणि अर्थसमृद्ध आहे. या भाषेचे तीन विशेष आहेत. पहिला विशेष म्हणजे कानडीचा प्रभाव असलेली मराठी बोली. दुसरा विशेष म्हणजे ‘खास’ मुलांची असणारी भाषा आणि तिसरा विशेष म्हणजे लंपनची स्वत:ची खास भाषा. कानडीचा प्रभाव असलेली सीमारेषेवरील मराठी बोली ही विलक्षण भावनोत्कट, विविध रसांचा प्रत्यय देणारी आहे. ती जेवढी खमंग आहे, तेवढीच तरल संवेदना प्रकट करणारी आहे. संतांच्या कथांतील व्यक्ती आपल्या बोलीतून भावनांची उत्कट अभिव्यक्ती करतात. मराठी गद्य साहित्यात, विशेषत: कथेच्या क्षेत्रात मुलांची भाषा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सातत्यपूर्वक पहिल्यांदाच प्रकाश संत यांच्या कथांतून प्रकट झाली आहे.

        या कथांच्या काळाचा विचार केला की त्यातील सांस्कृतिक आणि वाङ्मयीन संदर्भावरून असे जाणवते की हा काळ भारतीय स्वातंत्र्याच्या आगेमागे असलेला आहे. पण, या कथांतून सदोदित वर्तमानच जाणवतो. कोणत्याही बाल्याचा हा वर्तमान आहे; कोणासही आस्वाद्य असा. हे बाल्य भूतकाळात जमा होत नाही. ते वर्तमानातच राहते. ही लंपनची कथा आत्ता-आत्ता घडलीय असा अनुभव वाचकाला येतो. काळाचे बंधन तोडून आजच्या कुमारवयीन पिढीलाही आपलीशी वाटणारी कथा हे संतांच्या कथांचे, तसेच लेखक म्हणून संतांचे असलेले वैशिष्ट्य आहे.

         हे चारही कथासंग्रह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. ‘वनवास’ या कथासंग्रहाला १९९३ सालचा श्री.दा. पानवलकर पुरस्कार, १९९४-१९९५चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, १९९५ सालचा इचलकरंजीहून दिला जाणारा ग्रंथोत्तेजक पुरस्कार, १९९६ सालचा डॉ. अ.वा. वर्टी पुरस्कार आणि १९९७ सालचा महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘शारदा संगीत’ या कथासंग्रहालाही १९९७-९८ सालचा महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार लाभला, तर ‘पंखा’ या कथासंग्रहाला २००१ साली इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       या पुरस्कारांच्या बरोबरीनेच संतांच्या काही कथांचे अनुवादही करण्यात आलेले आहेत. एका मराठी लेखकाची कथा अन्य भाषांमध्ये अनुवादित होणे या घटनेचे मोल पुरस्काराइतकेच आहे. १९९५ साली ‘शारदा संगीत’ या कथेचा अनुवाद धनंजय कापसेंनी केला आहे, तर सुप्रसिद्ध समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी ‘समज’ ही कथा 'The Age of Awakening’ या शीर्षकाने अनुवादित केलेली आहे. तसेच कमल संन्याल यांनी ‘ओझं’ या कथेचे ‘Burden’ असे भाषांतर केलेले आहे. के.ज. पुरोहित, सुधा जोशी यांनी २००४ साली संपादित केलेल्या ‘मराठी कथा- विसावे शतक’ या ग्रंथात ‘आदम’ या कथेचा समावेश करण्यात आला आहे.

       प्रकाश संत यांच्या चारही कथासंग्रहांतील निवडक कथांचे पुणे आकाशवाणीसाठी ‘शारदा संगीत’ या नावाने नभोनाट्यात रूपांतर करण्यात आले होते. २००४ साली या कथा नभोनाट्याच्या रूपात प्रसारित झाल्या. तसेच, ‘ओझं’ या कथेचे कोल्हापूरच्या प्रत्यय कला केंद्राने नाट्यरूपांतर करून त्याचे प्रयोग केले.

       - संपादक मंडळ

संत, प्रकाश नारायण