Skip to main content
x

शशिकला, .

     शशिकला जवळकर यांचा जन्म सोलापूरला झाला. त्या दिसायला सुंदर होत्याच, पण घरच्या गरिबीमुळेही त्यांना पाचव्या वर्षीपासूनच मेळ्यात काम करावे लागले. त्यांचे वडील रंगभूमीवर अभिनय करत असत. मात्र रंगभूमीला त्या काळात उतरती कळा आल्याने वडिलांनी सोलापूरहून पुण्याला आपले बस्तान हलवले. पुण्याच्या प्रभात कंपनीतही काम न झाल्याने १९४४ साली वडील कुटुंबासह मुंबईला आले. त्या वेळी नूरजहाँचे पती शौकत हुसेन ‘झीनत’ हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. चित्रपटात नूरजहाँ, याकूब, शाहनवाझ असे अनेक मोठे कलाकार काम करत होते. या चित्रपटात ‘आहे ना भरो..शिकवे ना करो..’अशी कव्वाली होती. या कव्वालीमध्ये शशिकला यांना काम मिळाले. ही कव्वाली आणि हा चित्रपट खूप गाजला आणि शशिकला यांना चित्रपटातून छोटी-मोठी कामे मिळू लागली. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे असेल तर हिंदी व उर्दू येणे गरजेचे आहे, हे ओळखून शशिकला यांनी हिंदी भाषेचा सराव केला.

     निर्माता पी.एन. अरोरा यांनी शशिकला यांना ‘डोली’ आणि ‘पगडी’ या चित्रपटांतून सहनायिकेच्या भूमिका दिल्या व नंतर ‘गर्ल स्कूल’ या चित्रपटात दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी त्यांना नायिकेची भूमिका दिली. ‘झीनत’मधल्या कामासाठी त्यांना फक्त पंचवीस रुपये मिळाले होते. मात्र अमिया चक्रवर्ती यांनी त्यांना दरमहा चारशे रुपये पगार दिला. शशिकला हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्याच स्थिरावल्या.

     ‘आरजू’, ‘प्रीत का गीत’, ‘रुपय्या’, ‘सरकार’, ‘अजीब लडकी’, ‘चाचा चौधरी’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना पैसा आणि लोकप्रियताही मिळवून दिली. नंतर शांतारामबापूंनी त्यांना राजकमलमध्ये बोलावून घेतले आणि ‘तीन बत्ती चार रास्ता’, ‘सुरंग’ या चित्रपटातून प्रमुख भूमिका दिल्या.

     त्या काळात शशिकला यांनी ओमप्रकाश सैगल या पंजाबी गृहस्थाशी प्रेमविवाह केला आणि सैगल यांच्या सहकार्याने ‘करोडपती’ या चित्रपटाची निर्मिती केली. १९४९ साली अच्युत रानडे यांनी ‘जागा भाड्याने देणे आहे’ या चित्रपटात काम करण्यासाठी शशिकला यांना बोलावले होते. या चित्रपटात त्यांनी कामही केले. १९५० साली बाबूराव पेंढारकर यांनी ‘चाळीतील शेजारी’ या चित्रपटात शशिकला यांना छोटी भूमिका दिली होती. त्यानंतर राजा नेने दिग्दर्शित ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. १९५७ साली यशवंत पेठकर दिग्दर्शित ‘झालं गेलं विसरून जा’ या चित्रपटात शशिकला यांनी नायिकेची भूमिका केली. ‘यंदा कर्तव्य आहे’ (१९५८) व ‘सलामी’ (१९६०) हे त्यांचे आणखी काही चित्रपट होते. यानंतर तब्बल २५ वर्षांनंतर ‘गुंतता हृदय हे’ (१९८४) या नाटकावर आधारलेल्या ‘महानंदा’ चित्रपटात त्यांनी काम केले.

     त्याच वर्षी त्यांनी ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटात कजाग सासूची भूमिका केली, तर ‘धाकटी सून’ या चित्रपटात प्रेमळ समाजसेविकेची भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारली. ‘जीना इसीका नाम है’, ‘अपनापन’, ‘दिल देके देखो’ अशा दूरदर्शन मालिकांतूनही त्यांनी काम केले. तसेच ‘अग्निपुत्र’, ‘परदेसी बाबू’, ‘बादशहा’ यासारख्या चित्रपटांतून चरित्र अभिनेत्री म्हणूनही त्यांनी काम केले.

     व्ही. शांताराम प्रतिष्ठानतर्फे त्यांना व्ही. शांताराम पुरस्कारही दिला गेला होता.

- द.भा. सामंत

शशिकला, .