Skip to main content
x

तुपे, उत्तम बंडू

    मातंग समाजातील केवळ तिसरीपर्यंत शिकलेल्या उत्तम बंडू तुपे यांचे सर्व साहित्य गावरान, रांगड्या  समाजातील केवळ तिसरीपर्यंत शिकलेल्या उत्तम बंडू तुपे यांचे सर्व साहित्य गावरान, रांगड्या भाषेत लिहिलेले असून त्याला मातंग, ग्रामीण समाजातील बोलीभाषेची डूब आहे.

तुपे अशा अशिक्षित कुटुंबात जन्मले की त्यांची जन्मतारीखही कुठे नोंदवलेली नाही. त्यांच्या आईच्या, कोंडाबाईच्या सांगण्यानुसार, ‘गांधीबाबाला भटा-बामणांनी गोळ्या घातल्या त्या वक्ताला दंगलीचा होमकुंड पेटलेला तवा ह्यो हिरा जन्माला आला.’ त्यामुळे सोयीसाठी म्हणून १ जानेवारी १९४८ ही त्यांची जन्मतारीख मानली गेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडीजवळील घायपातवाडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. केकताड म्हणजे घायपात पाण्यात भिजत ठेवून, त्याचा वाख तयार करून दोरखंड वळणे हा त्यांच्या आई-वडिलांचा पोटापाण्याचा व्यवसाय. लहानपणापासून हे काम पाहत असताना त्यांना प्रश्न पडला व त्यांनी आईला विचारले, “काटकिंजाळ केकताडाचा ह्यो पांढराफेक वाख कसा ग हुतो आए?” त्यावर आईने उत्तर दिले, “बाळा, पाण्याच्या पोटात केकताडाची आग थंड हुती न त्येचाच रेसमागत, मऊलूस वाख हुतोया.” ह्या वाखाच्या संगतीत, दोरखंड वळण्यासाठी किंवा शेतमजुरी करण्यासाठी आई- बापांना मदत करण्यात, गावोगाव हिंडण्यात त्यांचे बालपण गेले. गावांतल्या शाळांमधून अनेक प्रकारे उपेक्षा सहन करीत तीसरीपर्यंत कसेबसे शिक्षण झाले.

स्वयंभू लेखक-

घरी अठराविसे दारिद्य्र, वडील-बंडू भैरू तुपे, आई-कोंडाबाई, ४ बहिणी, २ भाऊ व स्वतः उत्तम अशा ९ जणांचे कुटुंब! पोटासाठी गावोगावी भटकंती, प्रतिकूल सामाजिक स्थिती यांमुळे या कुटुंबातील मुलांवर  शिक्षणाचे संस्कार झालेच नाहीत. मात्र अस्पृश्यतेचे विदारक अनुभव बरेच काही शिकवून गेले. समाजातील अशा पददलित स्तरातील माणसाला जगण्यासाठी पोटासाठी किती तीव्र आणि जीवघेणा झगडा करावा लागतो, याचा प्रत्यय त्यांच्या सगळ्या लेखनातून प्रत्यही येतो. जन्मभर पोटासाठी झगडा, धडपड हेच त्यांचे ध्येय, हेच त्यांचे जीवन होते. शिक्षण नाही, वाचन नाही तरी केवळ आंतरिक ऊर्मीतून त्यांना लेखनाचा छंद जडला. सुरुवातीला त्यांनी काही लावण्या रचल्याचा उल्लेख आढळतो. पुस्तके मिळवताना आणि ती वाचण्यासाठी सवड मिळवतानाही त्यांना अनंत अडचणी येत. त्यांनी लिहिलेले आत्मीयतेने वाचून त्यांना दिशा दाखवणारेही कोणी नव्हते. त्यामुळे वाचलेल्या पुस्तकांद्वारे अनेक मराठी लेखकांच्या साहित्याचे वेडेवाकडे परिणाम त्यांच्या साहित्यावर झालेले दिसतात. जवळ असलेला अनुभवांचा समृद्ध साठा, निसर्गतः लाभलेली ग्रामीण शैली आणि प्रतिभावंताची कल्पकता यांच्या बळावर सुरुवातीला बर्‍याच ग्रामीण कथा लिहिल्या. त्यांतील काही सुरुवातीला मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या. ‘कुनी सांगायला न्हाई आन वाचायला दिलं तर ते वाचायला कुनाला टाइम बी न्हाई. माझा मीच सुचंल ते, टाइम मिळंल तवा लिहितो.’ असा हा स्वनिर्मित, स्वयंभू लेखक आहे.

अनघड भाषेतले आत्मकथन-

साहित्य जगतात खर्‍या अर्थाने ‘उत्तम बंडू तुपे’ हे नाव परिचित झाले ते त्यांच्या आत्मकथनामुळे, ‘काट्यावरची पोटं’मुळे. अत्यंत प्रांजल, सच्चे, गावरान, रोजच्या बोलीभाषेत लिहिलेले हे आत्मनिवेदन एका समग्र सामाजिक आणि कौटुंबिक वास्तवाचे दर्शन घडविते. प्रसिद्ध लेखक आनंद यादव यांची प्रस्तावना या आत्मवृत्ताला लाभली आहे. लेखकाचा गौरव करताना आनंद यादव म्हणतात, “या आत्मनिवेदनाचा कस अव्वल दर्जाचा वाटतो. सोयीस्कर छुपा अप्रामाणिकपणा दाखवणारी कोणतीही प्रछन्न चतुराई यात नाही. त्यामुळेच एका अनघड माणसाने अनघड भाषेत केलेले हे आत्मनिवेदन वाचकाच्या मनाचा कब्जा घेते.”

‘इजाळ’ ही त्यांची पहिली कादंबरी (१९८४). ग्रामीण भागात पसरलेले विजेचे जाळे व त्यात अडकलेला, त्याचे चांगले-वाईट परिणाम भोगणारा गरीब शेतकरी हा ‘इजाळ’चा विषय आहे. ‘झुलवा’ (१९८६) ह्या कादंबरीचा विषय आहे जोगतिणीचे उपेक्षित जिणे. ह्याच कादंबरीवरून ‘झुलवा’ हे नाटक रंगभूमीवरील क्रांतिकारक नाटक म्हणून खूप गाजले. ह्या कादंबरीमुळे व नाटकामुळे शहरी, पांढरपेशा वर्गाला जोगतिणीच्या उपेक्षित, लाजिरवाण्या जीवनाची ओळख झाली. ‘कळासी’ (१९८८) ही ग्रामीण भागातल्या शेतमजुरांच्या दारिद्य्राची आणि दुर्दैवाची हृदयस्पर्शी कहाणी असलेली कादंबरी. तुपे यांच्या खास ग्रामीण भाषेची, रसरशीत अनुभवांची डूब असलेली ही कादंबरी वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. याशिवाय ‘आंदण’, ‘कळा’, ‘कोंबार’ (कादंबरी), ‘खाई’ (कादंबरी), ‘खुळी’ (कादंबरी), ‘चिपाड’, ‘सावळं’, ‘नाक्षारी’, ‘पिंड’, ‘भस्म’, ‘माती आणि माणसं’ (कथा) ‘लांबलेल्या सावल्या’, ‘शेवती’. अशी मोठी साहित्यसंपदा केवळ अक्षरओळख झालेल्या या कल्पक प्रतिभावंत लेखकाने निर्माण केली आहे. शिक्षणासाठी आणि पोटासाठी माळी, वॉचमन, बिगारी, शिपाई, मजूर, हमाल अशी हलकी कामे त्यांनी केली आहेत आणि पोटासाठी अविरत धडपडत हा लेखक लिहीत राहिला आहे. त्यांच्या लक्षणीय, अनोख्या अनुभवांतून निर्माण झालेल्या रसिकप्रिय साहित्यामुळेच साठोत्तरी ग्रामीण, दलित साहित्यिकांत त्यांचा समावेश झाला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असे पुरस्कार तुपे यांना लाभले आहेत तरीही उतारवयात त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरूच आहे. 

- सविता टाकसाळे/आर्या जोशी

तुपे, उत्तम बंडू