Skip to main content
x

उजगरे, निरंजन हरिश्चंद्र

निरंजन उजगरे यांचा जन्म उषा आणि हरिश्चंद्र उजगरे यांच्या पोटी भुसावळ येथे झाला. त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते. त्यामुळे वडील त्यांच्या वाट्याला फारसे आले नाहीत. मात्र आई आणि आजी सोनूबाई (वडिलांची आई) यांच्या सहवासात त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. त्यांच्या कुटुंबात साहित्याचा वारसा त्यांच्या आजी-आजोबांपासून चालत आलेला आहे. शिक्षकी पेशातले त्यांचे आजोबा भास्करराव हे कवी होते. ते रेव्हरन्ड नारायण वामन टिळक यांच्या कवितासंग्रहाचे साक्षेपी संपादक आणि प्रकाशक म्हणून प्रख्यात आहेत. ‘टिळकांची कविता भाग-१’ (१९१४) व ‘टिळकांची कविता भाग-२’ (अभंगांजली) हा संग्रहही त्यांनी संपादित केलेला आहे. हरिपंत केळकर (अलिबाग) हे निरंजनचे पणजोबा (वडिलांचे आजोबा). हेही शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि कवी होते.

 निरंजन उजगरेंचे थोरले काका विभाकर आणि विजयानंद हे दोघेही लेखक आणि कवी होते. निरंजनच्या आईचे ‘एकेक वेस ओलांडताना’ हे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे तर त्यांची आत्या यशोदा पाडगावकर यांचे ‘कुणास्तव कुणातरी’ (२००३) हे आत्मचरित्र महत्त्वाचे ठरले आहे.शालेय जीवनात निरंजन त्यांच्या ताईआत्या, यशोदा पाडगावकर यांच्याकडे जात. कवी मंगेश पाडगावकरांच्या संग्रहातील उत्तमोत्तम पुस्तके ते वाचत असत.

त्यांचे शिक्षण गिरगावातील चंदावरकर शाळा आणि विल्सन हायस्कूल येथे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण सांताक्रूज येथील आनंदीलाल  पोद्दार हायस्कूलमध्ये झाले. पार्ले महाविद्यालयात इंटर सायन्स पूर्ण केल्यावर व्ही.जे.टी.आय. येथे त्यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. डिसेंबर १९७३पासून ठाण्यातील वागळेे इस्टेट येथे त्यांनी ‘निरंजन इंजिनिअरिंग वर्क्स’ सुरू केले. चारचाकी गाड्यांना लागणार्‍या सुट्या भागांचे उत्पादन करीत असतानाच ‘अनब्रेकेबल वॉल हुक्स’च्या उत्पादनास त्यांनी सुरुवात केली. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांना रौप्यपदक प्राप्त झाले होते.

इंजिनिअरिंगचा व्यवसाय सांभाळून त्यांनी आपली संवेदनशीलताही जपली होती. अनेक कविता त्यांनी या काळात लिहिल्या. पूर्ण वेळ साहित्यिक कार्य करण्यासाठी त्यांनी आपल्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. रोटरिअन म्हणूनही त्यांनी कार्य केले होते. तेथेही त्यांनी राजीनामा दिला, आणि साहित्यिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.

निरंजन उजगरे यांनी पहिली कविता वयाच्या नवव्या वर्षी लिहिली (१० जुलै १९५९). सुरुवातीच्या कवितांना अनुरूप चित्रे ते स्वतः काढीत असत. कधी मासिकांतील चित्रांचे कात्रण करून लावत. आपल्या शंभर कवितांची पहिली वही त्यांनी नेहरूंना अर्पण केलेली आहे. आरंभीच्या काळात गद्यलेखन करताना ‘किरण’ हे नाव त्यांनी घेतलेे. पण पुढे ते निरंजन उजगरे या नावानेच लेखन करू लागले. या दोन्ही नावांतील ‘प्रकाश’ मात्र आपले लक्ष वेधून घेतो. पॉप्युलर प्रकाशनामध्ये प्रमुख संपादकाची नोकरी त्यांनी स्वीकारली होती (ऑगस्ट २००४). पण त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी त्यांचे निधन झाले.

‘दिनार’ हा त्यांचा कवितासंग्रह अरब देशातील त्यांच्या वास्तव्यातील अनुभवांचे प्रतिबिंब आहे, तर ‘दीपवा’ कविता संग्रहातील कविता या त्यांच्या डोळ्यावर झालेल्या शल्यचिकित्सेच्या काळातील उजेडाचे कवडसे आहेत. निरंजन उजगर्‍यांच्या प्रकाशित साहित्यामध्ये प्रामुख्याने ‘नवे घर’, ‘दिनार’, ‘प्रहर’, ‘दीपवा’, ‘तत्कालीन’ आदी कवितासंग्रह तर ‘सोव्हिएत भावकविता’, ‘विणू लागली आजी’, ‘हिरोशिमाच्या कविता’, ‘फाळणीच्या कविता’ हे अनुवादित कवितासंग्रह प्रसिद्ध होत. ‘काळोखातील कवडसे’, ‘उगवतीचे रंग’, ‘महाराष्ट्राबाहेरील मराठी’, ‘कांगारूंचे मराठी आप्त’ हे संपादित ग्रंथ आहेत आणि ‘जायंट व्हील’ ही कादंबरी आहे.

उजगरे यांच्या पत्नी डॉ. अनुपमा उजगरे यांच्या कथा, कविता आणि संशोधनपर लेखन व ललित लेखन प्रसिद्ध आहे. मराठी साहित्यात भरीव लेखन करणार्‍या निरंजन उजगरेंना ‘सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार’ (१९८९), ‘महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार’ (२००२) यांसह मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.

- डॉ. सिसिलिया कार्व्हालो

 

उजगरे, निरंजन हरिश्चंद्र