Skip to main content
x

वाड, विजया

     विद्यार्थिप्रिय शिक्षिका आणि साहित्यिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया वाड या पूर्वाश्रमीच्या विजया दातीर. त्यांचा जन्म नाशिक येथे सुसंस्कृत, सुशिक्षित, मध्यम-वर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण पनवेल, पुणे, मुंबई येथे झाले. त्या बी.एस्सी.-बी.एड.नंतर त्यांनी एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या संपादन केल्या.‘आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ हा त्यांच्या प्रबंधांचा विषय होता. श्रीलंकेतील ‘इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लिमेन्टरी मेडिसिन’ या संस्थेतर्फे त्यांना डी.लिट. ही सन्माननीय पदवी २००८ साली प्राप्त झाली.

     विजयाताईंना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती, त्यातूनच लेखनाचा संस्कार होत गेला आणि शिक्षिकेची नोकरी मिळाल्यामुळे या दोन्हींना अधिक वाव मिळत गेला, त्याचा त्यांनी यथार्थपणे उपयोग केला. उदयाचल हायस्कूल, विक्रोळी; राजा रामदेव पोद्दार शाळा येथे त्यांनी शिक्षिका ते प्राचार्य आणि संस्थेच्या संचालिका ते विश्वस्त अशी जबाबदारीची पदे भूषविली. सामाजिक कार्यातही त्या आघाडीवर आहेत. अंध, कर्णबधिर, आदिवासी इ. क्षेत्रांत त्यांनी मोठे काम केले आहे.

     साहित्यक्षेत्रात त्यांची ओळख प्राधान्याने बालसाहित्यकार असल्याने २००७च्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांचा बालसाहित्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर असून आकाशवाणी व दूरदर्शनवरून कथांवर आधारित ‘लाडी’, ‘बंडू बॉक्सर’ व ‘अखंड सौभाग्यवती’ हे चित्रपट तयार झाले असून पहिले दोन मुलांसाठी आहेत. त्यांची एकूण ७५पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे इत्यादी संस्थांचे पुरस्कार मिळाले असून त्यांच्या पर्यावरणावरील कवितेला राष्ट्रीय स्तरावर दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

     त्यांनी कादंबरी, कथा, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, ललित अशा विविध आकृतिबंधांत लेखन केले असून, ‘अभोगी’, ‘अक्षांश, रेखांश’, ‘त्रिदल’ इत्यादी कादंबर्‍या त्यांच्या नावावर आहेत. ‘ऋणानुबंध’, ‘गस्तिंड’, ‘अवेळ’, ‘गुजगोष्टी’ हे त्यांचे काही कथासंग्रह होत.

     डॉ. वाड या ‘मराठी विश्वकोशा’च्या विद्यमान अध्यक्षा व प्रमुख संपादिका आहेत. त्यांच्या कारकिर्दीत विश्वकोशाचे १७ व १८ हे खंड, १ ते १७ खंडांची सी.डी., विश्वकोशाचे संकेत स्थळ, अंधांसाठी बोलका विश्वकोश इत्यादी उपक्रम झाले. विश्वकोशाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांना ‘मुलुंडभूषण’सह अनेक पुरस्कार मिळाले असून नुकताच ‘निवडक विजया वाड’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ‘कन्याकोश’ हा त्यांचा नियोजित संकल्प आकारास येत आहे.

- मधू नेने

वाड, विजया