Skip to main content
x

वसईकर, गणपत पिराजी

पं.विष्णू दिगंबर पलुसकरांच्या काळातील घराणेदार सनईवादक म्हणून पं. गणपत वसईकरांचे नाव प्रसिद्ध आहे. व्यावसायिक सनईवादक म्हणून त्या काळात ते मोठमोठ्या संगीतोत्सवात सनईवादन करीत असत. गणपत पिराजी वसईकर यांचा जन्म वसई येथे झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती विशेष चांगली नसल्याने त्यांचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही.  त्यांना सनई व तबलावादनाचे शिक्षण मिळाले. त्यांना वसईतील देवळाच्या नगारखान्यात सनईवादकाची नोकरी मिळाली होती. देवस्थानाच्या व्यवस्थापकांनी या होतकरू कलाकाराची प्रतिभा हेरून, त्याला शिष्यवृत्ती देऊन मुंबईच्या उ. नजीर खाँ यांच्याकडे  शिकायला पाठवले. तिथे गुरुसेवा करून त्यांनी विद्या मिळविली. आपल्या ज्ञानात भर घालून त्यांनी सनईवादनाचे तेज वाढविले.

गणपत वसईकर उत्तम तबला साथही करीत. पं.विष्णू दिगंबर पलुसकरांच्या भजनांच्या कार्यक्रमांची शोभा त्यांच्या तबला साथीने द्विगुणित होत असे.  बडोदा संस्थानाच्या अधिपतींच्या आज्ञेवरून त्यांनी ‘सनईवादन पाठशाला’ भाग १ व २ ही सनईवादन संदर्भातील शास्त्रोक्त क्रमिक पुस्तके १९१८ साली लिहून प्रकाशितही केली.

आयुष्यातली शेवटची २०-२५ वर्षे त्यांनी भगवद्भक्तीत घालवली. तेव्हाचे त्यांचे स्वरूपदर्शन लोकांना प्रभावित करीत असे. लांब आणि शुभ्र दाढी-मिशा, भालप्रदेशी गंधाचा टिळा आणि मस्तकावरील महाराष्ट्रीय पद्धतीची पगडी घालून ते सनईवादनासाठी व्यासपीठावर येऊन बसले, की त्या दर्शनाने लोक मुग्ध होत. त्यांचे वादनही परिपक्व व सुंदर असे. त्यांना शेवटपर्यंत बडोदा दरबाराकडून आर्थिक साहाय्य मिळाले.

डॉ. सुधा पटवर्धन

वसईकर, गणपत पिराजी