Skip to main content
x

जोग, विष्णू गोविंद

विष्णू गोविंद जोग यांचा जन्म वाई येथे झाला. त्यांना संगीताची उपजतच आवड होती. बेळगाव येथे त्यांच्या वडिलांची गोपाळ संगीत नाटक मंडळी होती. लहानपणीच त्यांचे पितृछत्र हरपले, तरीसुद्धा त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात खंड पडू दिला नाही. आपल्या मुंबईतील वास्तव्यात त्यांनी आपले मामा शंकरराव आठवले यांच्याकडे संगीताचे, तसेच गणपतराव पुरोहित यांच्याकडे, विशेषत: कंठसंगीताचे मार्गदर्शन घेणे सुरू केले. पण व्हायोलिन या वाद्याची त्यांना एवढी ओढ होती, की ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक’मध्ये तत्कालीन संगीत शिक्षक पं. विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडे त्यांनी व्हायोलिनचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. पुढे पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर आणि उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांच्यासारख्या संगीत महर्षींकडून त्यांनी मार्गदर्शन मिळविले.
जोगांनी या वाद्याच्या तंत्राचा अभ्यास करून आपले वादनतंत्र विकसित केले. एकूणच या सर्व वादनकौशल्याचा उपयोग त्यांनी स्वतंत्र वादन, साथसंगत आणि इतर अनेक वाद्यांबरोबर सहवादन करताना करून घेतला. लखनौच्या मॉरिस म्युझिक कॉलेजमधून त्यांनी संगीतातील एम.ए. पदवी प्राप्त केली व १९४४ मध्ये
पं. रातंजनकरांनी जोगांची नेमणूक मॉरिस म्युझिक कॉलेजमध्ये व्हायोलिनसाठी ‘व्याख्याता’ या पदावर केली. जोग येथे विद्यादानात १०-१५ वर्षे
  व्यस्त होते. या काळात उत्तर हिंदुस्थानातील अनेक दिग्गज गायकांचे गायन ऐकून ते प्रभावित झाले. आपल्या वादनात त्यांनी उत्तरेतील ढंगदार, रंगतदार गायकीचा समावेश केला.
पं. रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पं. हरिप्रसाद चौरसिया, अली अहमद हुसेन आणि सध्याच्या पिढीतील उस्ताद शाहीद परवेझ अशा दिग्गज कलाकारांबरोबर जोगांनी सहवादन केले. तसेच
  त्यांनी पं. एम.एस. गोपालकृष्णन, डॉ. एन. राजम या दिग्गज व्हायोलिनवादकांबरोबरही सहवादन केले. उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेबांबरोबर वाजविलेल्या जुगलबंदीची तर देश-विदेशांत खूपच प्रशंसा झाली.
‘बेला शिक्षा’ हे त्यांचे व्हायोलिनवादनावरचे पुस्तक १९४४ मध्ये प्रकाशित झाले. व्हायोलिनला तरफा लावून त्यांनी व्हायोलिनचा नादगुण समृद्ध केला आणि त्याला ‘जवारी व्हायोलिन’ असे नाव दिले. ते १९५५ पासून आकाशवाणी, लखनौ केंद्रावर संगीत विभागात कार्यक्रम निर्देशक म्हणून कार्यरत झाले व त्यांनी १९७१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली.
यानंतर पं. जोग हे कोलकाता येथे स्थायिक झाले आणि आय.टी.सी. कंपनी पुरस्कृत ‘संगीत रिसर्च अकादमी’च्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून ते कार्यरत राहिले. चाळीस वर्षे अव्याहत स्वतंत्र व्हायोलिनवादन, सहवादन करून पं. जोगांनी आपला स्वतंत्र ठसा संगीत जगतावर उमटविला. पं. ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद बडे गुलामअली खाँ, फैय्याज खाँ, हिराबाई बडोदेकर, विनायकबुवा पटवर्धन अशा अनेक मान्यवर
  गायक-गायिकांची साथसंगतही त्यांनी वेळोवेळी केली. श्रीमती माणिक वर्मा यांच्या ‘भटियार’ आणि ‘जोगकंस’ रागांच्या ध्वनिमुद्रिकेतही पं. जोग यांच्या व्हायोलिनची साथसंगत आहे.
त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल १९८० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९८३ मध्ये
  त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून ‘पद्मभूषण’ किताब बहाल करण्यात आला. उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीनेही त्यांचा यथोचित गौरव केला. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीनेही त्यांना १९९८ साली पुरस्कार दिला.
त्यांचे वेळोवेळी परदेश दौरे झाले. ते १९६८ मध्ये अमेरिकेला जाणारे भारतातील पहिले हिंदुस्थानी व्हायोलिनवादक होते. कॅलिफोर्नियामध्ये बर्कले येथे अली अकबर स्कूल ऑफ म्युझीकमध्ये त्यांनी व्हायोलिन आणि गायनाचे अध्यापन केले. ते १९४८ मध्ये भारताच्या सांस्कृतिक कला पथकाबरोबर नेपाळला जाऊन आले होते. त्यांचे १९९५ मध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर मात्र प्रकृतिस्वास्थ्य खालावले. त्यांच्यावर काही कौटुंबिक आघातही झाले. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी कोलकाता येथेच त्यांचे पार्किन्सनच्या विकाराने निधन झाले.

रत्नाकर गोखले

 

जोग, विष्णू गोविंद