Skip to main content
x

जोगळेकर, मृणालिनी परशुराम

         मृणालिनी जोगळेकरांचा जन्म पुणे येथे झाला. एम.ए., बी.एड. झाल्यानंतर त्या अध्यापनाचे काम करीत होत्या. पतिराजांच्या बदलीच्या नोकरीमुळे भारतात निरनिराळ्या ठिकाणी फिरणे झाले. त्यामुळे अनुभवविश्व रुंदावण्यास मदत झाली. त्यांनी टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई यांच्या ‘स्त्री मुक्तीच्या पाऊलखुणा’ प्रकल्पात तीन शोधचरित्रांचे लेखन केलेले आहे. पॉप्युलर प्रकाशनने ‘स्त्रीमुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा’ (१९९१) व ‘स्त्री-अस्मितेचा आविष्कार’(१९९१) ही पुस्तके आणि मेनका प्रकाशनने ‘स्त्री मुक्तीच्या उद्गात्या’ (१९९६) हे पुस्तक प्रसिद्ध केले. साहित्य प्रेमी भगिनी मंडळ, पुणे संपादित ‘स्त्री-साहित्याचा मागोवा’ खंड १ मधील चरित्र या वाङ्मय प्रकाराचा स्वतंत्र शोध मृणालिनी ह्यांनी घेतला आहे. याशिवाय ‘ताराक्का शिंदे’ व ‘जनाक्का शिंदे’ ही पॉप्युलरने प्रसिद्ध केलेली चरित्रे आणि ‘रमाबाई रानडे’, ‘पंडिता रमाबाई’, ‘आचार्य कालेलकर : व्यक्ती आणि कार्य’ अशा महत्त्वाच्या व्यक्तींवरील त्यांचे चरित्र ग्रंथ प्रसिद्ध आहेत. विशेषतः मराठा समाजातल्या कार्यकर्त्या ‘जनाक्का शिंदे’ यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारे हे पहिलेच लेखन होय. स्त्रियांच्या व्यक्तित्वांतील फरक, त्यामागची कारणे आणि त्यांच्यामुळे स्त्रीमुक्तीचा मार्ग कसा मोकळा होतो, हे मृणालिनी जोगळेकरांच्या संशोधनातून स्पष्ट होत जाते.  या संशोधन कार्याखेरीज त्यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी एकाला राज्य पुरस्कार मिळालेला आहे.

स्वतःला अलिप्त ठेवून अप्रत्यक्ष रितीने आपले मत प्रकट करण्यास कथेचे माध्यम आत्माविष्काराच्या दृष्टीने सोयीचे ठरलेले आहे. त्यांच्या कथेतून मांडलेले परिणामही बोधवादी न वाटता नैसर्गिक वाटतात.त्यांचे  ‘फ्रेंच स्नेहयात्री’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रसिद्ध केले आहे. ‘संध्याकाळचा चेहरा’, ‘मनवेळा’, ‘मृगतृष्णा’ (२००८) हे त्यांचे कथासंग्रह रसिकमान्य आहेत. मृणालिनींच्या सार्‍या कथा मुख्यतः शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसांच्या नात्यांभोवती फिरत राहतात. हे विश्व मर्यादित असले; तरी नात्यांकडे बघण्यात चौरस तरलता आहे, विषयांचे वेगळेपण आहे, आणि वेगळाच शांतसा समंजसपणा आहे; असे मृणालिनींच्या कथांबाबत विद्या बाळ यांचे विचार आहेत. 

- डॉ. उषा कोटबागी

जोगळेकर, मृणालिनी परशुराम