Skip to main content
x

जोशी, कमलाकर विनायक

               मलाकर विनायक जोशी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळे येथे झाला. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून १९३७ मध्ये ते मॅट्रिक व सर परशुरामभाऊ महाविद्यालयामधून रसायनशास्त्र हा विषय घेऊन १९४१ मध्ये बी.एस्सी. उत्तीर्ण झाले. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्वरित नोकरी करून अर्थार्जन करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी हैदराबाद राज्यातील शक्करनगर येथील साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस पिकासाठी जमीन तपासणीचे काम १९४२ ते १९४६ पर्यंत केले. त्यानंतर हैदराबाद राज्याच्या कृषी खात्यात प्रवेश करून निजाम सागर प्रकल्प व तुंगभद्रा प्रकल्प येथे भूसर्वेक्षण व संशोधन कार्य केले. राज्य पुनर्रचनेनंतर १९५६ मध्ये ते पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात मृदा सर्वेक्षण अधिकारी म्हणून रुजू झाले व १९६६ पर्यंत या पदावर राहून त्यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या सिंचन प्रकल्पांखालील ऊस लागवड क्षेत्राचे भूसर्वेक्षण व संशोधन केले. त्यांनी १९६६पासून १९७०पर्यंत महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाचे मृदा सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्य केले. माती व ऊस पीक या दोन विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता व थेट शेतातील अनुभव होता.

              त्यामुळे शेतकरी, ऊस बागायतदार, साखर कारखान्यांचे मालक व संचालक त्यांना आदरपूर्वक पाचारण करून त्यांच्या व्यासंगाचा फायदा करून घेत. ‘शेतकर्‍यांशी समरस झालेला शास्त्रज्ञ’ या शब्दांत त्यांचा केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी गौरव केला होता. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ‘महाराष्ट्र राज्यातील ऊस क्षेत्राचे मृदा सर्वेक्षण व ऊस लागवडीत त्याचे महत्त्व’, तसेच ‘प्रमाणित मृदा सर्वेक्षणाच्या पद्धती’ या विषयावर त्यांनी इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. ‘ब्रॉड सॉइल झोन्स ऑफ महाराष्ट्र’ हे अन्य तीन लेखकांसमवेत लिहिलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. मृदा विषयावर शास्त्रीय माहिती देणारे ‘जमिनीची मूकभाषा’ हे पहिले मराठी पुस्तक १९६८मध्ये त्यांनी लिहिले. त्याच्या दोन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी मराठी विश्‍वकोश खंड १३मध्ये मृदा व मृदा संधारण ही दोन प्रकरणे लिहिली आहेत. त्यांनी १९७०पासून कृषि-उपसंचालक म्हणून कोल्हापूर व नांदेड येथे कार्य केले. ते १९७६मध्ये सेवानिवृत्त झाले.

- डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

जोशी, कमलाकर विनायक