Skip to main content
x

जोशी, महादेवशास्त्री सीताराम

     पंडित महादेवशास्त्री जोशी हे  इ.स.१९४०नंतर उदयाला आलेले बहुआयामी गोमंतकीय लेखक होत. कथा-लेखक, यशस्वी पटकथा लेखक, प्रवासवर्णनकार, बाल-लेखक चरित्रकार आणि कोशकार अशी शास्त्रीबुवांची विविध रूपे रसिकमनावर विरजमान आहेत. खुद्द शास्त्रीबुवांना मात्र आपल्या ‘कथाकार’ रूपाचेच अप्रूप होते. मराठी रसिक वाचकांंच्या मनावर आपले नाव कथाकार या नात्यानेच कोरलेले राहावे अशी त्यांची अंतरिक ओढ होती. 

शास्त्रीबुवांचा जन्म गोव्याच्या सत्तरी प्रांतातल्या आंबेडे ह्या खेड्यात झाला. जोश्यांचे घराणे हे विद्याव्यासंगी, ज्ञानोपासक आणि शेतकी पेशाचे असून पिढीजात पुराणिकाचा व्यवसाय करणारे असल्याने खरंतर शास्त्रीबुवांचे आयुष्य तोच व्यवसाय करण्यात जावयाचे; पण नियतीची इच्छा वेगळीच होती. ते याज्ञिकी शिकले असल्याने, गोव्यात भिक्षुकीला काही कमी पडणार नव्हते. जोडीला कुळागर होतेच. पण शास्त्रीबुवांची आजी, सीतारामपंतांची आई त्यांच्या आयुष्याला कलाटणी द्यायला कारणीभूत झाली. महादेव तीन महिन्यांचा असतानाच सीतारामपंतांचा देहान्त नरसोबाच्या वाडी येथे पटकीमुळे झाला होता. पोरका महादेव आई- आजीने तळहाताच्या फोडासारखा जपला होता. आजीने महादेवाला सांगलीच्या पाठशाळेत शिकायला पाठवले. इ.स.१९२२ ते १९२७ या कालावधीत पाठशाळेत शिकून महादेव बाहेर पडला अन् इ.स.१९२८ मध्ये पंडित महादेवशास्त्री बनून आंबेड्याला परतला.

कथालेखनाचा मार्ग-

येताना नवी दृष्टी घेऊन आलेल्या महादेवशास्त्रींनी इ.स.१९३०मध्ये ‘सत्तरी शिक्षण प्रसारक संस्था’ स्थापून आंबेड्याच्या सातेरीच्या देवळात शाळा सुरू केली. शाळेसाठी वर्गणी जमवण्याकरता त्यांनी ‘अभिमन्यू चक्रव्यूहभेद’ हा पोवाडा रचला. शाहीर बनून गावोगावी भटकंती केली. ‘जयद्रथ’ हा दुसरा पोवाडा रचला दोन्हींच्या पुस्तिका छापून त्यांची विक्री केली. प्रपंचासाठी कथा-कीर्तन-पुराणिकाचा व्यवसाय केला, पण त्यात मन रमेना. सांगलीच्या वास्तव्यात पाठशाळेजवळच्या सार्वजनिक वाचनालयात  नियमितपणे जाणार्‍या शास्त्रीबुवांनी एक दिवस वि.स.खांडेकरांची ‘गंगावन’ ही कथा वाचली. ती त्यांच्या मनाला भिडली. त्याच वेळी ‘आपण कथालेखक व्हायचे’ असा निश्चय त्यांनी केला.

१२ वर्षांच्या संसारानंतर शास्त्रीबुवांची पत्नी उमा हिचे देहावसान झाले. तिने उमा व लीला या आपल्या दोन मुलींना शास्त्रीबुवांच्या पदरात टाकले होते. धक्क्यातून सावरल्यावर त्यांनी प्रियोळच्या दत्तूभट फडके यांच्या सुधाबरोबर (गोवामुक्ती संग्रामात नंतर रणरागिणी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या सौ.सुधाताई जोशी) विवाह करून पुनश्च नवा डाव मांडला. वर्षभरातच आंबेडे सोडून त्यांनी पणजीला प्रस्थान केले. पण तेथे त्यांच्या सद्विवेकबुद्धीला ‘ज्योतिषातून भिक्षुकी आणि भिक्षुकीतून पुन्हा ज्योतिष’ हा व्यवहार पटेना. साहजिकच ज्योतिषाचा व्यवसाय न जमल्याने ते पुन्हा आंबेड्याला परतले. पणजीच्या त्यांच्या या वास्तव्याचा, मराठी वाचकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा फायदा झाला. तो हा की, शास्त्रीबुवांचा कथालेखक व्हायचा निर्णय प्रकर्षाने जागा झाला. त्यासाठी ‘पुण्याला जायला हवे’ हा ध्यास त्यांना लागला. अशा विमनस्क अवस्थेत असतानाच राष्ट्रीय कीर्तनकार कोल्हटकरबुवा यांचे निमंत्रण त्यांच्या हातात पडले. कोल्हटकरांच्या ‘चैतन्य’ मासिकाच्या संपादकपदाची धुरा संभाळण्याचे हे निमंत्रण होते. या काडीमात्र आधारावर मागचापुढचा विचार न करता शास्त्रीबुवांनी इ.स.१९३५साली पुणे गाठले. म्हणजे नियतीनेच त्यांच्या कथालेखनाचा मार्ग मोकळा केला.

गोव्यातील समाजचित्रण-

चैतन्याचे काम संभाळतच त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. त्याच वेळी प्रपंचाला हातभार लावण्यासाठी पुराण, प्रवचन हेही चालू ठेवले. ‘कायदा आणि माणुसकी’ ही त्यांची पहिली कथा ‘चैतन्य’च्या मार्च १९३६च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर कितीही अडचणी आल्या, तरी शास्त्रीबुवांनी  आपले कथालेखन नेटाने चालू ठेवलं. प्रारंभी त्यांनी  ‘गोव्यातील सत्तरीचे राणे’ यांच्या बंडावरील प्रसंगांच्या कथा लिहिल्या. सत्तरी हे गोव्यात सर्वार्थाने उपेक्षित होते, हे लक्षात घेऊन त्यांनी तेथील प्रसंग-घटनांच्या, लोकांच्या कथा लिहायचे ठरवले. अशा प्रकारे शास्त्रीबुवांनी जाणूनबुजून गोमंतकीय जीवनाचे अधिष्ठान निवडले. साहजिकच त्यांच्या कथा प्रादेशिक आहेत. कथांतून आलेले गोमंतकीय जीवन, निसर्ग इत्यादी कथाविषयाशी इतके एकरूप झाले की, ते कथांतून अलग काढताच येत नाही. त्यामुळेच ‘महादेवशास्त्री जोशी सहसा गोव्याबाहेर येत नाहीत.’ असा आरोप त्यांच्यावर झाला. आपल्या या मर्यादित क्षेत्रातच आपण खूप खोलवर जावे अन् तिथली राहणी, सामाजिक अर्थिक अडचणी, निसर्गसंकेत, चालीरीती या सगळ्यांचाच कलात्मक आविष्कार कथेद्वारे करावा, असे शास्त्रीबुवांचे मत होते. त्यामुळेच स्वतःच्या या मर्यादित विश्वात त्यांच्या प्रतिभेने अगदी मोकळेपणाने संचार केला.

इ.स.१९३५ ते १९५६ या वीस वर्षांच्या कालावधीत ‘वेलविस्तार’, ‘खडकातले पाझर’, ‘विराणी’, ‘मोहनवेल’, ‘कल्पित आणि सत्य’, ‘भावबळ’, ‘प्रतिमा’, ‘घररिघी’, ‘पुत्रवती’ आणि ‘कन्यादान’ हे दहा कथासंग्रह आणि या संग्रहातून समाविष्ट न झालेल्या ३०-३५ असंकलित कथा, अशी विपुल कथानिर्मिती केली. ऐन प्रसिद्धीच्या झोतात असतानाच, वाचकांकडून नवनवीन कथांची मागणी होत होती, तरीही शास्त्रीबुवांनी कथालेखनाचा संन्यास घेतला. आणि १९५७ साली भारतीय सांस्कृतिक मंडळाची स्थापना करून त्यांनी स्वतःला कोशाच्या कामासाठी वाहून घेतले.

अधुनिक यंत्रयुगीन संस्कृतीपूर्वीच्या माणुसकीवर आधारलेल्या, आपल्या हृदयाच्या गाभ्यात जपलेल्या गोमंतकीय समाजजीवनाचे चित्रण त्यांनी कथांतून केले. ‘पंडित महादेवशास्त्री जोशी’ ह्या आपल्या भारदस्त नावानिशी त्यांनी लघुकथेच्या दालनात पाऊल टाकले, ते उदात्त जीवनमूल्यांवरील दृढ श्रद्धेचे पाथेय घेऊनच. प्रापंचिक अडचणींतही कौटुंबिक जिव्हाळा आणि शांत-समाधानी वृत्ती ढासळू न देणार्‍या व्यक्ती त्यांच्या कथांत दिसतात. शहरी जीवनातून लुप्त होत जाणारे मांगल्य त्यांना प्रतीत झालेे होते. प्रादेशिक गोमंतकीय कथांना लागलेले वैषयिक ग्रहण दूर करत शास्त्रीबुवांनी निसर्गाच्या सान्निध्यातील गोमंतकीय जीवनाचे सात्त्विक दर्शन घडवीत उमललेल्या आपल्या कथांनी मराठी सारस्वताचे कथाभांडार समृद्ध केले.

रसरशीत व्यक्तिचित्रणे

त्यांनी रंगवलेले कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मणाचे गृहस्थ जीवन अतिशय मनोरम झाले आहे. गरिबीतही टिकवलेला गृहस्थधर्म, कणखरपणा, सडेतोडवृत्ती, स्वत्वाची बूज, माणुसकी, पावित्र्य आणि सर्जनता अशा गुणसमुच्चयांनी ते समृद्ध झाले आहे. माता, गृहिणी, भगिनी, प्रेयसी, सखी आणि पत्नी आशा विविध रूपांतील स्त्रियांप्रमाणेच पती, पिता, सासरा, पुत्र, जावई, शेजारी, बंधू, सखा, मित्ररूपातील आणि शत्रुरूपातील पुरुषही त्यांच्या कथांतून आपल्याला भेटतात. तेही निखळ वास्तववादाच्या चौकटीतून आणि कलेच्या माध्यमातून. लोप पावत चाललेल्या मध्यमवर्गीय गोमंतकीय ब्राह्मणी संस्कृतीचे साहित्यरूपाने केलेले जतन अतिशय मोलाचे आहे. शास्त्रीबुवांच्या मनाचा कल स्त्री-मनाचे, जीवनाचे दर्शन घडवण्याकडे आहे. हे स्त्री-दर्शन बहुढंगी, बहुरंगी आहे. प्रेमळ मातांच्या जोडीला विक्षिप्त माता; अज्ञाधारक, पीळदार मनाच्या सुकन्या, बहीण बालमैत्रीण; निष्ठावंत सहचारिणी; खाष्ट तशीच प्रेमळ सासवा; कुलवती मर्यादाशील सून; प्रौढ कुमारिका तशाच नैराश्याने वेढलेल्या विधवा; परित्यक्ता, अभिसारिका, निखंडिता अशा विविध भूमिकांतील स्त्रीच्या संवेदना मनोवेदना, वेदना, तिच्या भावना नि मनाची होणारी परोपरीची आंदोलने त्यांनी सहृदयतेने रंगवली आहेत. त्यांच्या अंगी मानीपणा, सात्त्विकता, करारीपणा, निग्रह, धाडस, पतिनिष्ठा, पावित्र्य, सोशिकता, नि साधेपणा इत्यादी गुण आहेत. तशीच त्यांची स्खलनशीलता आणि दुबळेपणाही त्यांनी लपवला नाही. 

कमालीचे जीवंत अन् रसरशीत व्यक्तिचित्रण हा त्यांच्या कथेचा विशेष आहे. बाह्यवर्णन, कृती हावभाव-वर्णन, निवेदकाचे भाष्य आणि लेखकाचे भाष्य, सत्याचे अधिष्ठान यांच्या जोडीने अंतरंग, शब्द आणि कृती यांची एकसंधता यांमुळे व्यक्तिचित्रणे मनोज्ञ झाली आहेत.  ह्यांच्या काही कथांवर आधारलेले ‘मानिनी’, ‘वैशाखवणवा’, ‘कन्यादान’ यांसारखे काही चित्रपटही वैशिष्ट्यपूर्ण ठरले.

भारतीय संस्कृति कोश-

त्यांनी ज्ञानराज प्रकाशन सुरू केले व त्याद्वारे बाल-किशोर वाचकांसाठी चरित्रे, प्रवासवर्णने, कथा आणि कोश इत्यादी विपुल साहित्य निर्माण केले. आईच्या आठवणी भाग १ ते ३, प्राचीन सुरस गोष्टीमाला खंड १ ते १०, कथा कल्पलतामाला १० खंड, जनपद कथामाला, लोककथाकुंज, भारती उपकथामाला, कथा कौमुदीमाला   यांप्रमाणे ‘इतर कथा’,  ‘मुलांचा नित्यपाठ’, ‘नवनीत रामायण’, ‘भारताचे कंठमणी’ अशांसारखी पुस्तके लिहून मुलांच्या हातात कशा प्रकारची पुस्तके द्यावीत, हा पालकांचा प्रश्न सोडवला. 

बाल-कुमारांसाठी लिहिलेल्या या पुस्तकांचे रंजकता, शाप-उःशापांची पखरण, अद्भुतता, अशक्यप्रायता, उद्बोधन हे विशेष आहेत. त्यातून त्यांनी अस्पृश्यता निवारण्याची शिकवण दिली. पौराणिक व्यक्तींचे केलेले मानुषीकरण बालवाचकांना भावते. इ.स.१९६२मध्ये कोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला आणि शेवटचा १०वा खंड इ.स.१९७९मध्ये प्रसिद्ध झाला.

भारतातील सर्व धर्म, परंपरा, भाषा, देवदेवता, कला वाङ्मय, राज्ये, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे, व्यक्ती वगैरे तेरा हजार विषयांचा समावेश असलेले दहाही खंड शास्त्रीबुवांच्या खास प्रासादिक, रसाळ आणि ओघवत्या भाषेमुळे वाचनीय झाले आहेत. कोशात सुमारे दहा हजार चित्रांचा वापर केल्याने त्याला वेगळा उठाव आला आहे. 

कोश वाङ्मयाद्वारे आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख करून देणार्‍या शास्त्रीबुवांनी वाचकांना आलाम, मणिपूर, बंगाल आदी पुस्तकांद्वारे संपूर्ण भारतदर्शन घडवले. भारतीय मूर्तिकला, मूल्यवान गोष्टी, संस्कृतीची प्रतिके, दैवते, बालसंवर्धन, पूजाविधान वगैरे पुस्तकांतून वेगवेगळे विषय समर्थपणे आणि सहजपणे हाताळणार्‍या शास्त्रीबुवांनी मराठी चरित्रवाङ्मयातही वैशिष्ट्यपूर्ण भर टाकली ती आद्यगुरू शंकराचार्य व एकनाथ ह्यांच्या रसाळ चरित्रांनी; बालवाचकांसाठी लिहिलेल्या चरित्रकथांनी. त्यांची दोन आत्मचरित्रे ‘आत्मपुराण’ आणि ‘आमचा वानप्रस्थाश्रम’ बहुसंख्य रसिकांची दाद मिळवून गेली आहेत.

जीवनातील संकटांना तोंड देत-देत मराठी साहित्यात अशी मोलाची भर टाकणारा हा साहित्यिक मनाचा अतिशय स्वच्छ, प्रांजळ अन् हळवा होता. २६ऑक्टोबर१९९२ रोजी पत्नी सौ.सुधाताई जोशी यांचे कर्करोगाने निधन झाल्यावर शास्त्रीबुवा अंतर्बाह्य उन्मळून पडले. ‘आता कशासाठी जगू’ हा मंत्र जपून, प्रायोपवेशन करून, ह्या हळव्या साहित्यिकाने ११डिसेंबर१९९२ला आपला देह ठेवला. 

- डॉ. शुभलक्ष्मी जोशी

जोशी, महादेवशास्त्री सीताराम