जोशी, प्रभाकर काशिनाथ
प्रभाकर जोशी यांनी आपल्या ३४ वर्षांच्या सेवाकालात शिक्षण संशोधन व कृषिविस्तार अशा वेगवेगळ्या विभागांत काम केले. १९९० ते २००१ या अकरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी सोयाबीनच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन कार्यक्रमात कृषिविद्यावेत्ता म्हणून योगदान दिले. या कार्यक्रमांतर्गत सोयाबीन लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रसार व प्रचार केला. यामुळे थोड्याशा कालावधीत सोयाबीनचे क्षेत्र ७,५०० हेक्टरवरून २० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले. सोयाबीन क्षेत्राच्या वाढीबरोबरच नवीन वाण विकसित करण्यातही त्यांचा सहभाग होता. पूजा, आरती, प्रसाद, परभणी साना आणि समृद्धी हे पाच वाण विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी परभणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य म्हणून पाच वर्षे काम पाहिले.
२०००-२००१ या वर्षाचे राधाकृष्ण शांती मल्होत्रा पारितोषिकाचे ते मानकरी होते.