जोशी, वामन पांडुरंग
पांडुरंग वासुदेव जोशी मूळचे कोकणातील बपणी या गावचे रहिवासी होते. आपले नशीब आजमावण्याच्या उद्देशाने ते मराठवाड्यात १८८५मध्ये आले व तेथेच राजा पिंपरी या गावात स्थायिक झाले.
वामन पांडुरंग जोशी तथा बाबूकाका यांचा जन्म बीड जिल्ह्यातील राजा-पिंपरी या गावात झाला. त्यांचे शिक्षण इंटरपर्यंत झाले होते. घरात अकाली चार मृत्यू झाल्यामुळे १९३५मध्ये पोलीस अधीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी घरची शेती करण्याचे ठरवले. बाबूकाकांनी शेतीत अनेक प्रयोग केले. अपरिचित असलेली पिके, नवे वाण, जमिनीची नव्या पद्धतीने मशागत, खतनिर्मितीच्या नव्या पद्धती, शेतीला पूरक धंदे, शेतीला पाणीपुरवठा अशा अनेक नवयोजना त्यांनी राबवल्या. त्या काळात आधुनिकतेचा पुरस्कार करणारी ‘किर्लोस्कर’ व ‘उद्यम’ ही दोन मासिके होती. ‘उद्यम’ मासिकात शेतीविषयक माहिती येत असे. ते त्या मासिकाचे कायम वर्गणीदार होते. त्यांची बरीचशी जमीन डोंगरात होती व तेथे खैराची झाडे विपुल होती. त्यांनी खैराच्या झाडापासून कात तयार करण्याचा उद्योग हाती घेतला व विशेष प्रयत्न करून हा आगळावेगळा व्यवसाय वाढवला. सुरुवातीला त्यांच्या क्षेत्रात फक्त एकच विहीर होती. बाबूकाकांनी आणखी दोन विहिरी बांधल्या व या तीन विहिरी एकमेकींना जोडल्या. त्यामुळे फार मोठ्या क्षेत्राला पाणीपुरवठा करणे शक्य झाले. तीनशे एकर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी ७००० फूट लांबीची १२ इंची पाइपलाइन टाकली व सायफन पद्धतीने दूरवरच्या शेतीला पाणी दिले.
पिंपरीसारख्या आडगावात इंजिन ऑइलच्या नियमित पुरवठ्याची व्यवस्था करणे जिकिरीचे होते. तसेच इंजिन आणि पाइपलाइनची देखभाल करणे तितकेच कठीण होते. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा त्यांनी उभारली.
राजा पिंपरी भागाचे पारंपरिक पीक म्हणजे ज्वारी. मालदांडी ज्वारी पेरली जाई. त्यांनी तिचेच विक्रमी उत्पादन घेऊन दाखवले. १९६४च्या सुमारास वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना हरितक्रांतीचा प्रचार जोरात होता. बाबूकाकांनी ज्वारी, बाजरी व मका यांच्या संकरित वाणांचे बीजोत्पादन केले व विक्रमी उत्पन्नसुद्धा घेतले. संकरित ज्वारी पेरून खाद्य ज्वारीचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी बाबूकाकांनी लागवडीत केलेला प्रयोग यशस्वी झाला. त्या वेळचे शेतकरी साधारणपणे दोन झाडांतील अंतर बारा इंच ठेवत. त्यांनी ते १८ इंच ठेवले. परिणामी कणसातील दाण्यांची संख्या व दाण्याचा आकार यात वाढ झालेली अनुभवास आली आणि विक्रमी उत्पादन मिळाले.
बाबूकाकांनी उसासारखी १२ ते १८ महिन्यांनी तयार होणारी बहुहंगामी पिकेही घेतली. त्यांनी बारमाही, भरपूर पाण्याचा पुरवठा, पुढील प्रक्रिया केल्याशिवाय जी पिके उत्पादक ठरत नाहीत, अशी ऊस व द्राक्षासारखी पिकेही उत्साहाने घेतली. तसेच त्यांनी उसाच्या रसापासून कच्ची साखर तयार करण्यासाठी हाताने चालणारी सेंट्रिफ्युगल यंत्रे करून घेतली व त्याद्वारे भुरा साखर तयार केली. वाहतुकीसाठी ती अधिक सोयीची होती व त्यास गुळापेक्षा अधिक किंमतही मिळे. मराठवाड्याची जमीन व हवापाणी कपाशी लागवडीस अनुकूल आहे. बाबूकाका यांनी जादा उत्पादन देणाऱ्या वाणाची (एन.एस.) निवड केली व त्या भागात सर्वोच्च उत्पादन मिळवण्याचा विक्रम केला. कपाशीची व सरकीची ते स्थानिक पातळीवर खरेदी करत व तेथून हैदराबाद - मुंबई यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत पाठवत. सामान्य शेेतकर्याला ते लागवडीसाठी कपाशीचे बी (सरकी) उधारीवर पुरवत व उत्पन्न मिळाल्यावर कपाशी विकतही घेत.
बाबूकाकांनी ज्वारी, बाजरी, गहू यांसारख्या हंगामी पिकांवर अवलंबून न राहता त्या भागात प्रचलित नसलेल्या मोसंबी, द्राक्ष व डाळिंब या तीन पिकांच्या बागा विकसित केल्या आणि त्यांच्या रोपवाटिकाही उभारून, स्थानिक लोकांना शुद्ध व सुदृढ रोपे उपलब्ध करून दिली. त्यांनी पानमळ्याचा चांगला सांभाळ करून किफायतशीर व्यवसाय केला. त्यांनी शेतीतील डोंगराळ भागात एरंडीचे उत्पादन घेतले. वामन जोशी यांनी १९७०-१९८०च्या दशकात होलस्टीन फ्रीझियन संकरित गाई, तसेच देवणी व गीर जातीच्या देशी गाई सांभाळल्या व डेअरी सुरू केली. त्यांनी दिल्लीच्या मुऱ्हा म्हशींचाही गोठा उभारला. त्यासाठी त्यांनी आरेच्या धर्तीवर गोठा पद्धत अवलंबली व गोठ्यातच जनावरांना चारापाणी देण्याची व्यवस्था केली. जनावरांच्या शेण व मूत्र यापासून शेतीस आवश्यक ते खतही मिळू लागले. त्यातून शेणखत व इंधन म्हणून गोबरगॅस मिळू लागला. देगाव येथील जमीन डोंगरात होती. तेथील चराऊ रानाचा उपयोग त्यांनी बकरीपालनासाठी केला. वामन जोशी यांच्याजवळ १५०-२०० बकर्या होत्या. त्यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळे व शेतीसाठी खतही मिळे. हरित खते मिळण्यासाठी ३० एकरात ते ताग लावत व नंतर तो जमिनीत गाडत.
१९५५च्या सुमारास शेतीत यंत्रांचा उपयोग करणे शक्य नव्हते. पुढे त्यांनी पहिला ट्रॅक्टर घेतला. शेतीची मशागत व वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून त्याचा उपयोग होऊ लागला. त्यांनी गोबरगॅससाठी यंत्रणा, गोमूत्र जमा करणे व कीटकनाशक म्हणून त्याची फवारणी करणे यासाठी यंत्रणा उभारली. त्याचबरोबर मळणीयंत्र, क्रशर, शेंगा फोडण्याचे यंत्र ही यंत्रसामग्रीही उपयोगात आणली. त्यांनी शेतीशी प्रत्यक्ष संबंधित नसणारेही उद्योग हाती घेतले. पिठाची गिरणी, कापड व्यवसाय, सॉ मिल, चुनाभट्टी, वीटभट्टी यांसारखे उद्योग यशस्वीरीत्या उभारले व चालवले. ते स्थानिक सहकारी संस्थेचे वीस वर्षे अध्यक्ष होते. तसेच गावचेही अनेक वर्षे सरपंच होते. त्यांनी बलोपासनेला खूप महत्त्व दिले. त्यांनी व्यायामशाळा उभारली. त्यांचे सहकारी सखाराम पाटील व सुरेंद्र भंडारी यांच्या सहकार्याने त्यांनी दारूबंदीचे कार्यही चालवले. स्थानिक पातळीवर त्यांनी होमगार्ड पथकही उभारले. ते काँग्रेसचे आयुष्यभर कार्यकर्ते होते. शेेवटची तीन वर्षे त्यांनी मौनव्रत धरले. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी हा इहलोक सोडला.