Skip to main content
x

झेलीएट, एलिनॉर

     लिनॉर बाईंचे नाव घेतले की भारतीय दलित व्यक्ती आणि साहित्याचा जगभराचा विस्तार आणि कौतुक करणारी एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची विदुषी अशी प्रतिमा उभी राहते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महार जमात चळवळ’ या विषयावर १९६९ मध्ये अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया (फिलाडेल्फिया) विद्यापीठात पीएच.डी. प्रबंध सादर करून, सुरुवात आणि नंतर सतत याच विषयाचे चाळीस वर्षे अध्ययन-अध्यापन-संशोधन करणार्‍या त्या एकमेव विदेशी विदुषी म्हणाव्या लागतील.

     अगदी अलीकडे, इ.स. २००० नंतर मला त्यांच्याबरोबर ‘संत चोखामेळा : विविध दर्शन’ हा संशोधनपूर्वक ग्रंथ संपादन करण्याची संधी मिळाली. आणि त्यातूनच त्यांच्या संशोधन पद्धतीचा आणि फील्डवर्कचा अनुभव मला घेता आला. डॉ. एलिनॉर मिनेसोटाच्या कार्लेटोन कॉलेजमधून १९९३ मध्ये निवृत्त झाल्या. तत्पूर्वी त्या असोसिएट एडिटर (अमेरिकन फ्रेंड, इंडियाना), अध्यापक (स्कॅटरगुड स्कूल, आयव्हा), एडिटर (पेंडलहिल पब्लिकेशन, पेन्सिल्व्हानिया), समर टीचिंग टीचर (विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी), असि. प्रोफेसर (मिनेसोटा युनिव्हर्सिटी) कार्लेटोन कॉलेज इतिहास विभाग (प्राध्यापक) अशा विविध पदांवर कार्यरत होत्या. सन १९५२-५३ मध्ये त्या भारतात येऊन गेल्या. केवळ दोन महिन्यांच्या वास्तव्यात त्यांना भारत देश खूप भावला. १९५५ मध्ये त्या मॉस्कोला (रशिया) एका मिशनसाठी जाऊन आल्या. दिल्लीमध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज स्थापन झाल्यावर, पुणे केंद्राच्या त्या बराच काळ ‘फेलो’ होत्या. त्यानंतर काही वर्षे त्या पुण्याला एसीएम प्रोग्रॅमच्या (असोसिएटेड कॉलेजेस ऑफ मिडवेस्ट) संचालक म्हणून राहून गेल्या. या प्रोग्रॅममध्ये ३०/४० अमेरिकन पदवी पूर्व महाविद्यालयीन विद्यार्थी पुण्यात वेगवेगळ्या कुटुंबांत राहून चार महिने मराठी समाज संस्कृतीचा अभ्यास करीत. त्याशिवाय संगीत -चित्रकला आदिकलांचा अभ्यास करून टर्मच्या शेवटी एका विषयावर रिसर्च पेपर देत. त्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता भासे. प्रा. एलिनॉर यांनी बर्‍याच विद्यार्थ्यांना एसीएम संचालक म्हणून मार्गदर्शन केले.

     उत्तर भारतात सहा महिने डॉ. आंबेडकरांच्या जीवन- कार्यावर व्याख्याने देण्यासाठी इंडियन ‘काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’ प्रकल्पात त्यांनी १९९२ मध्ये मोठा दौरा केला. लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीसाठी समर रिसर्च प्रोगॅममध्ये त्या १९६९ आणि १९८८ मध्ये जाऊन आल्या. १९७५-१९७६ मध्ये त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीजची प्रो. नॉर्मन ब्राउन फेलोशिप मिळाली होती. त्या अकरा महिन्यांच्या काळात त्या पुन्हा भारतात आल्या होत्या. १९८७ मध्ये अभ्यासदौरा करण्यासाठी त्या व्हिएतनामला गेल्या होत्या. १९९२ मध्ये अमेरिकेची फुलब्राइट स्कॉलरशिप  घेऊन त्या भारतात आल्या होत्या. अकॅडेमिक अध्ययनाबरोबर त्यांनी काही ललित लेखन केले. महानुभावपंथीय गुंडम राऊळ यांच्या रचना, ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी नाटकाचे इंग्रजी रूपांतर त्यांनी केले आहे. नवबौद्धांची सद्य:स्थिती, एकनाथी भारुडे, एकनाथ आणि चोखामेळा यांचा तौलनिक अभ्यास, पालखी सोहळा, महार जमातीचा इतिहास, चित्पावन ब्राह्मणांची परंपरा, महाराष्ट्रातील लोकसंस्कृती अशा विविध विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. नंतर मात्र त्यांनी महाराष्ट्रातील दलित, अस्पृश्य (तथाकथित) संतांच्या जीवनावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

     संत चोखामेळा प्रकल्पावर काम करताना त्यांनी या संतकवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रचलेल्या, मुद्रित आणि अमुद्रित रचनांचा शोध घेतला. परिवाराचा इतिहास, त्यांच्या वास्तव्याची गावे, तेथील त्यांची स्मारके, त्यांची आजची अवस्था, आजच्या तरुण दलितांच्या कैफियती, सुशिक्षित आणि अशिक्षित दलितांची मनोगते, भागवत म्हणजेच वारकरी संप्रदायात चोखामेळा, रोहिदास, अजामेळा दिंड्यांचे व्यवस्थापन, या संतांच्या समाध्यांची दुरावस्था, नवबौद्धांचे या दलित संतांबद्दलचे मत, राजकीय नेते आणि दलित साहित्यिक यांना चोखोबाबद्दल काय वाटते, अशा विविध अंगांनी विचार करून त्यांनी ग्रंथलेखन केले, जे ‘संत चोखामेळा : विविध दर्शन’ या नावाने काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले आहे. त्याकरिता त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा पंढरपूर, मंगळवेढा, आळंदी आदी क्षेत्रांचा प्रवास केला.

     त्यांना मिळालेले गौरव पुरस्कार, त्यांच्या विविध लेखांची यादी मोठी आहे. चोखोबांच्या गावाचा, मंगळवेढ्याचा पहिला ‘चोखामेळा’ पुरस्कार त्यांना मिळाला.

वा.ल. मंजूळ

झेलीएट, एलिनॉर