काळे, नारायण मुरलीधर
नारायण मुरलीधर काळे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोत्रा भणभोजी या गावी शेतकरी कुटुंबात झाला. काळे यांचे प्राथमिक शिक्षण धोत्रा या गावीच झाले आणि माध्यमिक शिक्षण शेलपूर या खेड्यात झाले. ते मॅट्रिकची परीक्षा १९८०मध्ये उत्तीर्ण झाले. कौटुंबिक अडचणीमुळे ते बारावीची परीक्षा १९८४मध्ये चिखली येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी उद्यानविद्या या विषयामध्ये बी.एस्सी. ही पदवी डॉ. पं.दे.कृ.वि.तून १९८८मध्ये मिळवली. १९९०मध्ये त्यांनी कृषी-विस्तारशिक्षण विषयामध्ये याच विद्यापीठातून एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली आणि त्यानंतर त्याच विषयामध्ये २००९मध्ये पीएच.डी. पदवीही प्राप्त केली.
डॉ.काळे यांनी नोकरीची सुरुवात कृषी पर्यवेक्षक म्हणून केली व त्यानंतर २००२मध्ये त्यांची साहाय्यक प्राध्यापक विस्तार शिक्षक म्हणून पदोन्नती झाली व लागलीच सहयोगी प्राध्यापक या पदावर बढती मिळाली. विदर्भामधील शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात त्यांनी पीएच.डी. पदवीसाठी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला व वर्धा जिल्ह्यांतील जवळपास सगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन दोनतीनशे पीडित शेतकरी कुटुंबीयांशी आणि इतर शेतकऱ्यांशी संपर्क साधला व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास केला. त्यात त्यांना प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि व्यसनाधीनता, स्वतःचे व बायकोचे आजारपण आणि भावनाविवशता ही मुख्य कारणे आढळून आली. डॉ.काळे यांनी या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करून भा.कृ.अ.प.ला सादर केला. हा अहवाल अगदी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्यांना १६ जुलै २०१० रोजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला व सुवर्णपदक देऊन काळे यांचा गौरव करण्यात आला. हा अहवाल महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त बैठकीसमोर वाचून दाखवण्यात आला आणि त्या वेळी असा निष्कर्ष काढण्यात आला की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या एका कोणत्याही कारणामुळे होत नसून कर्जबाजारीपणा, कुटुंबाचे आजारपण, सततची नापिकी, व्यसनाधीनता व घरगुती शेतीबद्दलचे वाद या सर्व कारणांचा त्यात अंतर्भाव असलेला दिसतो. जर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्य विमा व त्यांच्या शेती व्यवसायाचा पीक विमा काढलेला असता; तर काही प्रमाणात या आत्महत्या थांबवता आल्या असत्या, असेही दिसून आले आहे. डॉ.काळे यांनी ३० संशोधनपर लेख, ४० घडीपत्रिका प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यांनी ६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर परीक्षेसाठी मार्गदर्शन केलेले आहे.