Skip to main content
x

काणे, पांडुरंग वामन

महामहोपाध्याय, पां.वा.काणे

     पांडुरंग वामन काणे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र परशुराम येथे एका मध्यमवर्गीय आणि वैदिक विद्वानांच्या घराण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दापोली येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. पहिल्या वर्षी आणि इंटरच्या वर्षी त्यांना संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती मिळाली. १९०१मध्ये ते बी.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले.

     एका वर्षानंतर म्हणजे १९०२मध्ये पांडुरंग वामन काणे एलएल. बी.च्या पहिल्या वर्षाची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. नंतरच्या वर्षी म्हणजे १९०३मध्ये ते संस्कृत आणि इंग्रजी हे विषय घेऊन एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना ‘गोकुळजी झाला वेदान्त पारितोषिक’ मिळाले. एम.ए. झाल्यावर काणे यांनी रत्नागिरीच्या सरकारी उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी स्वेच्छेने स्वीकारली. तेथे ते सात विषय शिकवीत. ही नोकरी करीत असतानाच त्यांनी मुंबई विद्यापीठाचे वि.ना.मंडलिक सुवर्णपदक दोन वेळा मिळविले. यासाठी विद्यापीठाला संस्कृतमधील एखाद्या विषयावर निबंध सादर करावे लागत. काणे यांचा एक निबंध ‘हिस्टरी ऑफ अलंकार लिटरेचर’ या विषयावर होता, तर दुसर्‍या निबंधाचा विषय ‘आर्यन मॅनर्स अ‍ॅन्ड मॉरल्स अ‍ॅज डिपिक्टेड इन दि एपिक्स’ असा होता.

      १९०७मध्ये त्यांची रत्नागिरीहून मुंबईला बदली झाली. त्याच सुमारास पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधील संस्कृतच्या सहायक प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. त्या जागेवर काणे यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. परंतु सरकारने कमी गुणवत्तेच्या दुसर्‍या व्यक्तीची नियुक्ती केली. अत्यंत स्वाभिमानी असलेल्या काण्यांनी या अन्यायाच्या निषेधार्थ सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि वकिली करण्याचे ठरविले. १९०२मध्ये त्यांचे एलएल.बी.चे पहिले वर्ष झाले होतेच; आता दुसरे वर्ष पूर्ण करून १९०८मध्ये त्यांनी एलएल.बी. पदवी मिळवली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. वकिलीत त्यांचा अल्पावधीतच जम बसला. संस्कृतचा व धर्मशास्त्राचा त्यांचा गाढा व्यासंग असल्याने हिंदू कायद्यावर त्यांचे पहिल्यापासूनच प्रभुत्व होते आणि त्यातील अनेक प्रकरणे त्यांच्याकडे येत.

      काण्यांनी कित्येक वर्षे वकिली केली असली, तरी संस्कृत वाङ्मय, धर्मशास्त्र आणि एकंदरीत भारतीय विद्या (इंडॉलॉजी) या विषयांकडे त्यांचा विशेष कल पहिल्यापासूनच असल्यामुळे या क्षेत्रांत त्यांनी अखंडपणे गहन अध्ययन व चिंतन केले आणि त्याचे फलित आपल्या प्रचंड लेखनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले. मंडलिक सुवर्णपदकासाठी लिहिलेल्या अलंकारशास्त्रावरील निबंधाने या लेखनाची सुरुवात १९०५ च्या सुमारासच झाली होती. त्यानंतरच्या सुमारे सात दशकांच्या काळात अलंकारशास्त्र आणि साहित्यशास्त्र, अभिजात संस्कृत वाङ्मय, महाभारत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्मशास्त्र आणि पूर्वमीमांसा या विषयांवर काण्यांनी अक्षरश: अफाट लेखन केले. यातील बहुतेक लेखन इंग्रजीत असले, तरी मराठी लेखनही लक्षणीय आहे. अभिजात संस्कृत वाङ्मयातील बाणभट्टाचे ‘हर्षचरित’ आणि ‘कादंबरी’, त्याचप्रमाणे भवभूतीचे ‘उत्तररामचरित’ यांच्या चिकित्सक सानुवाद व सटीप आवृत्त्या त्यांनी प्रसिद्ध केल्या. साहित्यशास्त्रातील विश्‍वनाथाच्या ‘साहित्यदर्पण’ या विख्यात ग्रंथाच्या पहिल्या, दुसर्‍या व दहाव्या या परिच्छेदांची अशीच आवृत्ती त्यांनी १९१० मध्ये प्रसिद्ध केली. (या ग्रंथाच्या नंतर चार सुधारित आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या.) या आवृत्तीस अलंकारशास्त्राचा ऐतिहासिक आढावा घेणारी चारशेपेक्षा जास्त पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना होती. ही प्रस्तावना नंतर ‘हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स’ या स्वतंत्र पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध झाली.

     काणे यांच्या धर्मशास्त्रावरील लेखनाची सुरुवात नीलकण्ठभट्टाच्या ‘व्यवहारमयुख’ या ग्रंथाची त्यांनी जी संपादित आवृत्ती काढली, तिच्यापासून झाली. ही आवृत्ती १९२६मध्ये प्रसिद्ध झाली. (या आवृत्तीत मूळ संहिता आणि टीपांचा समावेश होता; संहितेचे इंग्रजी भाषांतर नंतर १९३०मध्ये प्रसिद्ध झाले.) त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे, या आवृत्तीसाठी सामग्री जुळवीत असताना त्यांना असे वाटले की, अलंकारशास्त्राच्या इतिहासाप्रमाणेच धर्मशास्त्राचाही इतिहास थोडक्यात लिहिला, तर धर्मशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. परंतु या दृष्टीने अभ्यास सुरू केल्यावर दोन गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. एक म्हणजे धर्मशास्त्र हा विषय एवढा विस्तृत आणि गहन आहे की त्याच्यावर ‘थोडक्यात’ काही लिहिणे केवळ अशक्य आहे; दुसरी म्हणजे, प्राचीन भारतीय धर्मशास्त्र म्हणजे आधुनिक काळात ज्याला न्यायशास्त्र (ज्युरिसप्रुडन्स) म्हणतात, तेच असल्याने तुलनात्मक न्यायशास्त्राच्या, सामाजिक संस्थांच्या आणि एकंदरीत विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासासाठी धर्मशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून मग त्यांनी स्वतंत्रपणे धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याचे ठरविले. यातूनच यथावकाश ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा पाच खंडांचा, सुमारे साडेसहा हजार पृष्ठांचा जगप्रसिद्ध बृहद्ग्रंथराज सिद्ध झाला.

      वस्तुत: या ग्रंथाला धर्मशास्त्राचा ज्ञानकोश म्हणणे अधिक योग्य होईल. याचा पहिला खंड १९३०मध्ये प्रसिद्ध झाला, नंतर दुसरा खंड दोन भागांत १९४१मध्ये, तिसरा १९४६मध्ये, चौथा १९५३मध्ये आणि पाचव्या खंडाचा पहिला भाग १९५८मध्ये तर दुसरा भाग १९६२मध्ये प्रसिद्ध झाला. पहिल्या खंडाचेही नंतर दोन भाग पडले आणि त्यांपैकी पहिल्या भागाची दुसरी सुधारित आवृत्ती १९६८मध्ये प्रसिद्ध झाली. म्हणजेच या ज्ञानकोशाचे लेखन म.म. काणे सुमारे चार दशके अविरतपणे करीत होते. हे त्यांच्या जीवनभराच्या अध्ययन आणि व्यासंगाचे संचित-फलित होते. साहजिकच काणे म्हणजे धर्मशास्त्र आणि धर्मशास्त्र म्हणजे काणे असे जणू समीकरणच रूढ झाले.

      धर्मशास्त्रावरील हे अक्षर लेखन एवढा दीर्घकाळ सातत्याने करीत असतानाच म.म.काणे यांनी संस्कृत आणि भारतीय विद्यांमधील अन्य विषयांवरही विपुल  लेखन केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व लेखन काणे यांनी स्वत: कोणाच्याही साहाय्याशिवाय एकहाती केले. सर्व आधार आणि संदर्भ ते स्वत: शोधून काढीत असत. “नामूलं लिख्यते किञ्चित्” म्हणजे “निराधार असे मी काही लिहीत नाही” हे त्यांचे ब्रीद होते.

     धर्मशास्त्राप्रमाणेच षड्दर्शनांपैकी पूर्वमीमांसेमधील अर्थनिर्णयनाच्या नियमांचे (रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन) आजच्या काळातील महत्त्व त्यांनी स्पष्ट करून सांगितले. विशेषत: हिंदू कायद्यासंबंधीची जी प्रकरणे विविध उच्च न्यायालयांसमोर त्या काळात निवाड्यासाठी येत, त्यांचा निर्णय करताना या नियमांचा कमी-अधिक प्रमाणात उपयोग होई. धर्मशास्त्र आणि मीमांसा यांचा गाढा व्यासंग असल्याने, वर म्हटल्याप्रमाणे हिंदू कायद्याच्या बाबतीतली अनेक प्रकरणे काणे यांच्याकडे येत. ती न्यायालयात चालवताना, त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण लेखनात काणे यांचा दृष्टिकोन परंपरागत शास्त्री-पंडितांसारखा नसे, तर आधुनिक काळाला आणि आधुनिक न्यायशास्त्राला अनुरूप असा असे. म.म.काणे यांना अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले. १९४२मध्ये त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी मिळाली. १९४६मध्ये नागपूरला झालेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे, तसेच १९५३मध्ये वॉल्टेरला झालेल्या भारतीय इतिहास परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९४७ ते १९४९ या तीन वर्षांत ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९५२मध्ये त्यांना लंडनच्या ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अ‍ॅन्ड आफ्रिकन स्टडीज्’ या प्रतिष्ठित संस्थेची मानद फेलोशिप मिळाली. १९५३ पासून १९५९ पर्यंत ते राज्यसभेचे नियुक्त सदस्य होते. याच वर्षांदरम्यान ‘हिंदू कोड बिला’ची चार विधेयके संसदेने संमत केली आणि त्यांचे कायद्यात रूपांतर झाले. यांपैकी वारसाहक्क विधेयकावर झालेल्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर-विशेषत: स्त्रीच्या वारसाहक्कासंबंधी आणि स्त्रीच्या पश्चात तिच्या स्त्रीधनाचा वारसा कोणाकडे जावा, यासंबंधी महामहोपाध्याय काणे यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या संसदेने स्वीकारल्या आणि १९५६ चा हिंदू वारसाहक्क कायदा संमत केला. १९५४ ते १९५८ पर्यंत ते साहित्य अकादमीच्या नियामक मंडळाचे सदस्य होते. १९५९मध्ये त्यांची भारतीय विद्यांचे राष्ट्रीय संशोधक-प्राध्यापक (नॅशनल रिसर्च-प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी) म्हणून नियुक्ती झाली. भारतीय विद्यांसंबंधीच्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी वेळोवेळी भारताचे प्रतिनिधित्व केले.

     हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन या सर्वांवर कळस चढवला.

     महामहोपाध्याय काणे यांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते, तर सोसायटीच्या शोधपत्रिकेचे कित्येक वर्षे संपादक होते. पुणे येथील डेक्कन महाविद्यालय व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, वाईचे प्राज्ञपाठशाळा मंडळ व धर्मनिर्णय मंडळ आणि मुंबईची ब्राह्मणसभा या संस्थांशीही त्यांचा दीर्घ आणि घनिष्ठ संबंध होता.

- शरच्चंद्र पानसे

 

 

 

 

संदर्भ
१.गजेंद्रगडकर, एस. एन.; संपादक, ‘महामहोपाध्याय डॉ. पी. व्ही. काणे कमोमरेशन मोनोग्राफ’; मुंबई विद्यापीठ, १९७४.
काणे, पांडुरंग वामन